२९ एप्रिल, २००९

दहावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय

महाबाहु पार्था तू असशी माझा प्रिय मित्र
म्हणुनि सांगतो तुझ्या हितास्तव परंज्ञानसूत्र १

कळलो नाही मी देवाना वा महर्षिंनाही
मूळ मीच सार्‍या देवांचे आणि ऋषींचेही २

मज अजन्म अन् अनंत जाणी जो नर निर्मोही
मी जगदीश्वर कळते ज्या तो पापमुक्त होर्इ ३

मति, ज्ञान, संशयनिवॄत्ती, क्षमा, सत्य, निग्रह,
सुखदु:ख तसे जननमरण अन् भय, निर्भय भाव, ४
समत्वबुध्दी, तृप्ति, अहींसा, तप अन् दातृत्व,
यश, अपयश या सार्‍यांचा हो माझ्यातुनि उद्भव ५

चार महर्षी अन् सप्तर्षी तसे मनुसमष्टी
या सार्‍यांना जन्म मजमुळे, अन् त्यातुन सृष्टी ६

माझ्या कर्मांवर, सामर्थ्यावर धरि विश्वास
तो होतो ममभक्तिपरायण कर्मयोगी खास ७

उगमस्थान मी अन् सार्‍यांचा माझ्यातुन उपज
बुध्दिवंत हे जाणुनि भजती भक्तीपूर्वक मज ८

चित्त मजमधी गुंतवुनी ते परस्परा सांगती
भक्तिपूर्वक मजविषयी, अन् सदा त्यात रमती ९

प्रेमाने मम सेवेमधि जे योगी भक्त गर्क
त्यांना मी मजकडे यायचा दावितसे मार्ग १०

त्यांवरती अनुकंपा म्हणुनी तदंतरी जातो
ज्ञानाच्या तेजाने तेथिल अंधारा हटवितो ११

अर्जुन म्हणाला‚
अजर, अमर, आदिदेव, दिव्य तुम्हि आहा सर्वव्यापी
परब्रम्ह तुम्हि, परमात्मा तुम्हि, परमधामही तुम्ही १२

ऋषी असित, देवल, देवर्षी नारद, व्यासमुनी
असेच म्हणती आणि ऐकतो तुमच्याहीकडुनी १३

सत्य हेच मज मान्य, केशवा, तुम्ही सांगता ते
व्यक्तिमत्व तुमचे ना माहित देवदानवाते १४

भूतमात्र निर्मिता सर्व तुम्हि जगत्पती माधवा,
तुम्हास अंतर्ज्ञाने कळते तुम्ही कोण, देवा १५

कळल्या ज्या तुम्हा, सांगाव्या मजला मधुसूदन,
प्रवृत्ती तुमच्या ज्यायोगे राहता जग व्यापुन १६

कसे करावे चिंतन, तुम्हा कसे आळवावे?
मज सांगा कुठकुठल्या रूपे तुम्हा ओळखावे? १७

आपुल्या शक्ती आणि महत्ता सांगा विस्तारून
अमृतमय तव बोल ऐकण्या आतुर मम कर्ण १८

श्री भगवान म्हणाले‚
हे कुरूश्रेष्ठा, तुला सांगतो ठळक तेवढया शक्ती
विस्ताराला अंत न माझ्या अशि माझी प्रवृत्ती १९

मीच अंतरात्मा आहे या ब्रम्हांडातिल भूतांचा
कुंतिसुता मी आदि, मध्य मी, आणि अंतही मी त्यांचा २०

मी आदित्यांतिल विष्णू, अन् सूर्य तेजपुंजांमधला
वार्‍यांमधला मरिचि मी, तसा शशांक नक्षत्रांमधला २१

वेदांमध्ये सामवेद मी, देवांमधला देवेंद्र
इंद्रियांमधे मन, अन् भूतांतिल जीवाचे मी केंद्र २२

रूद्रगणांचा मी शंकर, अन् यक्षांमधला कुबेर मी
अष्टवसूतिल पावक मी, अन् पर्वतातला मेरूहि मी २३

पुरोहितांतिल मुख्य म्हणति ज्या तो आहे मी बॄहस्पति
सेनानींमधि कार्तिकेय मी, जलाशयांमधि सरित्पती २४

महर्षींमधी भृगु ऋषी मी, ध्वनींमधिल मी ॐकार
यज्ञांमधला जपयज्ञ, तसा अचलांमधला हिमाचल २५

वृक्षांमध्ये वटवृक्ष, आणि नारद देवर्षींमध्ये
गंधर्वांमधि चित्ररथ, तसा कपिलमुनी सिध्दांमध्ये २६

सागरातुनी निर्मिति ज्याची तो अश्वांतिल उच्चश्रवा,
हत्तींमधि ऐरावत, तैसा नराधीप मी मनुज जिवां २७

शस्त्रांमध्ये वज्र, तसा मी कामधेनु गायींमध्ये
जीवनिर्मितीमधि मदन मी, अन् वासुकी सर्पांमध्ये २८

नागांपैकी अनंत मी, अन् पाण्यासाठी वरूणहि मी
नियमनकर्ता यम मी आणिक, पितरांमधला अर्यम मी २९

नियंत्रकांतिल काळ मी, तसा दैत्यांमध्ये प्रल्हाद
पशूंमधी मी सिंह, आणखी पक्षिगणांमधला गरूड ३०

वेगवान वारा मी, आणि शस्त्रधरांमधि दाशरथी
मत्स्यांमधे मकरमत्स्य, अन् सरितांमध्ये भागिरथी ३१

सृष्टीचा आरंभ, अंत, अन पार्था, मीच असे मध्य
विद्यांमधि अध्यात्म मीच, अन् वादींमधला मी वाद ३२

अक्षरांतला ‘अ’कार मी, अन् समासांतला मी द्वंद्व
अक्षय ऐसा काल मीच, अन् ब्रम्हदेव मी चतुर्मुख ३३

सर्वांसाठी मी मृत्यू, अन् येणार्‍यांस्तव जन्महि मी
श्री, कीर्ति, वाचा, बुध्दी अन् धृती, श्रुती, नारींमधि मी ३४

स्तोत्रांमधला बृहत्साम मी, अन छंदांमधि गायत्री
मासांमधला मार्गशीर्ष, अन् ऋतूराज जो वसंत मी ३५

कपटींसाठी द्यूत मीच, अन् तेजस्वींचे मी तेज
व्यवसायांतिल यशही मी, अन् बलवानांचे मी ओज ३६

वृष्णींचा वासुदेव मी, अन पांडवामधे धनंजय
मुनींमधी मी व्यासमुनी, अन् कवींमधी शुक्राचार्य ३७

दण्डकांतला दंड मी, तसा विजिगीषूंमधली नीति
गुपितांमध्ये मौन मीच, अन ज्ञानींमधली विज्ञप्ती ३८

आणि अर्जुना मीच आहे रे बीज भूतमात्रांचे
माझ्याविरहित असे कुणिहि तुला न आढळायाचे ३९

ना गणती अन् अंतहि नाही रे माझ्या रूपा
तुज सांगितली ती तर केवळ थोडीच, परंतपा ४०

सुंदर अन् तेजस्वी ऐशा ज्या सार्‍या गोष्टी
तेजाच्या ठिणगीतुन माझ्या त्यांची उत्पत्ती ४१

तरी अर्जुना, हवे कशाला हे विस्तृत ज्ञान
राही माझा सूक्ष्म अंश या जगता व्यापून ४२

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतीयोग नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा