२४ ऑगस्ट, २००९

गणपतीची आरती

सुखकारक, दुखहारक, सन्मतिदायक, गणपती मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

प्राक्तनातले अरिष्ट नुरवी
प्रेमकृपेची धारा झरवी
वात्सल्याची वर्षा पुरवी
तू गणनायक, सिध्दिविनायक, सुबुध्दिदायक मोरया

राग लोभ अज्ञान काननी
गुरफटलो मज तार यांतुनी
अनन्य भावे शरण तुला मी
दे मज स्फूर्ती आणि सन्मती, अंति सद्गती मोरया

सर्वसाक्षि तू, तू वरदाता
तुजवाचुनि मज कुणी न त्राता
क्लेशांमधुनि सोडवि आता
नतमस्तक मी करित प्रार्थना हे गजवदना मोरया

०६ जून, २००९

अठरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय

अर्जुन म्हणाला,
पूर्ण कर्मसन्यास आणखी फलत्यागामधला
दोन्हिमधला फरक सांग तू, केषिनिषूदन, मला १

श्री भगवान म्हणाले,
ज्ञानी म्हणती पूर्ण कर्म सोडणे असे संन्यास
फलेच्छेविना कर्मे करणे त्याग हि संज्ञा त्यास २

दोषास्पद कर्मे टाळावी म्हणती काही ज्ञानी
यज्ञ, दान, तप कदापी न टाळावे म्हणती कोणी ३

त्यागामधले तत्व काय ते कथितो मी तुजला
तीन प्रकारे त्याग वर्णिला जातो, नरशार्दुला ४

यज्ञ, दान, तप त्यागु नये कधि हे निश्चित जाण
या कर्मांच्या आचरणाने पावन होती सुज्ञ ५

तरिहि फलाची धरू नये कधि या कर्मांतुन आशा
ठाम असे हे मत माझे, ना ठेवावी अभिलाषा ६

या नियमित कर्मांपासुन कधि घेउ नये संन्यास
मोहापायी घेतल्यास जन गणतिल त्या ‘तामस’ ७

नको कष्ट देहास म्हणुनि वा भीतीपोटी न्यास
केला या कर्मांचा तर तो त्याग विफल ‘राजस’ ८

अभिलाषांना त्यागुन केली नियमित कर्मे, पार्थ
तर त्या त्यागाला ‘सात्विक’ हे अभिधान ठरे सार्थ ९

अकुशल कर्मे नावडती अन् कुशल तितुकि आवडती
असे न मानी त्यागि पुरूष नि:शंकित ठेवुनि मती १०

देहधारिना अशक्य त्यजणे कर्मे पूर्णपणे
फलाभिलाषा त्यजती त्यांसच कर्मयोगी म्हणणे ११

इष्ट, अनिष्ट नि मिश्र अशी कर्माचि फळे तीन
मरणानंतर भोगत असती जे सामान्य जन
खरेखुरे त्यागी ज्यांनी ना धरिला अभिलाष
कर्मफलांच्या सुखदुखांचा त्यांसि न हो स्पर्श १२

पाच कारणे कर्मसिध्दिची वेदान्ती वर्णन
महाबाहु घे समजुन जी मी पुढे कथन करिन १३

जागा, कर्ता, साधन, आणिक यत्न, आणि दैव
ही असती ती पाच कारणे घे ध्यानी, पांडव १४

कायावाचामने करी कर्मे जि मनुज प्राणी
योग्य असो वा अयोग्य घडती याच कारणांनी १५

तरिही ज्याला वाटे की तो स्वत:च कर्ता असे
निर्विवाद तो मूढमती जो यथार्थ पाहत नसे १६

निरहंकारी अलिप्तबुध्दी असा पुरूष जगती
मारिल सर्वां तरि ठरेल ना मारेकरि संप्रती १७

कर्माला प्रवृत्त करति रे ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता
अन् कर्माचे घटक साधने, कर्म, आणि कर्ता १८

त्रिगुणांच्या अनुषंगे कर्ता, कर्म, ज्ञान यांचे
तीन भेद असती कथितो तुज श्रवण करायाते १९

(ज्ञान)
विभक्त सार्‍या जीवांमाजी तत्व राहि एक
असे ज्ञान जे सांगे त्याला समजावे सात्विक २०

ज्यायोगाने भिन्न शरीरी भिन्न जीव दिसती
त्या ज्ञानाला राजस ऐशा नावे संबोधती २१

एका कर्मी आसक्ती सर्वस्व मानुनी त्यासी
ज्या योगे ठेवी मानव ते अल्पज्ञान तामसी २२

(कर्म)
नियत कर्म आसक्ती आणि प्रीतिद्वेषविरहित
फलेच्छेविना केले तर ते सात्विक ऐसे ख्यात २३

फलाभिलाषा धरूनि आणि महत्प्रयासें केले
अहंकारपूर्वक त्या कर्मा राजसात गणलेले २४

मोहापोटी हिंसापूर्वक अन् ना जाणुनि कुवत
केलेले जे कर्म पार्थ, ते तामस म्हणुनी ज्ञात २५

(कर्ता)
अनासक्त अन निरहंकारी, उत्साही, संतुष्ट
कार्य सिध्द हो वा न हो तरी कधी न होई रूष्ट
आणि जो निर्विकार राहुनि कर्मे नियत करी
त्याला सात्विक कर्ता ऐसी मिळे उपाधी खरी २६

प्रीति हर्ष वा शोकलिप्त कर्ता जो हिंसाचारी
कर्मफलेच्छू अपवित्राला राजस म्हणती सारी २७

चंचलबुध्दी, अज्ञ, मानि, ठग, चेंगट अन् आळशी
अशा दुर्मुखी कर्त्याला जन मानतात तामसी २८

बुध्दी अन् धैर्यामध्येही त्रिगुणानुसार फरक
पूर्णपणे पण वेगवेगळे वर्णन करतो ऐक २९

उचित आणखी अनुचितात वा भय अन धैर्यामधी
बंध मुक्तितिल भेद दाविते ती सात्विक बुध्दी ३०

धर्म आणखी अधर्म किंवा अकार्य अन कार्य
यथार्थतेने जी न जाणते ती राजस पार्थ ३१

धर्मच मानी अधर्मास जी अज्ञानापोटी
सर्व अर्थ उलटाच लावते ती तामसवृत्ती ३२

अढळपणाने करवि प्राण-मन-इंद्रिय आचार
त्या धैर्या ओळखले जाते सात्विक, धनुर्धर ३३

ज्या धडाडिने धर्म, अर्थ अन् कामहि अनुसरती
धैर्य समज राजस ते, धरवी फलकांक्षा चित्ती ३४

ज्या दुर्मतिने खेद, शोक, भय, स्वप्न, गर्व होय
त्या धारिष्टया म्हटले जाते तामस, धनंजय ३५

हे भरतर्षभ, सौख्याचेही तीन प्रकार ऐक
अभ्यासाने रमे जीव अन समाप्त हो दु:ख ३६

असे सौख्य प्रारंभि विषासम अमॄतमय अंती
आत्मज्ञानातुन उपजे त्या सात्विक सुख म्हणती ३७

विषयांच्या भोगातुन भासे अमॄतमय आधी
पण विषमय हो अंती, त्या सुखा राजस हि उपाधी ३८

जे आरंभी आणि अंतिही मोहप्रद असते
निद्रा आळस कर्तव्यच्युती यातुन उद्भवते
(कनिष्ठतम या स्तरावरी होते याची गणती)
अशा सुखाला कुंतिनंदना, तामससुख म्हणती ३९

पॄथ्वी, नभ, सुरलोकामधिही त्रिगुणातुन मुक्त
असे काहिही नसते पार्था, हे शाश्वत सत्य ४०

द्विज, क्षत्रिय अन् वैश्य शूद्र या सर्वांची कर्मे
वेगवेगळी ठरली त्यांच्या स्वभावगुणधर्मे ४१

शम, दम, तप, शुचिता, शांती, नम्रता नि विज्ञान
ही कर्मे ब्राम्हणासाठिची स्वभावत: योजून ४२

शौर्य, तेज, धाडस, जागरुकता, पद रोवुनि लढणे,
दानशूरता, नेतृत्व अशी क्षत्रियाचि लक्षणे ४३

कॄषि, गोरक्षण, व्यापार असे वैश्याचे कार्य
सेवा द्विज-क्षत्रिय-वैश्याची शूद्राचे कर्तव्य ४४

आपआपल्या कर्तव्यातुन मनुज सिध्दि पावे
कसा काय ते वर्णन करतो पार्था, ऐकावे ४५

ज्याच्यायोगे हे जग सारे जन्मुनि विस्तारते
त्याला पुजता स्वकर्म करूनी सिध्दी मग लाभते ४६

नियत कर्म आपुले करावे जरी दोषपूर्ण
परक्याचे ना करण्या जावे येइ जरी पूर्ण
स्वभावत: ज्याची त्याची जी कर्मे योजियलेली
तीच करावी कधीच ना ती पापकारि ठरली ४७

कौंतेया, स्वाभाविक कर्मे सदोष तरि ना टाळ
दोषयुक्त असती कर्मे जैं धूम्राच्छादित जाळ ४८

आत्मसंयमी निरिच्छ मनुजाला होते प्राप्ती
संन्यासातुन परमोच्च अशी कर्मबंधमुक्ती ४९

कौंतेया, कैसा मिळवी नर परं ब्रम्ह स्थान
ऐक सांगतो संक्षेपाने दिव्य असे ज्ञान ५०

शुध्दबुध्दिने युक्त आणखी ठाम निग्रहाचा,
प्रेम-द्वेषवाणी त्यजुनी करि त्याग वासनांचा, ५१

मिताहारि राही एकांति विरक्ति बाणवुन,
कायावाचामने निश्चये राहि ध्यानमग्न, ५२

अहंकार, बल, गर्व, क्रोध अन् कामवासनांना
दूर सारूनी सदैव ठेवी शांत आपुल्या मना,
असाच मानव, हे कौंतेया, हो मिळण्या पात्र
परं ब्रम्ह स्थानाचा अनुभव आणिक अधिकार ५३

अधिकारि असा प्रसन्नमन अन् निरिच्छ, निर्मोही
सर्वां लेखि समान अन माझ्या समीप येई ५४

भक्तीने जाणी मजला मी कोण आणखी कसा
अन् त्यानंतर सामावी मम हृदयी पुरूष असा ५५

सदैव राही रत कर्मामधि मम आश्रय घेउन
अशा नरा मम कॄपेतुनी हो प्राप्त परं स्थान ५६

मनापासुनी मज अर्पण कर तुझे नित्य कॄत्य
समबुध्दीने माझ्या ठायी लीन ठेवुनी चित्त ५७

माझ्या ठायी चित्त ठेवता मिळेल माझी कॄपा
आणि आपदांतुनी सार्‍या तू तरशिल परंतपा,
अहंकार धरूनी माझ्या वचना जर दुर्लक्षील
तर पार्था, हे ठाम समज, तू नाश पावशील ५८

‘न लढिन’ ऐसा अहंकार तू ठेवित असशील
व्यर्थ तरी तो, प्रकृती तुला लढण्या लावील ५९

मोहापोटी स्वाभाविक जे टाळु बघशी कार्य
अनिच्छा तरी ,स्वभावत: तुज करणे अनिवार्य ६०

भूतांच्या अंतरात ईश्वर निवास करूनि असे
अन् मायेने यंत्राजैसे तयां चाळवित बसे ६१

म्हणून भारता, जा सर्वस्वी ईश्वरास शरण
कृपेने तयाच्या मिळेल तुज परं शांतिस्थान ६२

तुला असे हे सांगितले मी गुह्यातिल गुह्य
विचार याचा करूनी करि तव इच्छित कर्तव्य ६३

जिवलग म्हणुनि पुन्हा सांगतो गुपितातिल गुपित
धनंजया, ते ऐक त्यामध्ये आहे तव हीत ६४

माझे चिंतन, माझी भक्ती, मजला वंदन करी
मी ईश्वर, तू प्रियतम, होशिल विलीन मम अंतरीं ६५

धर्मांचे अवडंबर सोडुनि मलाच ये शरण
भिऊ नको, मी नि:संशय तुज पापमुक्त करिन ६६
जो न तपस्वी, भक्ति ना करी, उदासीन ऐकण्या,
निंदी मजला, अशा कुणा हे जाउ नको सांगण्या ६७

जो गुपीत हे केवळ माझ्या भक्तांना सांगतो
परमभक्त होउन माझा तो मज येउन मिळतो ६८

असा भक्त प्रियकर दुसरा ना मानवात मिळणे
म्हणुनी शक्य न दुजा कुणि त्याच्याहुनि प्रिय असणे ६९

पार्था, आपुल्यामधल्या संवादाचे अध्ययन
करेल त्याने जणु यज्ञाने केले मम पूजन ७०

छिद्रान्वेशीपणा न करता श्रध्देने श्रवण
करेल तो पापमुक्त होइल कौंतेया, जाण
पापांमधुनी मनुष्य ऐसा मुक्ती मिळवेल
पुण्यात्म्यांच्या शुभलोकामधि जाउनि पोचेल ७१

एकअग्र चित्ताने, पार्था, ऐकलेस का सारे?
अज्ञानात्मक मोह तुझा मग लयास गेला ना रे? ७२

अर्जुन म्हणाला,
अच्युता, तुझ्या प्रसादामुळे मोह नष्ट झाला
भ्रम जाउनि मी तयार तव आदेशपालनाला ७३

संजय म्हणाला,
वासुदेव अन् पार्थामधले समग्र संभाषण
अद्भुत अन् रोमंचक ऐसे, मी केले श्रवण ७४

व्यासकॄपेने मला मिळाले ऐकाया गुपित
योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुना असताना सांगत ७५

पुन:पुन्हा आठवुनी मज तो कृष्णार्जुन संवाद
जो अद्भुत अन् पुण्यकारि मज होत असे मोद ७६

तसेच ते अति अद्भुत दर्शन हरिचे आठवुनी
विस्मय वाटुनि मोद होतसे मजसी फिरफिरूनी ७७

हे राजा, त्यामुळेच माझा ग्रह ऐसा बनला
जिथे कृष्ण तेथेच धनुर्धर, तिथेच जयमाला ७८

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय पूर्ण झाला
**********

‘पसायदान’

समंत दीप्तिमंत हो, कोणी कुठे न अडखळो
उजळून टाक विश्व तू, अंधार येथुनी पळो

सरली युगे युगांवरी, उद्धारिल्यास तू धरा
आम्ही सुपुत्र म्हणवितो, अन जाळतो वसुंधरा
करतो आहोत काय जे, वैफल्य त्यातले कळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो

हरएक प्रेषितामुले धर्मांध जाहलो आम्ही
ते धर्मकांड का हवे? मनुष्यधर्म का कमी ?
सारी तुझीच लेकरे हेच सत्य आकळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो

आता नको नवा कुणी, आचार्य, रबी वा मुनी
धाडू नकोस पुत्र तू, अथवा नको नवा नबी
अवतार तू स्वत:च घे, त्याचे सुचिन्ह आढळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो
**********
श्रीकॄष्णाला अर्पण.मुकुंद कर्णिक
पोस्ट बॉक्स २६२४३४
दुबई, संयुक्त अरब अमिराती

२८ मे, २००९

सतरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सतरावा अध्याय

अर्जुन म्हणाला,
विधिवत् ना तरि श्रध्दापूर्वक योगि यज्ञ करिती
निष्ठा त्यांची कशी गणावी? सात्विक, राजस, तमसी? १

श्री भगवान म्हणाले,
त्रिगुणांच्या अनुषंगे ठरते देहधारिची निष्ठा
ऐक कशी ते आतां सांगतो तुज मी, कुंतीसुता २

प्रकृतिस्वभावानुरूप श्रध्दा मनुजाची, भारत
ज्याची श्रध्दा जिथे तसा तो स्वत: असे घडत ३

सत्वगुणी पूजिति देवांना, राजस यक्षांना,
तामसगुणी जन वंदन करिती भूतप्रेत यांना ४

दंभ, गर्व ज्यांच्यामधि भरला अन् कामासक्ती
असे अडाणी शास्त्रबाह्य अन् घोर तपे आचरिती ५

अशा तपाने कष्टविती देहस्थ महाभूतां
अन् पर्यायाने मला, असति ते असुरवृत्ति, पार्था ६

आहाराचे जसे मानिती तीन विविध वर्ग
तसे यज्ञ, तप, दानाचेही, ऐक सांगतो मर्म ७

(आहार)
सत्वगुणींना प्रिय ऐसा आहार वाढवी प्रीती,
बल, समृध्दी, आरोग्य, आयु, सुख, सात्विकवृत्ती
पौष्टिक असुनी रसाळ आणि स्निग्ध असे अन्न
दीर्घकाल ठेविते मनाला शांत अन प्रसन्न ८

आंबट, खारट, कटू, झणझणित, तिखट, दाहकारक
अन्न आवडे राजसगुणीना, शोकरोगदायक ९

शिळे, निरस, दुर्गंधियुक्त अन सडलेले, उष्टे,
अपवित्र असे अन्न तामसी लोकां प्रिय असते १०

(यज्ञ)
आस फलाची न धरुन केला यज्ञ विधीपूर्वक
शांतपणे, संतुष्ट मने, तो यज्ञ असे सात्विक ११

दंभ माजवुन फलाभिलाषा धरुन होइ यजन
तो यज्ञ असे, भरतश्रेष्ठा, राजस हे जाण १२

कसाबसा उरकला यज्ञ, दक्षिणा प्रसाद न देता
मंत्रांवाचुन अन् श्रध्देवाचुन तो तामस, पार्था १३

(तप)
देव, ब्राम्हण, गुरु, विद्वज्जन यांना वंदुनिया
विशुध्द ब्रम्हाचरण, अहिंसापूर्ण तपश्चर्या
असेल केली नम्रपणाने जर पार्था, तर ती
शास्त्रामध्ये अशा तपाला ‘कायिक तप’ म्हणती १४

सत्यप्रिय हितकारि असुनी जे उद्वेगजनक नसे
अशा भाषणाला पार्था ‘वाङमय तप’ संज्ञा असे १५

प्रासन्नवृत्ती सौम्य स्वभाव अन मितभाषण, संयम,
शुध्द भावना, या सर्वांना ‘मानस तप’ नाम १६

तिन्हि प्रकारची तपे केलि जर निरिच्छ श्रध्देने
तर धनंजय, तपास त्या सात्विकांमधे गणणे १७

मानासाठी अथवा दांभिकतेपोटी केलेले
क्षणकालिक ते तप ठरते, त्या 'राजस' म्हटलेले १८

स्वत:स पीडाकारी अथवा इतरांही मारक
मूर्खपणे केलेले ऐसे तप 'तामस' नामक १९

(दान)
योग्य काळ स्थळ आणि पात्रता पूर्ण पारखून
परतफेडिची आस न धरता केलेले दान
पवित्र ऐसे कर्तव्यच ते मानुन केलेले
त्या दानाला 'सात्विक' ऐसे असते गणलेले २०

फेड म्हणुनि वा हेतु ठेवुनी वा नाराजीत
केल्या दानाला शास्त्रामधि 'राजस' म्हणतात २१

अयोग्य काळी , स्थळी, अपात्रा, अन् करुनि अवज्ञा
दिले दान, शास्त्रांत तयाला 'तामस' ही संज्ञा २२

ओम तत् सत् हे तीन शब्द परब्रम्ह वर्णितात
तसेच ब्राम्हण वेद यज्ञही त्यांत समाविष्ट २३

यज्ञ, दान, तप या सर्व क्रियांच्या आचरणात
ओम च्या शुभ उच्चाराने द्विज आरंभ करतात २४

तत् शब्दातुन सूचित होते निरपेक्षा वृत्ती
यज्ञ, दान, तप करताना तत् म्हणती मोक्षार्थी २५

‘असणे’ अन् ‘सात्विकता’ होते ‘सत्’ मधुनी व्यक्त
उचित अशी कर्मेही पार्था, सत् मधि गणतात २६

यज्ञ तपस्या दान यांमधी स्थिरवृत्ती सत् असते
त्यांच्यास्तव कर्तव्य कर्म जे तेही सत् ठरते २७

श्रध्दाविरहित यज्ञ, तपस्या, आणि अपात्री दान
असत् म्हणुनि त्यां ना येथे ना स्वर्लोकी स्थान २८

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सतरावा अध्याय पूर्ण झाला

२५ मे, २००९

सोळावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
दैवासुरसंपद्विभागयोग नावाचा सोळावा अध्याय

निर्भयता, सात्विकता आणि ज्ञानयोग पालन,
संयम, दातृत्व, नि यज्ञ, अन् तसेच वेदाध्ययन, १

सत्य, अहिंसा, शांति, त्याग, अन् उदार अशि बुध्दी,
दया, क्षमा, सौम्यता, विनय, दृढनिश्चय, अन् शुध्दी २

द्वेषभाव, मानाचि हाव, अन लोभापासुन मुक्त,
दैवी पुरूष, कौंतेया, असतो अशा गुणांनी युक्त ३

दांभिकता, औध्दत्य, गर्व, अभिमान, क्रोध निष्ठुरता
प्रवृत्ती या अशा असुरी अज्ञानासमवेता ४

दैवी गुणांची संपत्ती ही असे मोक्षदायक
असुरी प्रवृत्ती तर, पार्था, ठरे बंधकारक
जन्मजात तुज लाभली असे दैवी गुणसंपदा
तेव्हा, पार्था, करू नको तू कसलीही चिंता ५

दोन्हि जीव नांदति या लोकी, दैवी अन असुरी
दैवींबद्दल सांगुन झाले, ऐक कसे असुरी ६

काय करावे, काय करू नये असुर ना जाणती
शुचिर्भूतता, सत्य, सदाचरणाचि त्या न माहिती ७

असुरांलेखी जग खोटे अन आधाराविण असते
परमब्रम्ह ना येथे कोणी जगताचे निर्माते
उद्भव जगताचा झालासे विषयसुखाच्यापोटी
याहुन दुसरे काय प्रयोजन जगतोत्पत्तीसाठी ८

अशा विचारांचे, अल्पमती, असुर नष्टात्मे
जगताच्या नाशास्तव करती अहितकारि कर्मे ९

अशक्य ज्यांचे शमन अशा कामेच्छांच्या नादी
लागुन दांभिक, मदोन्मत्त, गर्विष्ठ असुर फंदी
भलभलत्या कल्पना करूनि मग पडती मोहात
पापाचरणे करण्याचे जणु घेती संतत व्रत १०

चिंतानी आमरण तयाना असे ग्रासलेले
कामेच्छांच्या पूर्तीसाठी सदा त्रासलेले ११

कामपूर्तिविण दुजे काहिही दिसते ना त्याना
शतसहस्त्र आशापाशांमधी गुरफटलेल्याना
असे कामक्रोधात परायण झालेले असुर
त्यास्तव अनुचित मार्गे करिती धनसंचय फार १२

‘हे’ धन माझे, ‘ते’ ही मिळविन ही त्यांची कांक्षा
आज असे ते उद्या वाढविन धरती अभिलाषा १३

या शत्रूला आज मारले, उद्या अधिक मारिन
मी ईश्वर, भोक्ताही मी, मी निश्चित बलवान १४

धनाढय मी, स्वजनात राहतो, मजसम ना कोण
यज्ञ करिन वा दान करिन वा करीन मी चैन १५

अशा फोल कल्पना बाळगुनि अज्ञानी, मोहित
कामातुर होउनिया पडती रौरव नरकात १६

आत्मतुष्ट, धनमानमदाने फुगलेले दांभिक
नावाला यज्ञयाग करिती अयोग्य विधीपूर्वक १७

असे अहंकारी, माजोरी, कामग्रस्त, असुर
द्वेष करूनि निंदती मला मी असता परमेश्वर १८

अशा नराधम, क्रूरात्म्याना, दुष्ट असुराना
टाकित असतो पापयोनिमधि मीच दुरात्म्याना १९

अशा योनिमधि जन्मोजन्मी खितपत ते पडती
कधि न करी मी जवळ तयां, ते अधमगतिस जाती २०

काम, क्रोध अन् लोभ ही तिन्ही दारे नरकाची
विनाशकारी म्हणुनी, पार्था, सदैव टाळायची २१

या दारांना टाळुनि नर जो करी तपश्चर्या
आत्मशुध्दि साधुनी परम पदि जाई, कौंतेया २२

शास्त्रविधींना देउन फाटा विषयसुखी वर्तती
ते परमगती, सिध्दी वा सुख काहीच ना मिळवती २३

शास्त्र सांगते योग्य काय अन अयोग्य कुठले कर्म
त्या आदेशानुसार कर्मे करणे हा तव धर्म २४

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
देवासुरसंपद्विभागयोग नावाचा सोळावा अध्याय पूर्ण झाला

१८ मे, २००९

पंधरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
पुरूषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय

वेदवाक्य ही पाने ज्याची, मुळे वरी, खाली फांद्या
अशा वडाच्या झाडां जे जाणती त्यां वेदज्ञ हि संज्ञा १

खाली वर शाखा, फुटती त्रिगुणांच्या पारंब्या त्याना
येती खाली कर्मबंधनी जखडायाला मनुजाना २

अशा स्वरूपी झाडाचे प्रत्यक्ष इथे दिसणे न घडे
आरंभ नि अस्तित्व अंतही ना त्याचा दृष्टीस पडे
घट्ट मुळाच्या या वृक्षाची हवी समाप्ती करावया
विरक्ततेच्या तलवारीने मुळासहित त्या छाटुनिया ३

अन् त्यानंतर ध्यास धरावा ब्रम्हसनातन तत्वाचा
ज्याच्या पासुन उपजे प्रवृत्ती त्या आदीपुरूषाचा
या करण्याने होइल प्राप्ति परम अशा त्या मोक्षाची
जेथुन घ्यावी ना लागे फेरी फिरफिरूनी जन्माची ४

मान, मोह, आसक्तीपासून खरोखरी असती मुक्त
अध्यात्माचे परिपालक अन् निरिच्छ बुध्दी असतात
सुखदु:खाच्या कल्पनांमधी सदैव राखिति स्थिरमती
असे ज्ञानिजन, धनंजया, अव्ययस्थानाजवळी जाती ५

जिथुन परतुनि यावे नलगे जन्माला, ऐसे स्थान
अग्नि, चंद्र वा सूर्य न लागे उजळाया ते मम सदन ६

पार्था माझा अंश राहतो व्यापुनि या इहलोकात
शरिरांमध्ये जीवरुपाने मनाइंद्रियांसमवेत ७

जिवा लाभता शरीर होतो षडेंद्रियांमधि रममाण
शरीर सुटता त्यांना संगे घेउन करितो निर्गमन
जैसा वारा पुष्पांपासुन गंधाला वाहुन नेतो
तसा जिवात्मा मनासवे पंचेंद्रियांस घेउन जातो ८

कान, नेत्र, कातडी, जिव्हा, अन् नाक, तसे मन मनुजाचे
यांच्या योगे भोग घेइ जिव शरीरामधुनी विषयांचे ९

हा शरीरामधि राहणारा अन निघून जाणारा जीव
विषयभोग घेई होता मनि त्रिगुणांचा प्रादुर्भाव
अशा जिवाला अज्ञानी जन कदापिही जाणु न शकती
ज्ञानचक्षुनी पाहू बघती तेच तयाला ओळखती १०

प्रयत्न करता योगी या जीवात्म्याला ओळखतात
पण लाख प्रयत्नांनंतरही ना जाणति जे जन असंस्कॄत ११

सूर्य, चंद्र, अग्नीचे तेज जे समस्त जगता उजळितसे
धनंजया, ध्यानि घे, तेज ते माझ्यामधुनिच उपजतसे १२

त्या तेजायोगे भूमीमधि प्रवेशदेखिल करि पार्थ
चंद्ररसाच्या रूपाने मी वनौषधींच्या पुष्टयर्थ १३

जठराग्नीच्या रूपाने मी प्राण्यांच्या देहात वसे
प्राण, अपान या वायूंने मी अन्न चतुर्विध पचवितसे १४

सर्वांच्या हृदि मी, मजपासुन मति, स्मृति, अन् विस्मृतिही
वेदांमधले ज्ञान मीच, अन् मी वेदांचा कर्ताही १५

क्षर अन् अक्षर दो प्रकारचे पुरूष इथे इहलोकात
जीव सर्व क्षर, मूलतत्व त्यांचे अक्षर ऐसे ख्यात १६

दोन्हीहुन वेगळा पुरूष उत्तम, त्या म्हणती परमात्मा
त्रिलोक व्यापुन राहे आणि पोषि तयासी तो आत्मा १७

क्षरापलिकडे आहे मी, अन् अक्षराहुनिही श्रेष्ठ
तरीच पुरूषोत्तम मज म्हणती त्रिलोकात अन् वेदात १८

पुरूषोत्तम मी, हे जो जाणी नि:शंकपणे, धनंजया
सर्वज्ञानी होउनि मजसि भजे भक्तिने पूर्णतया १९

गुपितामधले गुपीत ऐसे शास्त्र तुला जे कथिले मी
ते समजुन घेण्याने होइल कृतकृत्य बुध्दिमंतही २०

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
पुरूषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय पूर्ण झाला

१६ मे, २००९

चौदावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय

उत्तमातले उत्तम ऐसे ज्ञान सांगतो पुन: तुला
जे मिळता किति मुनिवर गेले परमसिध्दिच्या मोक्षाला १

या ज्ञानाचे सहाय्य घेउन मजसि पावती तादात्म्य
जन्ममृत्युच्या चक्रामधुनी विमुक्त होती‚ धनंजय २

महाब्रम्ह ही माझी योनी‚ गर्भ ठेवितो मी तीत
आणि भारता‚ जन्मा येर्ई त्यातुन हे सारे जगत ३

कौंतेया‚ सार्‍या योनींतुन जन्माला येती जीव
महाब्रम्ह योनींची योनी आणि मजकडे पितृत्व ४

प्रकृतीतल्या सत्वरजोतम या त्रिगुणांच्या संगाने
देहामधल्या जीवांवरती‚ पार्था‚ पडती नियंत्रणे ५

निर्मल अन् निर्दोष सत्व देई प्रकाश त्या जीवाना
सौख्यबंधने‚ ज्ञानबंधने पडती रे निष्पापमना ६

प्रीतीमधुनी रजोगुणाची उत्पत्ति असे‚ धनंजया‚
आकांक्षा अन् आसक्तीने बांधि जिवा तो‚ कौंतेया ७

अज्ञानातुन तम जन्मे जो पाडि जिवाला मोहात
तसेच आळस‚ निद्रा‚ आणिक प्रमाद यांच्या बंधात ८

सत्व सुखाने‚ रज कर्माने‚ तम अज्ञानावरणातून
प्रमाद करण्या भाग पाडिती जीवाला‚ कुंतिनंदन ९

तम नि रजाच्या पाडावाने सत्व कधी वरचढ होते‚
कधि तमसत्वावर रज आरूढ‚ रजसत्वापर तमहि तसे १०

सर्व इंद्रियांमधि ज्ञानाचा प्रकाश निर्मल जधि येतो
जाण‚ सत्वगुण त्या समयाला मनात वृध्दिंगत होतो ११

भरतश्रेष्ठा‚ रजोगुणप्रभावामधि लोभारंभ असे‚
कर्मकांड प्रिय बनुनी इच्छा अतृप्तीची वाढ वसे १२

तसे तमाने‚ हे कुरूनंदन‚ आळस अंगी बाणवतो
निष्क्रियता‚ मूर्खता‚ मोह यांच्या आहारी नर जातो १३

सात्विकता अंगिकारता मग जेव्हा होई देहान्त
मनुष्य जातो निर्मल ऐशा ज्ञानि मुनींच्या लोकात १४

रजोगुणातिल मृत्यूनंतर कर्मलिप्तसा जन्म पुन:
तमातल्या मरणाने निश्चित पशुयोनीमधि ये जनना १५

पुण्यकर्म फल सत्वामधले विशुध्द असते हे जाण
रजातले फल दु:खप्रद अन तमातले दे अज्ञान १६

सत्वामधुनी ज्ञानोत्पत्ती येई‚ लोभ रजामधुनी
प्रमाद आणि मोह तमातुन‚ तसेच अज्ञानहि येई १७

सात्विक पोचे उच्च स्तरावर‚ राजस खालोखाल वसे
घृणाकारि गुणवृत्ति तामसा अधोगतीची वाट असे १८

त्रिगुणांखेरिज करविता नसे दुजा कुणी हे कळे जया
त्या द्रष्टया सन्निधता माझी निश्चित लाभे‚ धनंजया १९

त्रिगुणांच्या पलिकडे पाहि जो असा देहधारी भक्त
जरा‚ दु:ख अन् जननमरण या चक्रातुन होई मुक्त २०

अर्जुन म्हणाला‚
देहधारि हा काय करोनी त्रिगुणाच्या जाई पार‚
कैसे लक्षण‚ कैसे वर्तन‚ त्याचे कथि मज‚ मुरलिधर २१

श्री भगवान म्हणाले‚
मनुजाला फळ प्राप्त असे जे सत्व‚ रज‚ नि तम त्रिगुणांचे
ना अव्हेरी‚ ना त्यांस्तव झुरी‚ हे वैशिष्टय असे त्याचे २२

उदासीन त्रिगुणांप्रत राही‚ होई न विचलित त्यांपायी
स्वीकारुनि अस्तित्व तयांचे अलिप्त त्यांपासुन राही २३

सुखदु:ख तसे प्रियअप्रिय वा स्तुतिनिंदा‚ मातीसोने
समान मानी ही सारी अन् स्वस्थ राही तो धैर्याने २४

तसेच मान‚ अपमान आणखी शत्रु‚ मित्र या दोन्हीत
भेद न मानी कर्मयोगी जो त्याला म्हणती गुणातित २५

एकनिष्ठ राहुनि माझ्याशी करि मम सेवा भक्तीने
अशा गुणातीतास लाभते ब्रम्हपदी स्थायिक होणे २६

अमर्त्य‚ अव्यय ब्रम्हाचे, भारता‚ अखेरीचे सदन
शाश्वत धर्माचे‚ सुखपरमावधिचे‚ मी आश्रयस्थान २७

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय पूर्ण झाला

१२ मे, २००९

तेरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा तेरावा अध्याय

अर्जुन म्हणाला‚
पुरूष‚ प्रकृती‚ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ‚ ज्ञेय‚ अन ज्ञान
काय सर्व हे मजसि कळावे मनिषा‚ मधुसूदन १

श्री भगवान म्हणाले‚
कौंतेया‚ या शरिरासच रे क्षेत्र असे म्हणती
अन शरिरा जाणी जो त्याची क्षेत्रज्ञ अशी ख्याती २

सार्‍या क्षेत्रांचा‚ पार्था‚ क्षेत्रज्ञ मीच हे जाण
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजे माझे ज्ञान ३

क्षेत्र काय‚ ते कसे असे‚ अन काय विकार तयाचे
कशी निर्मिती होई त्याची‚ कुणा ज्ञान हो त्याचे
क्षेत्रज्ञाचा प्रभाव कैसा क्षेत्रावरती पडतो
ऐक‚ पांडवा‚ थोडक्यात मी वर्णन आता करतो ४

कितीक ऋषिंनी गीतांद्वारे‚ छंदोबध्द रितीने
कितिक प्रकारे वर्णन याचे केले निश्चिततेने ५

पंच महाभूते‚ गर‚ मति‚ अन् अकरा इंद्रीयांच्या
द्वेषबुध्दि‚ सुखदु:खे‚ आणिक धैर्य‚ इच्छांच्या‚ ६

प्रकृति‚ आणि विकारांच्यासह जी ही चोविस तत्वे
या सार्‍या समुदायामधुनी क्षेत्र आकारा ये ७

विनम्रता‚ स्थिर‚ दंभरहित मति‚ सरळपणा‚ शुचिता‚
क्षमा‚ अहिंसा‚ गुरूसेवा‚ मननिग्रह‚ अन् ऋजुता‚ ८

निगर्वि वृत्ती‚ विषयविरक्ती‚ इंद्रियसंयमन
जनन‚ मरण‚ वार्धक्य‚ व्याधि या दोषांचे आकलन ९

कुटुंबीय अन घरदाराप्रती पूर्ण अनासक्ति
इष्टअनिष्टांच्या प्राप्तीमधि राहे समवृत्ती १०

अनन्यभावे अढळपणानें मम भक्ती करणे
जमाव टाळुन एकांताचा ध्यास मनी धरणे ११

अध्यात्माचा बोध तसा तत्वज्ञानाचा शोध
या सार्‍याचे नाव ज्ञान‚ रे‚ इतर सर्व दुर्बोध १२

आता सांगतो ज्ञेय काय ते ज्याने अमृत मिळते
ज्ञेय अनादि परंब्रम्ह जे सत् वा असत् हि नसते १३

हात‚ पाय‚ डोळे‚ डोकी‚ अन् तोंडे दाहि दिशाना
तसे सर्वव्यापी ज्ञेयाला कान सर्व बाजूना १४

ज्ञेयामध्ये सर्व इंद्रिये आभासात्मक असती
त्यांच्याविरहित निर्गुण तरि ते गुणभोक्ते गुणपती १५

चराचरांच्या अंतर्यामी अन् बाहेरहि ते आहे
जवळ असुनिही दूर सूक्ष्म तें कुणीहि त्यास ना पाहे १६

सर्वांभूती विभागून तरि ब्रम्ह असे अविभक्त
उद्गमदाते‚ प्रतिपालक‚ अन् तरि संहारक तत्व १७

अंधाराच्या पलीकडिल ते तेजहि तेजस्वीत
तेच ज्ञान अन् ज्ञेय तेच ते सर्वां हृदयी स्थित १८

पार्था‚ हे वर्णन मी केले क्षेत्र‚ ज्ञान‚ ज्ञेयाचे
जाणुन घेउन मम भक्तानें मजमधि समावयाचे १९

आता सांगतो‚ पुरूष‚ प्रकृती दोन्हि अनादी असती
प्रकृतीपासुन होते पार्था गुण विकार उत्पती २०

देह‚ इंद्रिये यांच्या करणी प्रकृतीतुनी होती
सुखदु:खाच्या उपभोगास्तव पुरूषाचि नियुक्ती २१

पुरूष प्रकृतीच्या संगातुन भोगी तिच्या गुणां
गुणोपभोगातुन मग येर्इ भल्याबुर्‍या जन्मा २२

देहामध्ये असतो साक्षी अनुमोदक भर्ता
तोच महेश्वर‚ परमात्माही तोच‚ जाणि‚ पार्था २३

पुरूष आणि प्रकृती गुणांसह हो ज्याला अवगत
कसेहि वर्तन असो तया ना पुनर्जन्म लागत २४

कोणी ध्यानाने अनुभवती आत्मा स्वत:तला
कुणी सांख्य वा कर्मयोग आचरून जाणती त्याला २५

अन्य कुणी ज्यां स्वत:स न कळे ऐकति लोकांचे
आणि भजति मज तेहि जाती तरूनि मरण साचे २६

चल वा अचल असे जे जे ते होई निर्माण
संयोगातुन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या जाण २७

सर्व भूतमात्रांच्या ठायी समानता पाही
सर्वांच्या नाशानंतरही अविनाशी राही
अशा परम ईश्वरास ज्याने मनोमनी पाहिले
त्याच महाभागाने‚ पाथा‚ ईशतत्व जाणिले २८

सर्वांमध्ये समानतेने राहणार्‍या ईश्वरा
जाणुनि रोखी मनास जाण्यापासुन हीन स्तरा
सन्मार्गावर चालुन आपुली घेइ करुन उन्नती
अशा महामन मानवास‚ रे‚ लाभे उत्तम गती २९

कर्मे उद्भवती प्रकृतीतुन, आत्मा नाकर्ता
हे जो जाणी तयें जाणिले खरे तत्व, पार्था ३०

प्राणीमात्रांतील विविधतेमधि पाही एकत्व
एकत्वातुन होई विस्तृती हे जाणी तत्व
विविधतेतुनी एकता तशी एकीतुन विस्तृती
या जाणीवे नंतर होते ब्रम्हाची प्राप्ती ३१

अनारंभ‚ निर्गुण‚ परमात्मा‚ जरी शरीरस्थ
कर्म ना करी आणि न होई कर्मदोषलिप्त ३२

जसे सर्वव्यापि नभ नसते सूक्ष्मसेहि लिप्त
तसाच आत्मा राही शरीरी अन् तरिहि अलिप्त ३३

एक सूर्य जैसा सार्‍या जगताला प्रकाशवी
तसाच‚ पार्था‚ सर्व शरीराला आत्मा उजळवी ३४

ज्ञानचक्षुनी भेद जाणिती क्षेत्र नि क्षेत्रज्ञाचा
आणि भौतिक प्रकृतिपासुन मार्गहि मोक्षाचा
ज्ञानाचे वापरून डोळे हे सारे बघती
महाभाग ते‚ कुंतिनंदना‚ ब्रम्हिभूत होती ३५

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा तेरावा अध्याय पूर्ण झाला