२२ एप्रिल, २००९

आठवा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अक्षरब्रम्हयोग
नावाचा आठवा अध्याय

अर्जुन म्हणाला‚
कर्म ब्रम्ह अध्यात्म कशाला म्हणती नारायणा?
कुणा म्हणावे अधिभूत तसे अधिदैवही कोणा? १

अधियज्ञ कसा अन् या देही कोणाचा वास?
कसे जाणता अंतिम क्षणि कुणी स्मरतो तुम्हास? २

श्री भगवान म्हणाले‚
जे अविनाशी तेच ब्रम्ह अन् स्वभाव अध्यात्म
चराचरांच्या उत्पत्तीचे कार्य हेच कर्म ३

नाशवंत अधिभूत आणि अधिदैव पुरूष चेतन
देहामध्ये वास करी जो तो मी अधियज्ञ ४

अंत:काली स्मरत मला जो त्यागी देहाला
सत्य हेच तू जाण, मिळे तो येउनिया मजला ५

करतो संतत ध्यान जयाचे तेच अंति आठवतो
कौंतेया, नर ऐसा नंतर त्या तत्वाला मिळतो ६

तेव्हा पार्था, युध्द करी तू मज स्मरता स्मरता
मिळशिल येउनि तूहि मला मनबुध्दी स्थिर धरता ७

शासनकर्ता, ज्ञानि, पुरातन, कर्ता अन् धर्ता
सूक्ष्म अणूहुन, अंधारामधि तेजपुंज सविता ८

अशा श्रेष्ठ पुरूषोत्तमास जो नर भक्तीने भजतो
योगबलाने निश्र्चयपूर्वक मनास स्थिर करतो ९

दो भुवयांच्यामध्ये आणुनि केंद्रित करी प्राण
अंत:काली करी दिव्य त्या पुरूषाचे स्मरण
ऐसा नर मग कुंतिनंदना त्या पुरूषाठायी
नि:संशय रे अंतानंतर विलीन होउन जाई १०

ज्ञानी ज्या म्हणती अविनाशी, यती प्रवेशति ज्यात
ब्रम्हचर्य पालन इच्छुन, जे सांगिन तुज संक्षिप्त ११

कायाविवरे आवरून मन हॄदयांतरि बांधती
प्राण मस्तकी आणुन नर जे योगहि आचरिती १२

ॐ काराच्या उच्चरणासह स्मरण मला करिती
आणि त्यागिती देह, तयांना मिळते उत्तम गती १३

अनन्यभावे सदासर्वदा स्मरतो नित्य मला
सुलभ होतसे माझी प्राप्ती ऐशा योग्याला १४

अशा प्रकारे मजप्रत येउनि जो योगी मिळतो
दु:खालय जो पुनर्जन्म, त्या घ्यावा ना लागतो १५

तिन्हि लोकांतुन कधी ना कधी येणे असते मागे
मिळाल्यावरी मज, कौंतेया पुनर्जन्म ना लागे १६

युगे हजारो मिळुनी ब्रम्हाचा हो एक दिन
रात्रही तशी हजारो युगे असे जाणिती जन १७

दिवस असा सुरू होता येती सारे जन्माला
आणिक होता सुरू रात्र ते जाती विलयाला १८

सर्व चराचर जन्मोजन्मी असे विवश असती
विलयानंतरच्या दिवशी मग पुन्हा जन्म घेती १९

या तत्वाच्या पलीकडे पण असे एक गोष्ट
भूतमात्र जाती विलया पण जी न होई नष्ट २०

या गोष्टीला ‘अक्षर’ संज्ञा जी अति परम गति
ती म्हणजे मम धाम, मिळे ज्या, त्या मिळते मुक्ती २१

ज्याच्या ठायी सर्व जीव, जो सर्व व्यापुनी राहे
परम् पुरूष तो अनन्य भक्तीनेच लाभताहे २२

योगी केव्हां मरण पावुनी घेती पुनरपि जन्म
आणिक केव्हा मरता होती मुक्त, सांगतो मर्म २३

उत्तरायनातिल षण्मासी, दिवसा, ज्वालेत,
शुक्ल पक्ष, यामध्ये मरता योगि होति मुक्त २४

दक्षिणायनातिल षण्मासी, रात्री, धूम्रात,
कृष्णपक्षामधिल मृतात्मा जन्म घेई परत
मृत्यूनंतर प्रथम जाई तो चंद्रलोकाला
पुण्य संपता पुनर्जन्म त्या लागे घ्यायाला २५

अशा प्रकारे शुक्ल, कृष्ण या शाश्वत गति जगती
एकीमध्ये पुनर्जन्म अन् दुसरीने मुक्ती २६

दोन्हीना जाणी जो योगी, होई मोहमुक्त
म्हणुनी, अर्जुना, सर्वकाल तू राहि योगयुक्त २७

सांगितलेल्या ह्मा तत्वाना जाणुन घेऊन
कर्मयोग आचरि जो योगी, हे कुंतीनंदन,
वेद, यज्ञ, तप, दान यातल्या पुण्यापलिकडचे
असे आद्य अन् परमस्थान जे, त्या जाउन पोचे २८

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अक्षरब्रम्हयोग नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा