१३ एप्रिल, २००९

चौथा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग
नावाचा चौथा अध्याय

श्री भगवान म्हणाले,
हा सांगितला योग प्रथम मी विवस्वान सूर्याला,
त्याने मनुला, मनुने नंतर स्वपुत्र ईक्ष्वाकूला १

तदनंतर मग परंपरेने इतराना कळला
काळाच्या उदरात पुढे तो गेला विलयाला २

तू माझा प्रिय भक्त अन् सखा असेच मी मानतो
म्हणुनी तोच पुरातन उत्तम योग तुला सांगतो ३

अर्जुन म्हणाला,
विवस्वान हा असे पुरातन, तुझा जन्म तर नवा
कसा भरवसा व्हावा त्याला कथिला योग तुवा ? ४

श्री भगवान म्हणाले,
तुझे नि माझे जन्म अर्जुना झाले रे अगणित
ज्ञात मला ते सर्व परंतु तुज नाही माहित ५

सर्व जिवांचा ईश्वर मी, जरि ना जन्मि ना मृत
स्वेच्छापूर्वक संभव घेतो याच प्रकृतीत ६

जेव्हा जेव्हा अवनीवरती धर्मर्‍हास होतो
अधर्मनाशास्तव मी तेव्हा जन्माला येतो ७

सज्जनरक्षण, कुकर्मनाशन, धर्मस्थापनार्थ
युगा युगातुनि जन्म घेउनी मी येतो, पार्थ ८

दिव्य असे मम जन्म, कर्म हे जाणवती ज्याला
पुर्नजन्म ना लागे त्याला, मिळे येउनी मला ९

माया भय अन् क्रोध त्यागुनी ठेवुनि विश्वास
विशुध्द बनलेले ज्ञानी मज आले मिळण्यास १०

करती माझी भक्ति अशी जे त्यांवरती प्रीती
करतो मी‚ ते येति सर्वश: मम मार्गावरती ११

इहलोकातच त्वरीत व्हावी सिध्दीची प्राप्ति
इच्छुनिया हे फल, पूजा देवांचि इथे करती १२

गुणकर्माअनुसार निर्मिले मी चारी वर्ण
त्यांचा कर्ता, तसेच भर्ता मीच असे जाण १३

कर्मबंध ना मजला, वा मी ना ठेवि फलाशा
हे जो जाणी त्या न बांधिती कर्म नि अभिलाषा १४

पूर्वी जैसी मोक्षेच्छूनी कर्मे आचरिली
तशिच अर्जना, तूहि करावी ती कर्मे आपुली १५

काय करावे, काय करू नये कठिण जाणण्यास
दाखवीन मी अशुभमुक्तीप्रद कर्मे करण्यास १६

कर्माकर्मामधिल भेद ना सोपा समजावा
कर्म, अकर्म नि दुष्कर्मातिल फरक कळुन घ्यावा १७

ज्याला दिसते कर्म अकर्मासम वा अकर्म कर्म
तो ज्ञानी, बुध्दिमान, जाणी कर्मांतिल मर्म १८

ज्याची सारी कर्मे असती कर्मफलेच्छेविना,
जाळी ज्ञानाग्नित कर्मे, तो ‘पंडित’ सकलजनां १९

फलप्राप्तीची आस सोडुनी निरिच्छ अन् तॄप्त
कर्म करी तरि प्रत्यक्षामधि राहि तो अलिप्त २०

आशाविरहित, चित्तसंयमित, शरीरधर्माची
कर्मे करी जो त्या न लागती पापे कर्माची २१

हर्षशोक, हेवेदावे अन् यशअपयश दोन्ही
समान समजुन कर्तव्य करी असा पुरूष ज्ञानी
दैवेच्छेने मिळे त्यात तो मानि समाधान
पापपुण्य कर्मांतिल त्याला ना ठरते बंधन २२

निरिच्छ अन् समबुध्दि ज्ञानि जे करी यज्ञकार्य
त्या कर्मातिल गुणदोषांचा होइ पूर्ण विलय २३

यज्ञार्पणहवि, यज्ञाग्नी, अन् हवन यज्ञकर्म
ब्रम्हरूप हे तिन्ही जो करी त्यास मिळे ब्रम्ह २४

देवांसाठी कोणी योगी यज्ञकार्य करिती
तर कोणी यज्ञाची पूजा यज्ञाने मांडती २५

नाक कान अन् दॄष्टी यांचा संयम पाळुनिया
उच्चारण करि त्या जिव्हेला आवर घालुनिया
एक प्रकारे या सर्वाचे असे हवन करुन
कोणी योगी आचरिती जे तेहि असे यजन २६

सर्व इंद्रियांच्या कर्मांचे ज्ञानाग्नित हवन
करिति कोणी तो असतो आत्मसंयमन यज्ञ २७

धन, तप, आत्माभ्यास असे कितितरी विविध यज्ञ
करीत असती पूर्णव्रताचरणी ऐसे सूज्ञ २८

श्वासोच्छवासावरी ठेवती ताबा मुनि काही
प्राणायामाच्या स्वरूपातिल यज्ञाचे आग्रही २९

अन्ननियोजन हेही कुणाला यज्ञासम ज्ञात
सर्व यज्ञकर्मी ऐसे हे असति पुण्यवंत ३०

यज्ञानंतर उरते अमृत तेच फक्त भोगिती
ते पुण्यात्मे परलोकामधि ब्रम्हस्थान मिळविती
यांपैकी एकही यज्ञ ना करती जे लोक
इहलोकातहि नाहि स्थान त्यां कुठून स्वर्लोक ? ३१

वेदांमध्ये या साय्रा यज्ञांचे वर्णन आहे
कर्मामधुनी जन्म तयांचा सत्य जाण तू हे
ब्रम्हमुखाने सांगितलेल्यावरती दे लक्ष
या सत्याचे आकलन होता पावशील मोक्ष ३२

धनयज्ञाहुन मोठि श्रेष्ठता ज्ञानयज्ञाची
ज्ञानसाधना करून होते प्राप्ती मोक्षाची ३३

वंदन आणिक सेवा करूनि विचार ज्ञानिजनां,
उपदेशाने देतिल तुजला ज्ञान, कुंतिनंदना ३४

त्या ज्ञानाच्या योगे होशिल तूहि मोहमुक्त
समाविष्ट दिसतील सर्व जिव तुझ्या नि माझ्यात ३५

आणि मानले जरि पाप्यांहुन तू पापी असशी
ज्ञानाच्या जोरावर जातिल विरून पापराशी ३६

समिधा अग्नीमधी टाकिता होति भस्मसात
तशा प्रकारे ज्ञान करी कर्मांचा नि:पात ३७

या अवनीवर पवित्र ज्ञानाहून नसे काही
सिध्दयोगि पुरूषाला याची जाणिव मग होई ३८

ज्ञान हे मिळे समत्वबुध्दी श्रध्दावंताना
ज्या योगे ते अखेर जाती चिरशांतिनिधाना ३९

अज्ञ आणि अश्रध्द संशयात्म्यांचा हो नाश
इहपरलोकी त्या न मिळे शांतीचा लवलेश ४०

आत्मज्ञान मिळवून फलेच्छा जो टाकी त्यजुनी
कर्मयोगि तो होइ मुक्त मग कर्मबंधनातुनी ४१

अज्ञानातुनि जन्मुनि वसतो मनात जो संशय
ज्ञानाच्या खड्गे छिंदुनि तो उठि रे धनंजय ४२

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा