०८ एप्रिल, २००९

पहिला अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अर्जुनविषादयोग
नावाचा पहिला अध्याय

धृतराष्ट्र म्हणाला,
पंडूच्या अन् अमुच्या पुत्रां होउन युध्दज्वर
करति काय कुरूक्षेत्री ते मी जाणाया आतुर १

संजय म्हणाला,
पांडवसेनेची झालेली रचना पाहून
भीष्माचार्यांसमीप जाउन वदला दुर्योधन २

'पहा गुरूवर, ठाकली इथे ही पांडवसेना
द्रुपदपुत्र तुमच्या शिष्याने केलि तिची रचना ३

यांत सात्यकी, द्रुपद महारथी, आणिक युयुधान
शूर धनुर्धर इतके जितके भीम अन् अर्जून ४

धृष्टकेतु, चेकितान, काशीराज, वीर्यवान,
पुरूजित, कुंतीभोज, शैब्य हे वीर धैर्यवान ५

युधामन्यु, विक्रांत आणखी उत्तमौज हे रथी
अभिमन्यू समवेत द्रौपदीपुत्रहि महारथी ६

आता अपुल्या सेनेमधल्या विशेष वीरांची
नावे मी सांगतो, लक्ष्य द्या, स्मृतीत ठेवायची ७

भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण, भूरिश्रव
वीर अन्यही स्वप्राणांवर उदार माझ्यास्तव ८, ९

अमर्याद सेना ही अमुची भीष्माच्या रक्षणीं
मर्यादित ती पांडवसेना भीम जिचा अग्रणी १०

व्यूहमुखे नेमून दिलेली लढवा, शूरांनो
सर्व दिशांनी भीष्मांना द्या रक्षण वीरांनो, ११

सुयोधनाला आनंदविण्या भीष्माचार्यानी
प्रतापवान् हा शंख फुंकिला सिंहनाद करूनि १२

लगेच भेर्‍या, शंख, नौबती या रणवाद्यांनी
करूनी तुंबळ नाद टाकिलें आसमन्त भरूनि १३

श्वेताश्वांच्या रथात बसल्या कॄष्णअर्जुनानी
प्रत्त्युत्तर मग दिले आपले दिव्य शंख फुकुनी १४

हृषिकेशाचा पांचजन्य, अन् देवदत्त पार्थाचा
पौंड्र नामक महाशंख तो बलिष्ठ भीमाचा १५

युधिष्ठिराचा अनंतविजय, सुघोष नकुलाचा
सहदेवाने नाद काढला मणीपुष्पकाचा १६

काशीराज, शिखंडि, सात्यकी, विराट अन् द्रुपद
धृष्टद्युम्न, अभिमन्यु आणखी द्रौपदिचे नंद १७

या सर्वांनी दणाणले मग नभ आणिक अवनी
पूर्ण स्वरानें आपआपले महाशंख फुंकुनी १८

तुंबळ नादे त्या विदारली कौरवांचि हृदये
सज्ज जाहले युध्दा ते, ओळखले धनंजये १९

हे धृतराष्ट्रा, हृषिकेशासी वदला मग पांडव
'दोन्ही सैन्यांमधे, अच्युता, रथ नेउनी ठेव २०

युध्दासाठी सज्ज जाहले लोक कोण कोण
कुणासवे मज लढायचे मी करीन अवलोकन २१, २२

दुर्बुध्दी दुर्योधन, त्याचे कोण साहयकर्ते
जमले येथे त्या सर्वां मज पाहू दे पुरते' २३

धनंजयाचे हे वच ऐकुन श्री हृषिकेशानी
दो सैन्यांच्या मधे ठेविला रथ मग नेऊनी २४

'भीष्म, द्रोण या आचार्यांसह सर्व वीर अन्य
पहा अर्जुना इथे उपस्थित' वदले श्रीकृष्ण २५

तेव्हा पार्था दिसले तेथे बंधु, आप्त, मित्र,
पिता, पितामह, श्वसुर, श्यालक, पुत्र तसे पौत्र २६

या सर्वांना पाहुनि तेथे दोन्ही सैन्यात
खिन्न मनाने, दीन वाणिने, वदला मग पार्थ २७

अर्जुन म्हणाला,
'हे सारे मम स्वकीय बघुनी युध्दोत्सुक येथे
शिथील पडती गात्रे माझी, मुखहि शुष्क होते २८

गांडिव हातातून निसटते अन् तनु थरकापते
राहावते ना उभे नि माझे मनही भिरभिरते २९

दिसति, केशवा, विपरित मजला युध्दातिल लक्षणे
कल्याणप्रद ठरेल कैसे स्वजनांना मारणे? ३०

नको विजय अन् नको राज्यही स्वजनां मारूनिया
उपभोगावे राज्य कसे रे जिवंत राहुनिया? ३१

ज्यांच्यासाठी सुखराशींची मनात अभिलाषा
पहा इथे ते उभे ठाकले त्यागुन जीवाशा ३२

पिता, पितामह, श्वसुर, श्यालक, पुत्र, पौत्र, प्रियजन
यांसर्वांसाठी तर धरतो राज्येच्छा आपण ३३

आम्हास मारावया जरी हे उभे ठाकले इथे
या सर्वांना मारून उरणे मनास ना पटते ३४


त्रैलोकाचे राज्य जरी मज मिळेल युध्दातुन
नको मिळाया त्रिलोक जर तो यांच्या मरणातुन ३५

मिळेल आम्हा काय जनार्दन कौरवांस मारूनी?
दुष्ट जरी ते, मारूनिया त्या आम्हि पापाचे धनी ३६

कौरव झाले तरि अपुले, मग कैसे मारावे?
स्वजनां मारून आम्ही पांडव सुखी कैसे व्हावे? ३७

बुध्दिभ्रष्ट अन् लोभी ते मित्रांशि द्रोह करिती
कुलनाशातिल पापाचीही त्यांना नाहि क्षिती ३८

आम्हाला परि कुलक्षयातिल भीषणता ज्ञात
का नाही मग टाळावा तो न पडुनि युध्दात? ३९

कुलक्षयाने विनाश पावे कुलधर्माचार
धर्माचारावाचुन माजे अधर्म जो स्वैर ४०

अधर्मातुनी कुलस्त्रियांमधी ये स्वैराचार
स्वैराचारी स्त्रियांकडुनि हो वर्णाचा संकर ४१

वर्णाच्या संकरामुळे कुल बुडते नरकात
पिंडोदक ना मिळून पूर्वज पडति रौरवात ४२

कुलबुडव्यांच्या संकरामुळे प्रचलित आचार
विस्मरले जाऊन त्या कुला उरे न आधार ४३

अशा कुलातिल मानव जातो निश्चित नरकात
आले आहे असे आजवर माझ्या श्रवणात ४४

ज्ञात असुनिही पाप काय जे स्वजन मारण्यात
राज्यसुखाच्या लोभाने का झालो प्रवृत्त ? ४५

यापेक्षा मी स्वस्थ रहातो टाकुनिया आयुधे
कल्याणच मम होइल कौरवहस्ते मरण्यामधे? ४६

बोलुनि इतके खालि ठेविले धनुष्य अन् बाण
अन् रथामधि बसुन राहिला खिन्नमने अर्जुन ४७

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अर्जुनविषादयोग नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा