२८ मे, २००९

सतरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सतरावा अध्याय

अर्जुन म्हणाला,
विधिवत् ना तरि श्रध्दापूर्वक योगि यज्ञ करिती
निष्ठा त्यांची कशी गणावी? सात्विक, राजस, तमसी? १

श्री भगवान म्हणाले,
त्रिगुणांच्या अनुषंगे ठरते देहधारिची निष्ठा
ऐक कशी ते आतां सांगतो तुज मी, कुंतीसुता २

प्रकृतिस्वभावानुरूप श्रध्दा मनुजाची, भारत
ज्याची श्रध्दा जिथे तसा तो स्वत: असे घडत ३

सत्वगुणी पूजिति देवांना, राजस यक्षांना,
तामसगुणी जन वंदन करिती भूतप्रेत यांना ४

दंभ, गर्व ज्यांच्यामधि भरला अन् कामासक्ती
असे अडाणी शास्त्रबाह्य अन् घोर तपे आचरिती ५

अशा तपाने कष्टविती देहस्थ महाभूतां
अन् पर्यायाने मला, असति ते असुरवृत्ति, पार्था ६

आहाराचे जसे मानिती तीन विविध वर्ग
तसे यज्ञ, तप, दानाचेही, ऐक सांगतो मर्म ७

(आहार)
सत्वगुणींना प्रिय ऐसा आहार वाढवी प्रीती,
बल, समृध्दी, आरोग्य, आयु, सुख, सात्विकवृत्ती
पौष्टिक असुनी रसाळ आणि स्निग्ध असे अन्न
दीर्घकाल ठेविते मनाला शांत अन प्रसन्न ८

आंबट, खारट, कटू, झणझणित, तिखट, दाहकारक
अन्न आवडे राजसगुणीना, शोकरोगदायक ९

शिळे, निरस, दुर्गंधियुक्त अन सडलेले, उष्टे,
अपवित्र असे अन्न तामसी लोकां प्रिय असते १०

(यज्ञ)
आस फलाची न धरुन केला यज्ञ विधीपूर्वक
शांतपणे, संतुष्ट मने, तो यज्ञ असे सात्विक ११

दंभ माजवुन फलाभिलाषा धरुन होइ यजन
तो यज्ञ असे, भरतश्रेष्ठा, राजस हे जाण १२

कसाबसा उरकला यज्ञ, दक्षिणा प्रसाद न देता
मंत्रांवाचुन अन् श्रध्देवाचुन तो तामस, पार्था १३

(तप)
देव, ब्राम्हण, गुरु, विद्वज्जन यांना वंदुनिया
विशुध्द ब्रम्हाचरण, अहिंसापूर्ण तपश्चर्या
असेल केली नम्रपणाने जर पार्था, तर ती
शास्त्रामध्ये अशा तपाला ‘कायिक तप’ म्हणती १४

सत्यप्रिय हितकारि असुनी जे उद्वेगजनक नसे
अशा भाषणाला पार्था ‘वाङमय तप’ संज्ञा असे १५

प्रासन्नवृत्ती सौम्य स्वभाव अन मितभाषण, संयम,
शुध्द भावना, या सर्वांना ‘मानस तप’ नाम १६

तिन्हि प्रकारची तपे केलि जर निरिच्छ श्रध्देने
तर धनंजय, तपास त्या सात्विकांमधे गणणे १७

मानासाठी अथवा दांभिकतेपोटी केलेले
क्षणकालिक ते तप ठरते, त्या 'राजस' म्हटलेले १८

स्वत:स पीडाकारी अथवा इतरांही मारक
मूर्खपणे केलेले ऐसे तप 'तामस' नामक १९

(दान)
योग्य काळ स्थळ आणि पात्रता पूर्ण पारखून
परतफेडिची आस न धरता केलेले दान
पवित्र ऐसे कर्तव्यच ते मानुन केलेले
त्या दानाला 'सात्विक' ऐसे असते गणलेले २०

फेड म्हणुनि वा हेतु ठेवुनी वा नाराजीत
केल्या दानाला शास्त्रामधि 'राजस' म्हणतात २१

अयोग्य काळी , स्थळी, अपात्रा, अन् करुनि अवज्ञा
दिले दान, शास्त्रांत तयाला 'तामस' ही संज्ञा २२

ओम तत् सत् हे तीन शब्द परब्रम्ह वर्णितात
तसेच ब्राम्हण वेद यज्ञही त्यांत समाविष्ट २३

यज्ञ, दान, तप या सर्व क्रियांच्या आचरणात
ओम च्या शुभ उच्चाराने द्विज आरंभ करतात २४

तत् शब्दातुन सूचित होते निरपेक्षा वृत्ती
यज्ञ, दान, तप करताना तत् म्हणती मोक्षार्थी २५

‘असणे’ अन् ‘सात्विकता’ होते ‘सत्’ मधुनी व्यक्त
उचित अशी कर्मेही पार्था, सत् मधि गणतात २६

यज्ञ तपस्या दान यांमधी स्थिरवृत्ती सत् असते
त्यांच्यास्तव कर्तव्य कर्म जे तेही सत् ठरते २७

श्रध्दाविरहित यज्ञ, तपस्या, आणि अपात्री दान
असत् म्हणुनि त्यां ना येथे ना स्वर्लोकी स्थान २८

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सतरावा अध्याय पूर्ण झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा