इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा तेरावा अध्याय
अर्जुन म्हणाला‚
पुरूष‚ प्रकृती‚ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ‚ ज्ञेय‚ अन ज्ञान
काय सर्व हे मजसि कळावे मनिषा‚ मधुसूदन १
श्री भगवान म्हणाले‚
कौंतेया‚ या शरिरासच रे क्षेत्र असे म्हणती
अन शरिरा जाणी जो त्याची क्षेत्रज्ञ अशी ख्याती २
सार्या क्षेत्रांचा‚ पार्था‚ क्षेत्रज्ञ मीच हे जाण
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजे माझे ज्ञान ३
क्षेत्र काय‚ ते कसे असे‚ अन काय विकार तयाचे
कशी निर्मिती होई त्याची‚ कुणा ज्ञान हो त्याचे
क्षेत्रज्ञाचा प्रभाव कैसा क्षेत्रावरती पडतो
ऐक‚ पांडवा‚ थोडक्यात मी वर्णन आता करतो ४
कितीक ऋषिंनी गीतांद्वारे‚ छंदोबध्द रितीने
कितिक प्रकारे वर्णन याचे केले निश्चिततेने ५
पंच महाभूते‚ गर‚ मति‚ अन् अकरा इंद्रीयांच्या
द्वेषबुध्दि‚ सुखदु:खे‚ आणिक धैर्य‚ इच्छांच्या‚ ६
प्रकृति‚ आणि विकारांच्यासह जी ही चोविस तत्वे
या सार्या समुदायामधुनी क्षेत्र आकारा ये ७
विनम्रता‚ स्थिर‚ दंभरहित मति‚ सरळपणा‚ शुचिता‚
क्षमा‚ अहिंसा‚ गुरूसेवा‚ मननिग्रह‚ अन् ऋजुता‚ ८
निगर्वि वृत्ती‚ विषयविरक्ती‚ इंद्रियसंयमन
जनन‚ मरण‚ वार्धक्य‚ व्याधि या दोषांचे आकलन ९
कुटुंबीय अन घरदाराप्रती पूर्ण अनासक्ति
इष्टअनिष्टांच्या प्राप्तीमधि राहे समवृत्ती १०
अनन्यभावे अढळपणानें मम भक्ती करणे
जमाव टाळुन एकांताचा ध्यास मनी धरणे ११
अध्यात्माचा बोध तसा तत्वज्ञानाचा शोध
या सार्याचे नाव ज्ञान‚ रे‚ इतर सर्व दुर्बोध १२
आता सांगतो ज्ञेय काय ते ज्याने अमृत मिळते
ज्ञेय अनादि परंब्रम्ह जे सत् वा असत् हि नसते १३
हात‚ पाय‚ डोळे‚ डोकी‚ अन् तोंडे दाहि दिशाना
तसे सर्वव्यापी ज्ञेयाला कान सर्व बाजूना १४
ज्ञेयामध्ये सर्व इंद्रिये आभासात्मक असती
त्यांच्याविरहित निर्गुण तरि ते गुणभोक्ते गुणपती १५
चराचरांच्या अंतर्यामी अन् बाहेरहि ते आहे
जवळ असुनिही दूर सूक्ष्म तें कुणीहि त्यास ना पाहे १६
सर्वांभूती विभागून तरि ब्रम्ह असे अविभक्त
उद्गमदाते‚ प्रतिपालक‚ अन् तरि संहारक तत्व १७
अंधाराच्या पलीकडिल ते तेजहि तेजस्वीत
तेच ज्ञान अन् ज्ञेय तेच ते सर्वां हृदयी स्थित १८
पार्था‚ हे वर्णन मी केले क्षेत्र‚ ज्ञान‚ ज्ञेयाचे
जाणुन घेउन मम भक्तानें मजमधि समावयाचे १९
आता सांगतो‚ पुरूष‚ प्रकृती दोन्हि अनादी असती
प्रकृतीपासुन होते पार्था गुण विकार उत्पती २०
देह‚ इंद्रिये यांच्या करणी प्रकृतीतुनी होती
सुखदु:खाच्या उपभोगास्तव पुरूषाचि नियुक्ती २१
पुरूष प्रकृतीच्या संगातुन भोगी तिच्या गुणां
गुणोपभोगातुन मग येर्इ भल्याबुर्या जन्मा २२
देहामध्ये असतो साक्षी अनुमोदक भर्ता
तोच महेश्वर‚ परमात्माही तोच‚ जाणि‚ पार्था २३
पुरूष आणि प्रकृती गुणांसह हो ज्याला अवगत
कसेहि वर्तन असो तया ना पुनर्जन्म लागत २४
कोणी ध्यानाने अनुभवती आत्मा स्वत:तला
कुणी सांख्य वा कर्मयोग आचरून जाणती त्याला २५
अन्य कुणी ज्यां स्वत:स न कळे ऐकति लोकांचे
आणि भजति मज तेहि जाती तरूनि मरण साचे २६
चल वा अचल असे जे जे ते होई निर्माण
संयोगातुन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या जाण २७
सर्व भूतमात्रांच्या ठायी समानता पाही
सर्वांच्या नाशानंतरही अविनाशी राही
अशा परम ईश्वरास ज्याने मनोमनी पाहिले
त्याच महाभागाने‚ पाथा‚ ईशतत्व जाणिले २८
सर्वांमध्ये समानतेने राहणार्या ईश्वरा
जाणुनि रोखी मनास जाण्यापासुन हीन स्तरा
सन्मार्गावर चालुन आपुली घेइ करुन उन्नती
अशा महामन मानवास‚ रे‚ लाभे उत्तम गती २९
कर्मे उद्भवती प्रकृतीतुन, आत्मा नाकर्ता
हे जो जाणी तयें जाणिले खरे तत्व, पार्था ३०
प्राणीमात्रांतील विविधतेमधि पाही एकत्व
एकत्वातुन होई विस्तृती हे जाणी तत्व
विविधतेतुनी एकता तशी एकीतुन विस्तृती
या जाणीवे नंतर होते ब्रम्हाची प्राप्ती ३१
अनारंभ‚ निर्गुण‚ परमात्मा‚ जरी शरीरस्थ
कर्म ना करी आणि न होई कर्मदोषलिप्त ३२
जसे सर्वव्यापि नभ नसते सूक्ष्मसेहि लिप्त
तसाच आत्मा राही शरीरी अन् तरिहि अलिप्त ३३
एक सूर्य जैसा सार्या जगताला प्रकाशवी
तसाच‚ पार्था‚ सर्व शरीराला आत्मा उजळवी ३४
ज्ञानचक्षुनी भेद जाणिती क्षेत्र नि क्षेत्रज्ञाचा
आणि भौतिक प्रकृतिपासुन मार्गहि मोक्षाचा
ज्ञानाचे वापरून डोळे हे सारे बघती
महाभाग ते‚ कुंतिनंदना‚ ब्रम्हिभूत होती ३५
अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा तेरावा अध्याय पूर्ण झाला
१२ मे, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा