१९ एप्रिल, २००९

सातवा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय

माझ्या ठायी चित्त लावुनी माझ्या मदतीने
कर्मयोगामधली‚ पार्था‚ करता आचरणे
माझ्याविषयी मिळवशील जे नि:शंकित ज्ञान
त्याबद्दल मी सांगतो तुला आता करी श्रवण १

विज्ञानासह ज्ञानकथन मी करीन पूर्णतया
जे जाणुनि तुज अन्य काहि ना उरेल जाणाया २

हजारांमधी एक नर करी यत्न सिध्दिसाठी
अशामधि एकासच लाभे मजविषयी माहिती ३

पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू, नभ, मन, मति, गर्व
या आठांमधि विभागली मम प्रकृति रे पांडव ४

दुय्यम ही प्रकृती, हिच्याहुन श्रेष्ठ दुजी आहे
धनंजया जीवरी जगत् हे आधारून राहे ५

सर्व जीव हे या दोघीतुन होती उत्पन्न
मी जीवांचा आरंभ तसा मीच असे मरण ६

माझ्याखेरिज, हे धनंजया, दुजे काहि नाही
माळेमधि ओवल्या मण्यांसम सारे मज ठायी ७

पाण्यातिल रस, कौंतेया मी, शशिसूर्याची प्रभा‚
वेदांतिल ॐकार मी‚ तसा हुंकारहि मी नभा ८

पुरूषातिल पौरूष्य मीच, मी तेज अनलाचे
धरित्रिचा मी गंध, प्राण मी, तप मी तापसिचे ९

जाण अर्जुना, सर्व जिवांचे मीच असे बीज
बुध्दिमतांची बुध्दी अन् तेजस्वींचे तेज १०

विषयवासनाविरहित रे मी बलवंतांचे बल
भरतर्षभ, मी काम जिवां जो धर्मा अनुकूल ११

सात्विक, राजस, तामस हे जे गुण मनी वसती
मी न त्यामधि पण ते सारे माझ्यामधि असती १२

त्रिगुणांनी त्या मोहित होउनि हे सारे जगत
त्यापलिकडल्या मज परमात्म्या जाणुन ना घेत १३

ही दैवी त्रिगुणात्मक माया आहे अति दुस्तर
शरण मला येती ते तरूनि जाती तिच्या पार १४

या मायेतुन ज्ञान जयांचे झाले रे नष्ट
शरण मला ना येति नराधम, मूढ आणि दुष्ट १५

भजति मला ते चौघे, केलें पुण्यकर्म ज्यांनी
रोगग्रस्त, जिज्ञासु, धनार्थी, तसेच जे ज्ञानी १६

यांमध्येही भक्त, जयाने कर्मयोग जाणला
असा ज्ञानी, मी प्रिय त्याला, अन् तो प्रियतम मजला १७

हे सारे मम भक्त चांगले, तरि माझ्या ठायी
ज्ञानी, मज उत्तमगति जाणुन, सामावुनी जाई १८

अनेकदा जन्मुनि जो जाणी मी सर्वेसर्वा
आणि मिळे मज, असा महात्मा दुर्लभ रे पांडवा १९

अनेक लोभी आपआपले मत अनुसरतात
मजला सोडुनि अन्य दैवते नियमित भजतात २०

जो ज्या देवा वरती श्रध्दा ठेवाया बघतो
त्याला त्या श्रध्दास्थानाशी मीच स्थिर करतो २१

श्रध्दापूर्वक तो त्या देवाचे मग करि पूजन
मीच नेमलेले फल मिळवी त्या पूजेतून २२

फलप्राप्ती ही नाशवंत हे ना जाणति वेडे
ते त्या देवांकडे जाति, मम भक्त येति मजकडे २३

मूढांना ना कळत रूप मम शाश्वत, अव्यक्त
अज्ञानाच्या पोटी समजती मजला ते व्यक्त २४

मायाच्छादित स्वरूप माझे नाहि कुणा दृष्य
मूढ नेणिती की मी शाश्वत, अजन्म, अदृष्य २५

मृत, हयात, वा यायचेत, त्या सर्वा मी जाणी
आणि अर्जुना, तरीहि मजला जाणतो न कोणी २६

इच्छा द्वेषाच्या द्वंद्वातुन जन्मे जो मोह
त्या मोहाने भ्रमिष्ट होती रे सारे जीव २७

जे पुण्यात्मे या द्वंद्वातुन मुक्ति मिळवतात
ते दृढनिश्चयपूर्वक माझी भक्ती करतात २८

जन्ममृत्युच्या फेर्‍यातुन जे इच्छितात मुक्ती
माझ्या आधारे त्यां होई ब्रम्हज्ञानप्राप्ती २९

मी अधिभूत, मी अधिदैव, मीच अधियज्ञ
या विश्श्वासावरती करिती कर्मे जे सूज्ञ
ठामपणे ते सर्वेसर्वा मला मानतात
निर्वाणाच्या क्षणातही ते मलाच स्मरतात ३०

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय पूर्ण झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा