२४ ऑगस्ट, २००९

गणपतीची आरती

सुखकारक, दुखहारक, सन्मतिदायक, गणपती मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

प्राक्तनातले अरिष्ट नुरवी
प्रेमकृपेची धारा झरवी
वात्सल्याची वर्षा पुरवी
तू गणनायक, सिध्दिविनायक, सुबुध्दिदायक मोरया

राग लोभ अज्ञान काननी
गुरफटलो मज तार यांतुनी
अनन्य भावे शरण तुला मी
दे मज स्फूर्ती आणि सन्मती, अंति सद्गती मोरया

सर्वसाक्षि तू, तू वरदाता
तुजवाचुनि मज कुणी न त्राता
क्लेशांमधुनि सोडवि आता
नतमस्तक मी करित प्रार्थना हे गजवदना मोरया

०६ जून, २००९

अठरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय

अर्जुन म्हणाला,
पूर्ण कर्मसन्यास आणखी फलत्यागामधला
दोन्हिमधला फरक सांग तू, केषिनिषूदन, मला १

श्री भगवान म्हणाले,
ज्ञानी म्हणती पूर्ण कर्म सोडणे असे संन्यास
फलेच्छेविना कर्मे करणे त्याग हि संज्ञा त्यास २

दोषास्पद कर्मे टाळावी म्हणती काही ज्ञानी
यज्ञ, दान, तप कदापी न टाळावे म्हणती कोणी ३

त्यागामधले तत्व काय ते कथितो मी तुजला
तीन प्रकारे त्याग वर्णिला जातो, नरशार्दुला ४

यज्ञ, दान, तप त्यागु नये कधि हे निश्चित जाण
या कर्मांच्या आचरणाने पावन होती सुज्ञ ५

तरिहि फलाची धरू नये कधि या कर्मांतुन आशा
ठाम असे हे मत माझे, ना ठेवावी अभिलाषा ६

या नियमित कर्मांपासुन कधि घेउ नये संन्यास
मोहापायी घेतल्यास जन गणतिल त्या ‘तामस’ ७

नको कष्ट देहास म्हणुनि वा भीतीपोटी न्यास
केला या कर्मांचा तर तो त्याग विफल ‘राजस’ ८

अभिलाषांना त्यागुन केली नियमित कर्मे, पार्थ
तर त्या त्यागाला ‘सात्विक’ हे अभिधान ठरे सार्थ ९

अकुशल कर्मे नावडती अन् कुशल तितुकि आवडती
असे न मानी त्यागि पुरूष नि:शंकित ठेवुनि मती १०

देहधारिना अशक्य त्यजणे कर्मे पूर्णपणे
फलाभिलाषा त्यजती त्यांसच कर्मयोगी म्हणणे ११

इष्ट, अनिष्ट नि मिश्र अशी कर्माचि फळे तीन
मरणानंतर भोगत असती जे सामान्य जन
खरेखुरे त्यागी ज्यांनी ना धरिला अभिलाष
कर्मफलांच्या सुखदुखांचा त्यांसि न हो स्पर्श १२

पाच कारणे कर्मसिध्दिची वेदान्ती वर्णन
महाबाहु घे समजुन जी मी पुढे कथन करिन १३

जागा, कर्ता, साधन, आणिक यत्न, आणि दैव
ही असती ती पाच कारणे घे ध्यानी, पांडव १४

कायावाचामने करी कर्मे जि मनुज प्राणी
योग्य असो वा अयोग्य घडती याच कारणांनी १५

तरिही ज्याला वाटे की तो स्वत:च कर्ता असे
निर्विवाद तो मूढमती जो यथार्थ पाहत नसे १६

निरहंकारी अलिप्तबुध्दी असा पुरूष जगती
मारिल सर्वां तरि ठरेल ना मारेकरि संप्रती १७

कर्माला प्रवृत्त करति रे ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता
अन् कर्माचे घटक साधने, कर्म, आणि कर्ता १८

त्रिगुणांच्या अनुषंगे कर्ता, कर्म, ज्ञान यांचे
तीन भेद असती कथितो तुज श्रवण करायाते १९

(ज्ञान)
विभक्त सार्‍या जीवांमाजी तत्व राहि एक
असे ज्ञान जे सांगे त्याला समजावे सात्विक २०

ज्यायोगाने भिन्न शरीरी भिन्न जीव दिसती
त्या ज्ञानाला राजस ऐशा नावे संबोधती २१

एका कर्मी आसक्ती सर्वस्व मानुनी त्यासी
ज्या योगे ठेवी मानव ते अल्पज्ञान तामसी २२

(कर्म)
नियत कर्म आसक्ती आणि प्रीतिद्वेषविरहित
फलेच्छेविना केले तर ते सात्विक ऐसे ख्यात २३

फलाभिलाषा धरूनि आणि महत्प्रयासें केले
अहंकारपूर्वक त्या कर्मा राजसात गणलेले २४

मोहापोटी हिंसापूर्वक अन् ना जाणुनि कुवत
केलेले जे कर्म पार्थ, ते तामस म्हणुनी ज्ञात २५

(कर्ता)
अनासक्त अन निरहंकारी, उत्साही, संतुष्ट
कार्य सिध्द हो वा न हो तरी कधी न होई रूष्ट
आणि जो निर्विकार राहुनि कर्मे नियत करी
त्याला सात्विक कर्ता ऐसी मिळे उपाधी खरी २६

प्रीति हर्ष वा शोकलिप्त कर्ता जो हिंसाचारी
कर्मफलेच्छू अपवित्राला राजस म्हणती सारी २७

चंचलबुध्दी, अज्ञ, मानि, ठग, चेंगट अन् आळशी
अशा दुर्मुखी कर्त्याला जन मानतात तामसी २८

बुध्दी अन् धैर्यामध्येही त्रिगुणानुसार फरक
पूर्णपणे पण वेगवेगळे वर्णन करतो ऐक २९

उचित आणखी अनुचितात वा भय अन धैर्यामधी
बंध मुक्तितिल भेद दाविते ती सात्विक बुध्दी ३०

धर्म आणखी अधर्म किंवा अकार्य अन कार्य
यथार्थतेने जी न जाणते ती राजस पार्थ ३१

धर्मच मानी अधर्मास जी अज्ञानापोटी
सर्व अर्थ उलटाच लावते ती तामसवृत्ती ३२

अढळपणाने करवि प्राण-मन-इंद्रिय आचार
त्या धैर्या ओळखले जाते सात्विक, धनुर्धर ३३

ज्या धडाडिने धर्म, अर्थ अन् कामहि अनुसरती
धैर्य समज राजस ते, धरवी फलकांक्षा चित्ती ३४

ज्या दुर्मतिने खेद, शोक, भय, स्वप्न, गर्व होय
त्या धारिष्टया म्हटले जाते तामस, धनंजय ३५

हे भरतर्षभ, सौख्याचेही तीन प्रकार ऐक
अभ्यासाने रमे जीव अन समाप्त हो दु:ख ३६

असे सौख्य प्रारंभि विषासम अमॄतमय अंती
आत्मज्ञानातुन उपजे त्या सात्विक सुख म्हणती ३७

विषयांच्या भोगातुन भासे अमॄतमय आधी
पण विषमय हो अंती, त्या सुखा राजस हि उपाधी ३८

जे आरंभी आणि अंतिही मोहप्रद असते
निद्रा आळस कर्तव्यच्युती यातुन उद्भवते
(कनिष्ठतम या स्तरावरी होते याची गणती)
अशा सुखाला कुंतिनंदना, तामससुख म्हणती ३९

पॄथ्वी, नभ, सुरलोकामधिही त्रिगुणातुन मुक्त
असे काहिही नसते पार्था, हे शाश्वत सत्य ४०

द्विज, क्षत्रिय अन् वैश्य शूद्र या सर्वांची कर्मे
वेगवेगळी ठरली त्यांच्या स्वभावगुणधर्मे ४१

शम, दम, तप, शुचिता, शांती, नम्रता नि विज्ञान
ही कर्मे ब्राम्हणासाठिची स्वभावत: योजून ४२

शौर्य, तेज, धाडस, जागरुकता, पद रोवुनि लढणे,
दानशूरता, नेतृत्व अशी क्षत्रियाचि लक्षणे ४३

कॄषि, गोरक्षण, व्यापार असे वैश्याचे कार्य
सेवा द्विज-क्षत्रिय-वैश्याची शूद्राचे कर्तव्य ४४

आपआपल्या कर्तव्यातुन मनुज सिध्दि पावे
कसा काय ते वर्णन करतो पार्था, ऐकावे ४५

ज्याच्यायोगे हे जग सारे जन्मुनि विस्तारते
त्याला पुजता स्वकर्म करूनी सिध्दी मग लाभते ४६

नियत कर्म आपुले करावे जरी दोषपूर्ण
परक्याचे ना करण्या जावे येइ जरी पूर्ण
स्वभावत: ज्याची त्याची जी कर्मे योजियलेली
तीच करावी कधीच ना ती पापकारि ठरली ४७

कौंतेया, स्वाभाविक कर्मे सदोष तरि ना टाळ
दोषयुक्त असती कर्मे जैं धूम्राच्छादित जाळ ४८

आत्मसंयमी निरिच्छ मनुजाला होते प्राप्ती
संन्यासातुन परमोच्च अशी कर्मबंधमुक्ती ४९

कौंतेया, कैसा मिळवी नर परं ब्रम्ह स्थान
ऐक सांगतो संक्षेपाने दिव्य असे ज्ञान ५०

शुध्दबुध्दिने युक्त आणखी ठाम निग्रहाचा,
प्रेम-द्वेषवाणी त्यजुनी करि त्याग वासनांचा, ५१

मिताहारि राही एकांति विरक्ति बाणवुन,
कायावाचामने निश्चये राहि ध्यानमग्न, ५२

अहंकार, बल, गर्व, क्रोध अन् कामवासनांना
दूर सारूनी सदैव ठेवी शांत आपुल्या मना,
असाच मानव, हे कौंतेया, हो मिळण्या पात्र
परं ब्रम्ह स्थानाचा अनुभव आणिक अधिकार ५३

अधिकारि असा प्रसन्नमन अन् निरिच्छ, निर्मोही
सर्वां लेखि समान अन माझ्या समीप येई ५४

भक्तीने जाणी मजला मी कोण आणखी कसा
अन् त्यानंतर सामावी मम हृदयी पुरूष असा ५५

सदैव राही रत कर्मामधि मम आश्रय घेउन
अशा नरा मम कॄपेतुनी हो प्राप्त परं स्थान ५६

मनापासुनी मज अर्पण कर तुझे नित्य कॄत्य
समबुध्दीने माझ्या ठायी लीन ठेवुनी चित्त ५७

माझ्या ठायी चित्त ठेवता मिळेल माझी कॄपा
आणि आपदांतुनी सार्‍या तू तरशिल परंतपा,
अहंकार धरूनी माझ्या वचना जर दुर्लक्षील
तर पार्था, हे ठाम समज, तू नाश पावशील ५८

‘न लढिन’ ऐसा अहंकार तू ठेवित असशील
व्यर्थ तरी तो, प्रकृती तुला लढण्या लावील ५९

मोहापोटी स्वाभाविक जे टाळु बघशी कार्य
अनिच्छा तरी ,स्वभावत: तुज करणे अनिवार्य ६०

भूतांच्या अंतरात ईश्वर निवास करूनि असे
अन् मायेने यंत्राजैसे तयां चाळवित बसे ६१

म्हणून भारता, जा सर्वस्वी ईश्वरास शरण
कृपेने तयाच्या मिळेल तुज परं शांतिस्थान ६२

तुला असे हे सांगितले मी गुह्यातिल गुह्य
विचार याचा करूनी करि तव इच्छित कर्तव्य ६३

जिवलग म्हणुनि पुन्हा सांगतो गुपितातिल गुपित
धनंजया, ते ऐक त्यामध्ये आहे तव हीत ६४

माझे चिंतन, माझी भक्ती, मजला वंदन करी
मी ईश्वर, तू प्रियतम, होशिल विलीन मम अंतरीं ६५

धर्मांचे अवडंबर सोडुनि मलाच ये शरण
भिऊ नको, मी नि:संशय तुज पापमुक्त करिन ६६
जो न तपस्वी, भक्ति ना करी, उदासीन ऐकण्या,
निंदी मजला, अशा कुणा हे जाउ नको सांगण्या ६७

जो गुपीत हे केवळ माझ्या भक्तांना सांगतो
परमभक्त होउन माझा तो मज येउन मिळतो ६८

असा भक्त प्रियकर दुसरा ना मानवात मिळणे
म्हणुनी शक्य न दुजा कुणि त्याच्याहुनि प्रिय असणे ६९

पार्था, आपुल्यामधल्या संवादाचे अध्ययन
करेल त्याने जणु यज्ञाने केले मम पूजन ७०

छिद्रान्वेशीपणा न करता श्रध्देने श्रवण
करेल तो पापमुक्त होइल कौंतेया, जाण
पापांमधुनी मनुष्य ऐसा मुक्ती मिळवेल
पुण्यात्म्यांच्या शुभलोकामधि जाउनि पोचेल ७१

एकअग्र चित्ताने, पार्था, ऐकलेस का सारे?
अज्ञानात्मक मोह तुझा मग लयास गेला ना रे? ७२

अर्जुन म्हणाला,
अच्युता, तुझ्या प्रसादामुळे मोह नष्ट झाला
भ्रम जाउनि मी तयार तव आदेशपालनाला ७३

संजय म्हणाला,
वासुदेव अन् पार्थामधले समग्र संभाषण
अद्भुत अन् रोमंचक ऐसे, मी केले श्रवण ७४

व्यासकॄपेने मला मिळाले ऐकाया गुपित
योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुना असताना सांगत ७५

पुन:पुन्हा आठवुनी मज तो कृष्णार्जुन संवाद
जो अद्भुत अन् पुण्यकारि मज होत असे मोद ७६

तसेच ते अति अद्भुत दर्शन हरिचे आठवुनी
विस्मय वाटुनि मोद होतसे मजसी फिरफिरूनी ७७

हे राजा, त्यामुळेच माझा ग्रह ऐसा बनला
जिथे कृष्ण तेथेच धनुर्धर, तिथेच जयमाला ७८

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय पूर्ण झाला
**********

‘पसायदान’

समंत दीप्तिमंत हो, कोणी कुठे न अडखळो
उजळून टाक विश्व तू, अंधार येथुनी पळो

सरली युगे युगांवरी, उद्धारिल्यास तू धरा
आम्ही सुपुत्र म्हणवितो, अन जाळतो वसुंधरा
करतो आहोत काय जे, वैफल्य त्यातले कळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो

हरएक प्रेषितामुले धर्मांध जाहलो आम्ही
ते धर्मकांड का हवे? मनुष्यधर्म का कमी ?
सारी तुझीच लेकरे हेच सत्य आकळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो

आता नको नवा कुणी, आचार्य, रबी वा मुनी
धाडू नकोस पुत्र तू, अथवा नको नवा नबी
अवतार तू स्वत:च घे, त्याचे सुचिन्ह आढळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो
**********
श्रीकॄष्णाला अर्पण.



मुकुंद कर्णिक
पोस्ट बॉक्स २६२४३४
दुबई, संयुक्त अरब अमिराती

२८ मे, २००९

सतरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सतरावा अध्याय

अर्जुन म्हणाला,
विधिवत् ना तरि श्रध्दापूर्वक योगि यज्ञ करिती
निष्ठा त्यांची कशी गणावी? सात्विक, राजस, तमसी? १

श्री भगवान म्हणाले,
त्रिगुणांच्या अनुषंगे ठरते देहधारिची निष्ठा
ऐक कशी ते आतां सांगतो तुज मी, कुंतीसुता २

प्रकृतिस्वभावानुरूप श्रध्दा मनुजाची, भारत
ज्याची श्रध्दा जिथे तसा तो स्वत: असे घडत ३

सत्वगुणी पूजिति देवांना, राजस यक्षांना,
तामसगुणी जन वंदन करिती भूतप्रेत यांना ४

दंभ, गर्व ज्यांच्यामधि भरला अन् कामासक्ती
असे अडाणी शास्त्रबाह्य अन् घोर तपे आचरिती ५

अशा तपाने कष्टविती देहस्थ महाभूतां
अन् पर्यायाने मला, असति ते असुरवृत्ति, पार्था ६

आहाराचे जसे मानिती तीन विविध वर्ग
तसे यज्ञ, तप, दानाचेही, ऐक सांगतो मर्म ७

(आहार)
सत्वगुणींना प्रिय ऐसा आहार वाढवी प्रीती,
बल, समृध्दी, आरोग्य, आयु, सुख, सात्विकवृत्ती
पौष्टिक असुनी रसाळ आणि स्निग्ध असे अन्न
दीर्घकाल ठेविते मनाला शांत अन प्रसन्न ८

आंबट, खारट, कटू, झणझणित, तिखट, दाहकारक
अन्न आवडे राजसगुणीना, शोकरोगदायक ९

शिळे, निरस, दुर्गंधियुक्त अन सडलेले, उष्टे,
अपवित्र असे अन्न तामसी लोकां प्रिय असते १०

(यज्ञ)
आस फलाची न धरुन केला यज्ञ विधीपूर्वक
शांतपणे, संतुष्ट मने, तो यज्ञ असे सात्विक ११

दंभ माजवुन फलाभिलाषा धरुन होइ यजन
तो यज्ञ असे, भरतश्रेष्ठा, राजस हे जाण १२

कसाबसा उरकला यज्ञ, दक्षिणा प्रसाद न देता
मंत्रांवाचुन अन् श्रध्देवाचुन तो तामस, पार्था १३

(तप)
देव, ब्राम्हण, गुरु, विद्वज्जन यांना वंदुनिया
विशुध्द ब्रम्हाचरण, अहिंसापूर्ण तपश्चर्या
असेल केली नम्रपणाने जर पार्था, तर ती
शास्त्रामध्ये अशा तपाला ‘कायिक तप’ म्हणती १४

सत्यप्रिय हितकारि असुनी जे उद्वेगजनक नसे
अशा भाषणाला पार्था ‘वाङमय तप’ संज्ञा असे १५

प्रासन्नवृत्ती सौम्य स्वभाव अन मितभाषण, संयम,
शुध्द भावना, या सर्वांना ‘मानस तप’ नाम १६

तिन्हि प्रकारची तपे केलि जर निरिच्छ श्रध्देने
तर धनंजय, तपास त्या सात्विकांमधे गणणे १७

मानासाठी अथवा दांभिकतेपोटी केलेले
क्षणकालिक ते तप ठरते, त्या 'राजस' म्हटलेले १८

स्वत:स पीडाकारी अथवा इतरांही मारक
मूर्खपणे केलेले ऐसे तप 'तामस' नामक १९

(दान)
योग्य काळ स्थळ आणि पात्रता पूर्ण पारखून
परतफेडिची आस न धरता केलेले दान
पवित्र ऐसे कर्तव्यच ते मानुन केलेले
त्या दानाला 'सात्विक' ऐसे असते गणलेले २०

फेड म्हणुनि वा हेतु ठेवुनी वा नाराजीत
केल्या दानाला शास्त्रामधि 'राजस' म्हणतात २१

अयोग्य काळी , स्थळी, अपात्रा, अन् करुनि अवज्ञा
दिले दान, शास्त्रांत तयाला 'तामस' ही संज्ञा २२

ओम तत् सत् हे तीन शब्द परब्रम्ह वर्णितात
तसेच ब्राम्हण वेद यज्ञही त्यांत समाविष्ट २३

यज्ञ, दान, तप या सर्व क्रियांच्या आचरणात
ओम च्या शुभ उच्चाराने द्विज आरंभ करतात २४

तत् शब्दातुन सूचित होते निरपेक्षा वृत्ती
यज्ञ, दान, तप करताना तत् म्हणती मोक्षार्थी २५

‘असणे’ अन् ‘सात्विकता’ होते ‘सत्’ मधुनी व्यक्त
उचित अशी कर्मेही पार्था, सत् मधि गणतात २६

यज्ञ तपस्या दान यांमधी स्थिरवृत्ती सत् असते
त्यांच्यास्तव कर्तव्य कर्म जे तेही सत् ठरते २७

श्रध्दाविरहित यज्ञ, तपस्या, आणि अपात्री दान
असत् म्हणुनि त्यां ना येथे ना स्वर्लोकी स्थान २८

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सतरावा अध्याय पूर्ण झाला

२५ मे, २००९

सोळावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
दैवासुरसंपद्विभागयोग नावाचा सोळावा अध्याय

निर्भयता, सात्विकता आणि ज्ञानयोग पालन,
संयम, दातृत्व, नि यज्ञ, अन् तसेच वेदाध्ययन, १

सत्य, अहिंसा, शांति, त्याग, अन् उदार अशि बुध्दी,
दया, क्षमा, सौम्यता, विनय, दृढनिश्चय, अन् शुध्दी २

द्वेषभाव, मानाचि हाव, अन लोभापासुन मुक्त,
दैवी पुरूष, कौंतेया, असतो अशा गुणांनी युक्त ३

दांभिकता, औध्दत्य, गर्व, अभिमान, क्रोध निष्ठुरता
प्रवृत्ती या अशा असुरी अज्ञानासमवेता ४

दैवी गुणांची संपत्ती ही असे मोक्षदायक
असुरी प्रवृत्ती तर, पार्था, ठरे बंधकारक
जन्मजात तुज लाभली असे दैवी गुणसंपदा
तेव्हा, पार्था, करू नको तू कसलीही चिंता ५

दोन्हि जीव नांदति या लोकी, दैवी अन असुरी
दैवींबद्दल सांगुन झाले, ऐक कसे असुरी ६

काय करावे, काय करू नये असुर ना जाणती
शुचिर्भूतता, सत्य, सदाचरणाचि त्या न माहिती ७

असुरांलेखी जग खोटे अन आधाराविण असते
परमब्रम्ह ना येथे कोणी जगताचे निर्माते
उद्भव जगताचा झालासे विषयसुखाच्यापोटी
याहुन दुसरे काय प्रयोजन जगतोत्पत्तीसाठी ८

अशा विचारांचे, अल्पमती, असुर नष्टात्मे
जगताच्या नाशास्तव करती अहितकारि कर्मे ९

अशक्य ज्यांचे शमन अशा कामेच्छांच्या नादी
लागुन दांभिक, मदोन्मत्त, गर्विष्ठ असुर फंदी
भलभलत्या कल्पना करूनि मग पडती मोहात
पापाचरणे करण्याचे जणु घेती संतत व्रत १०

चिंतानी आमरण तयाना असे ग्रासलेले
कामेच्छांच्या पूर्तीसाठी सदा त्रासलेले ११

कामपूर्तिविण दुजे काहिही दिसते ना त्याना
शतसहस्त्र आशापाशांमधी गुरफटलेल्याना
असे कामक्रोधात परायण झालेले असुर
त्यास्तव अनुचित मार्गे करिती धनसंचय फार १२

‘हे’ धन माझे, ‘ते’ ही मिळविन ही त्यांची कांक्षा
आज असे ते उद्या वाढविन धरती अभिलाषा १३

या शत्रूला आज मारले, उद्या अधिक मारिन
मी ईश्वर, भोक्ताही मी, मी निश्चित बलवान १४

धनाढय मी, स्वजनात राहतो, मजसम ना कोण
यज्ञ करिन वा दान करिन वा करीन मी चैन १५

अशा फोल कल्पना बाळगुनि अज्ञानी, मोहित
कामातुर होउनिया पडती रौरव नरकात १६

आत्मतुष्ट, धनमानमदाने फुगलेले दांभिक
नावाला यज्ञयाग करिती अयोग्य विधीपूर्वक १७

असे अहंकारी, माजोरी, कामग्रस्त, असुर
द्वेष करूनि निंदती मला मी असता परमेश्वर १८

अशा नराधम, क्रूरात्म्याना, दुष्ट असुराना
टाकित असतो पापयोनिमधि मीच दुरात्म्याना १९

अशा योनिमधि जन्मोजन्मी खितपत ते पडती
कधि न करी मी जवळ तयां, ते अधमगतिस जाती २०

काम, क्रोध अन् लोभ ही तिन्ही दारे नरकाची
विनाशकारी म्हणुनी, पार्था, सदैव टाळायची २१

या दारांना टाळुनि नर जो करी तपश्चर्या
आत्मशुध्दि साधुनी परम पदि जाई, कौंतेया २२

शास्त्रविधींना देउन फाटा विषयसुखी वर्तती
ते परमगती, सिध्दी वा सुख काहीच ना मिळवती २३

शास्त्र सांगते योग्य काय अन अयोग्य कुठले कर्म
त्या आदेशानुसार कर्मे करणे हा तव धर्म २४

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
देवासुरसंपद्विभागयोग नावाचा सोळावा अध्याय पूर्ण झाला

१८ मे, २००९

पंधरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
पुरूषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय

वेदवाक्य ही पाने ज्याची, मुळे वरी, खाली फांद्या
अशा वडाच्या झाडां जे जाणती त्यां वेदज्ञ हि संज्ञा १

खाली वर शाखा, फुटती त्रिगुणांच्या पारंब्या त्याना
येती खाली कर्मबंधनी जखडायाला मनुजाना २

अशा स्वरूपी झाडाचे प्रत्यक्ष इथे दिसणे न घडे
आरंभ नि अस्तित्व अंतही ना त्याचा दृष्टीस पडे
घट्ट मुळाच्या या वृक्षाची हवी समाप्ती करावया
विरक्ततेच्या तलवारीने मुळासहित त्या छाटुनिया ३

अन् त्यानंतर ध्यास धरावा ब्रम्हसनातन तत्वाचा
ज्याच्या पासुन उपजे प्रवृत्ती त्या आदीपुरूषाचा
या करण्याने होइल प्राप्ति परम अशा त्या मोक्षाची
जेथुन घ्यावी ना लागे फेरी फिरफिरूनी जन्माची ४

मान, मोह, आसक्तीपासून खरोखरी असती मुक्त
अध्यात्माचे परिपालक अन् निरिच्छ बुध्दी असतात
सुखदु:खाच्या कल्पनांमधी सदैव राखिति स्थिरमती
असे ज्ञानिजन, धनंजया, अव्ययस्थानाजवळी जाती ५

जिथुन परतुनि यावे नलगे जन्माला, ऐसे स्थान
अग्नि, चंद्र वा सूर्य न लागे उजळाया ते मम सदन ६

पार्था माझा अंश राहतो व्यापुनि या इहलोकात
शरिरांमध्ये जीवरुपाने मनाइंद्रियांसमवेत ७

जिवा लाभता शरीर होतो षडेंद्रियांमधि रममाण
शरीर सुटता त्यांना संगे घेउन करितो निर्गमन
जैसा वारा पुष्पांपासुन गंधाला वाहुन नेतो
तसा जिवात्मा मनासवे पंचेंद्रियांस घेउन जातो ८

कान, नेत्र, कातडी, जिव्हा, अन् नाक, तसे मन मनुजाचे
यांच्या योगे भोग घेइ जिव शरीरामधुनी विषयांचे ९

हा शरीरामधि राहणारा अन निघून जाणारा जीव
विषयभोग घेई होता मनि त्रिगुणांचा प्रादुर्भाव
अशा जिवाला अज्ञानी जन कदापिही जाणु न शकती
ज्ञानचक्षुनी पाहू बघती तेच तयाला ओळखती १०

प्रयत्न करता योगी या जीवात्म्याला ओळखतात
पण लाख प्रयत्नांनंतरही ना जाणति जे जन असंस्कॄत ११

सूर्य, चंद्र, अग्नीचे तेज जे समस्त जगता उजळितसे
धनंजया, ध्यानि घे, तेज ते माझ्यामधुनिच उपजतसे १२

त्या तेजायोगे भूमीमधि प्रवेशदेखिल करि पार्थ
चंद्ररसाच्या रूपाने मी वनौषधींच्या पुष्टयर्थ १३

जठराग्नीच्या रूपाने मी प्राण्यांच्या देहात वसे
प्राण, अपान या वायूंने मी अन्न चतुर्विध पचवितसे १४

सर्वांच्या हृदि मी, मजपासुन मति, स्मृति, अन् विस्मृतिही
वेदांमधले ज्ञान मीच, अन् मी वेदांचा कर्ताही १५

क्षर अन् अक्षर दो प्रकारचे पुरूष इथे इहलोकात
जीव सर्व क्षर, मूलतत्व त्यांचे अक्षर ऐसे ख्यात १६

दोन्हीहुन वेगळा पुरूष उत्तम, त्या म्हणती परमात्मा
त्रिलोक व्यापुन राहे आणि पोषि तयासी तो आत्मा १७

क्षरापलिकडे आहे मी, अन् अक्षराहुनिही श्रेष्ठ
तरीच पुरूषोत्तम मज म्हणती त्रिलोकात अन् वेदात १८

पुरूषोत्तम मी, हे जो जाणी नि:शंकपणे, धनंजया
सर्वज्ञानी होउनि मजसि भजे भक्तिने पूर्णतया १९

गुपितामधले गुपीत ऐसे शास्त्र तुला जे कथिले मी
ते समजुन घेण्याने होइल कृतकृत्य बुध्दिमंतही २०

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
पुरूषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय पूर्ण झाला

१६ मे, २००९

चौदावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय

उत्तमातले उत्तम ऐसे ज्ञान सांगतो पुन: तुला
जे मिळता किति मुनिवर गेले परमसिध्दिच्या मोक्षाला १

या ज्ञानाचे सहाय्य घेउन मजसि पावती तादात्म्य
जन्ममृत्युच्या चक्रामधुनी विमुक्त होती‚ धनंजय २

महाब्रम्ह ही माझी योनी‚ गर्भ ठेवितो मी तीत
आणि भारता‚ जन्मा येर्ई त्यातुन हे सारे जगत ३

कौंतेया‚ सार्‍या योनींतुन जन्माला येती जीव
महाब्रम्ह योनींची योनी आणि मजकडे पितृत्व ४

प्रकृतीतल्या सत्वरजोतम या त्रिगुणांच्या संगाने
देहामधल्या जीवांवरती‚ पार्था‚ पडती नियंत्रणे ५

निर्मल अन् निर्दोष सत्व देई प्रकाश त्या जीवाना
सौख्यबंधने‚ ज्ञानबंधने पडती रे निष्पापमना ६

प्रीतीमधुनी रजोगुणाची उत्पत्ति असे‚ धनंजया‚
आकांक्षा अन् आसक्तीने बांधि जिवा तो‚ कौंतेया ७

अज्ञानातुन तम जन्मे जो पाडि जिवाला मोहात
तसेच आळस‚ निद्रा‚ आणिक प्रमाद यांच्या बंधात ८

सत्व सुखाने‚ रज कर्माने‚ तम अज्ञानावरणातून
प्रमाद करण्या भाग पाडिती जीवाला‚ कुंतिनंदन ९

तम नि रजाच्या पाडावाने सत्व कधी वरचढ होते‚
कधि तमसत्वावर रज आरूढ‚ रजसत्वापर तमहि तसे १०

सर्व इंद्रियांमधि ज्ञानाचा प्रकाश निर्मल जधि येतो
जाण‚ सत्वगुण त्या समयाला मनात वृध्दिंगत होतो ११

भरतश्रेष्ठा‚ रजोगुणप्रभावामधि लोभारंभ असे‚
कर्मकांड प्रिय बनुनी इच्छा अतृप्तीची वाढ वसे १२

तसे तमाने‚ हे कुरूनंदन‚ आळस अंगी बाणवतो
निष्क्रियता‚ मूर्खता‚ मोह यांच्या आहारी नर जातो १३

सात्विकता अंगिकारता मग जेव्हा होई देहान्त
मनुष्य जातो निर्मल ऐशा ज्ञानि मुनींच्या लोकात १४

रजोगुणातिल मृत्यूनंतर कर्मलिप्तसा जन्म पुन:
तमातल्या मरणाने निश्चित पशुयोनीमधि ये जनना १५

पुण्यकर्म फल सत्वामधले विशुध्द असते हे जाण
रजातले फल दु:खप्रद अन तमातले दे अज्ञान १६

सत्वामधुनी ज्ञानोत्पत्ती येई‚ लोभ रजामधुनी
प्रमाद आणि मोह तमातुन‚ तसेच अज्ञानहि येई १७

सात्विक पोचे उच्च स्तरावर‚ राजस खालोखाल वसे
घृणाकारि गुणवृत्ति तामसा अधोगतीची वाट असे १८

त्रिगुणांखेरिज करविता नसे दुजा कुणी हे कळे जया
त्या द्रष्टया सन्निधता माझी निश्चित लाभे‚ धनंजया १९

त्रिगुणांच्या पलिकडे पाहि जो असा देहधारी भक्त
जरा‚ दु:ख अन् जननमरण या चक्रातुन होई मुक्त २०

अर्जुन म्हणाला‚
देहधारि हा काय करोनी त्रिगुणाच्या जाई पार‚
कैसे लक्षण‚ कैसे वर्तन‚ त्याचे कथि मज‚ मुरलिधर २१

श्री भगवान म्हणाले‚
मनुजाला फळ प्राप्त असे जे सत्व‚ रज‚ नि तम त्रिगुणांचे
ना अव्हेरी‚ ना त्यांस्तव झुरी‚ हे वैशिष्टय असे त्याचे २२

उदासीन त्रिगुणांप्रत राही‚ होई न विचलित त्यांपायी
स्वीकारुनि अस्तित्व तयांचे अलिप्त त्यांपासुन राही २३

सुखदु:ख तसे प्रियअप्रिय वा स्तुतिनिंदा‚ मातीसोने
समान मानी ही सारी अन् स्वस्थ राही तो धैर्याने २४

तसेच मान‚ अपमान आणखी शत्रु‚ मित्र या दोन्हीत
भेद न मानी कर्मयोगी जो त्याला म्हणती गुणातित २५

एकनिष्ठ राहुनि माझ्याशी करि मम सेवा भक्तीने
अशा गुणातीतास लाभते ब्रम्हपदी स्थायिक होणे २६

अमर्त्य‚ अव्यय ब्रम्हाचे, भारता‚ अखेरीचे सदन
शाश्वत धर्माचे‚ सुखपरमावधिचे‚ मी आश्रयस्थान २७

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय पूर्ण झाला

१२ मे, २००९

तेरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा तेरावा अध्याय

अर्जुन म्हणाला‚
पुरूष‚ प्रकृती‚ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ‚ ज्ञेय‚ अन ज्ञान
काय सर्व हे मजसि कळावे मनिषा‚ मधुसूदन १

श्री भगवान म्हणाले‚
कौंतेया‚ या शरिरासच रे क्षेत्र असे म्हणती
अन शरिरा जाणी जो त्याची क्षेत्रज्ञ अशी ख्याती २

सार्‍या क्षेत्रांचा‚ पार्था‚ क्षेत्रज्ञ मीच हे जाण
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजे माझे ज्ञान ३

क्षेत्र काय‚ ते कसे असे‚ अन काय विकार तयाचे
कशी निर्मिती होई त्याची‚ कुणा ज्ञान हो त्याचे
क्षेत्रज्ञाचा प्रभाव कैसा क्षेत्रावरती पडतो
ऐक‚ पांडवा‚ थोडक्यात मी वर्णन आता करतो ४

कितीक ऋषिंनी गीतांद्वारे‚ छंदोबध्द रितीने
कितिक प्रकारे वर्णन याचे केले निश्चिततेने ५

पंच महाभूते‚ गर‚ मति‚ अन् अकरा इंद्रीयांच्या
द्वेषबुध्दि‚ सुखदु:खे‚ आणिक धैर्य‚ इच्छांच्या‚ ६

प्रकृति‚ आणि विकारांच्यासह जी ही चोविस तत्वे
या सार्‍या समुदायामधुनी क्षेत्र आकारा ये ७

विनम्रता‚ स्थिर‚ दंभरहित मति‚ सरळपणा‚ शुचिता‚
क्षमा‚ अहिंसा‚ गुरूसेवा‚ मननिग्रह‚ अन् ऋजुता‚ ८

निगर्वि वृत्ती‚ विषयविरक्ती‚ इंद्रियसंयमन
जनन‚ मरण‚ वार्धक्य‚ व्याधि या दोषांचे आकलन ९

कुटुंबीय अन घरदाराप्रती पूर्ण अनासक्ति
इष्टअनिष्टांच्या प्राप्तीमधि राहे समवृत्ती १०

अनन्यभावे अढळपणानें मम भक्ती करणे
जमाव टाळुन एकांताचा ध्यास मनी धरणे ११

अध्यात्माचा बोध तसा तत्वज्ञानाचा शोध
या सार्‍याचे नाव ज्ञान‚ रे‚ इतर सर्व दुर्बोध १२

आता सांगतो ज्ञेय काय ते ज्याने अमृत मिळते
ज्ञेय अनादि परंब्रम्ह जे सत् वा असत् हि नसते १३

हात‚ पाय‚ डोळे‚ डोकी‚ अन् तोंडे दाहि दिशाना
तसे सर्वव्यापी ज्ञेयाला कान सर्व बाजूना १४

ज्ञेयामध्ये सर्व इंद्रिये आभासात्मक असती
त्यांच्याविरहित निर्गुण तरि ते गुणभोक्ते गुणपती १५

चराचरांच्या अंतर्यामी अन् बाहेरहि ते आहे
जवळ असुनिही दूर सूक्ष्म तें कुणीहि त्यास ना पाहे १६

सर्वांभूती विभागून तरि ब्रम्ह असे अविभक्त
उद्गमदाते‚ प्रतिपालक‚ अन् तरि संहारक तत्व १७

अंधाराच्या पलीकडिल ते तेजहि तेजस्वीत
तेच ज्ञान अन् ज्ञेय तेच ते सर्वां हृदयी स्थित १८

पार्था‚ हे वर्णन मी केले क्षेत्र‚ ज्ञान‚ ज्ञेयाचे
जाणुन घेउन मम भक्तानें मजमधि समावयाचे १९

आता सांगतो‚ पुरूष‚ प्रकृती दोन्हि अनादी असती
प्रकृतीपासुन होते पार्था गुण विकार उत्पती २०

देह‚ इंद्रिये यांच्या करणी प्रकृतीतुनी होती
सुखदु:खाच्या उपभोगास्तव पुरूषाचि नियुक्ती २१

पुरूष प्रकृतीच्या संगातुन भोगी तिच्या गुणां
गुणोपभोगातुन मग येर्इ भल्याबुर्‍या जन्मा २२

देहामध्ये असतो साक्षी अनुमोदक भर्ता
तोच महेश्वर‚ परमात्माही तोच‚ जाणि‚ पार्था २३

पुरूष आणि प्रकृती गुणांसह हो ज्याला अवगत
कसेहि वर्तन असो तया ना पुनर्जन्म लागत २४

कोणी ध्यानाने अनुभवती आत्मा स्वत:तला
कुणी सांख्य वा कर्मयोग आचरून जाणती त्याला २५

अन्य कुणी ज्यां स्वत:स न कळे ऐकति लोकांचे
आणि भजति मज तेहि जाती तरूनि मरण साचे २६

चल वा अचल असे जे जे ते होई निर्माण
संयोगातुन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या जाण २७

सर्व भूतमात्रांच्या ठायी समानता पाही
सर्वांच्या नाशानंतरही अविनाशी राही
अशा परम ईश्वरास ज्याने मनोमनी पाहिले
त्याच महाभागाने‚ पाथा‚ ईशतत्व जाणिले २८

सर्वांमध्ये समानतेने राहणार्‍या ईश्वरा
जाणुनि रोखी मनास जाण्यापासुन हीन स्तरा
सन्मार्गावर चालुन आपुली घेइ करुन उन्नती
अशा महामन मानवास‚ रे‚ लाभे उत्तम गती २९

कर्मे उद्भवती प्रकृतीतुन, आत्मा नाकर्ता
हे जो जाणी तयें जाणिले खरे तत्व, पार्था ३०

प्राणीमात्रांतील विविधतेमधि पाही एकत्व
एकत्वातुन होई विस्तृती हे जाणी तत्व
विविधतेतुनी एकता तशी एकीतुन विस्तृती
या जाणीवे नंतर होते ब्रम्हाची प्राप्ती ३१

अनारंभ‚ निर्गुण‚ परमात्मा‚ जरी शरीरस्थ
कर्म ना करी आणि न होई कर्मदोषलिप्त ३२

जसे सर्वव्यापि नभ नसते सूक्ष्मसेहि लिप्त
तसाच आत्मा राही शरीरी अन् तरिहि अलिप्त ३३

एक सूर्य जैसा सार्‍या जगताला प्रकाशवी
तसाच‚ पार्था‚ सर्व शरीराला आत्मा उजळवी ३४

ज्ञानचक्षुनी भेद जाणिती क्षेत्र नि क्षेत्रज्ञाचा
आणि भौतिक प्रकृतिपासुन मार्गहि मोक्षाचा
ज्ञानाचे वापरून डोळे हे सारे बघती
महाभाग ते‚ कुंतिनंदना‚ ब्रम्हिभूत होती ३५

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा तेरावा अध्याय पूर्ण झाला

०५ मे, २००९

बारावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
भक्तियोग नावाचा बारावा अध्याय

अर्जुन म्हणाला‚
तुमची भक्ती सदैव करिती ते योगी, अथवा
योगी जे अव्यक्ताक्षर ब्रम्हा पुजती ते, केशवा?
या दोन्हीतिल श्रेष्ठ कोण ते मजसी सांगावे
योगाचा परिपूर्ण ज्ञानि कोणाला मानावे? १

श्री भगवान म्हणाले‚
माझ्या ठायी राहुनी मजला श्रध्देने भजतो
अशा कर्मयोग्या मी, पार्था, श्रेष्ठ योगि मानतो २

तरि, दर्शविता येइ न ऐशा अव्यक्ता भजती,
मूलभूत अन अचिंत्य अक्षर ब्रम्हाला पुजती, ३

इंद्रियनियमन करूनी जे समबुध्दि ठेवतात
असे भक्त ब्रम्हाचेही मज येउन मिळतात ४

मन ज्यांचे रमलेले असते अव्यक्ताठायी
देहधारींना त्या उपासना होइ कष्टदायी ५

अर्पण करती अपुलि सारी कर्मे मजलागी
अन् मज भजती अनन्यभावे असे कर्मयोगी ६

पार्था, त्याना मजठायी मी स्थान खचित देतो
विलंबाविना मर्त्यलोक मी त्यांचा सोडवितो ७

सुस्थिर माझ्या ठायि चित्त तू ठेवी, धनंजय,
अंती येउन मिळशिल मजला यात नसे संशय ८

आणि जरी असमर्थ ठेवण्या मजमधि स्थिर चित्त
उमेद धरूनी फिरून यत्न कर करण्या मज प्राप्त ९

वारंवार प्रयत्नांतीही अपयशि जर होशील
माझ्यासाठी कर्मे करूनी सिध्दि प्राप्त करशील १०

अन् हे सारे करण्यातहि तू असशिल असमर्थ
तर कर कर्मे त्यजुनि फलाशा स्थिरचित् बनण्यार्थ ११

यत्नापेक्षा ज्ञान श्रेष्ठ अन् ज्ञानाहुनि ध्यान
ध्यानाहुनही फलत्याग जो शांत करिल तव मन १२

द्वेषमुक्तसा मित्र, कॄपाळू ,सर्वां समान मानी
ममत्वबुध्दीविरहित संतत, निरहंकारी, ज्ञानी १३

सुखदु:खांप्रत निर्विकार जो दृढनिश्चयि, संयमी
असा भक्त जो नत मजसी त्यावर करि प्रीती मी १४

ज्या न टाळिती लोक आणि जो टाळि न लोकांना
हर्ष, क्रोध, भय, खेदापासुनि अलिप्त धरि भावना
असा भक्त जो कर्मफलाशामुक्त बनुनि राही
त्या माझ्या भक्तावर माझी प्रीति जडुनि राही १५

शुध्द, कुशल, निरपेक्ष, उदासिन सुख अन् दु:खामधी
फलदायक कर्मे त्यागी तो मम प्रियभक्तांमधी १६

हर्ष, खेद वा द्वेष, शोक अन् आकांक्षा टाळतो
शुभाशुभापलिकडे पाहतो तो मज आवडतो १७

शत्रु-मित्र, सन्मान-अवमान, अन शीत-उष्ण, सुख-दुख
दोन्हींमधि समभाव राखुनी राही नि:संग १८

स्तुतिनिंदेमधि राखी मौन अन् शांत, तुष्ट सतत
अनिकेत, स्थिरचित्त, भक्त मम प्रिय मज अत्यंत १९

हा जो मी सांगितला, पार्था, अमृतमय धर्म
श्रध्देने आचरिति भक्त ते होती मज प्रियतम २०

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
भक्तियोग नावाचा बारावा अध्याय पूर्ण झाला

३० एप्रिल, २००९

अकरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विश्वरूदर्शन नावाचा अकरावा अध्याय

अर्जुन म्हणाला‚
अध्यात्माची तुम्ही कथिलि जी परमगुह्म गोष्ट
अनुग्रहित मी, मोह मनातिल झालासे नष्ट १

कमलपत्रनेत्रा, जे मजला ऐकविले तुम्ही
जीवांची उत्पत्ति, विलय अन महानता तुमची २

हे पुरूषोत्तम रूप ईश्वरी तुमचे जे वर्णिता
पाहु इच्छितो ते, परमेशा, समक्ष मी आता ३

प्रभो, शक्य हे असेल तर ते रूप दाखवावे
दिव्य आणि अविनाशी रूपामधि दर्शन मज द्यावे ४

श्री भगवान म्हणाले‚
पहा अर्जुना, नाना रंगी, विविध आकारांची
शेकडोच का सहस्त्र ऐशी ही रूपे माझी ५

आदित्य, वसु अन् रूद्र, अश्विनी आणि मरूत्गण
पहा आज तू या सर्वांना दुर्लभ हे दर्शन ६

गुडाकेश, हे विश्व चराचर अन् जे जे वांछित
ते ते सारे एकत्र पहा या मम देहात ७

परंतु दिसणे दृष्टिस तुझिया अशक्य हे पार्थ,
म्हणुनी देतो दृष्टि दिव्य बघण्या मम सामर्थ्य ८

संजय म्हणाला
हे राजा, इतके बोलुनि मग योगेश्वर हरिने
विश्वरूप अपुले दाखविले पार्थासी त्याने ९

त्या रूपाला असंख्य तोंडे, नेत्रही अनेक
दिव्य आयुधे, अन् आभरणे अद्भुतशी चमक १०

विश्वमुखी त्या अनंत देही अनेक आश्चर्ये
दिव्य सुगंधी लेप, सुमनमाला नि दिव्य वसने ११

तेजस्वी कांती ऐसी त्या महान शक्तीची
हजार सूर्यांच्या तेजाहुनदेखिल जास्तीची १२

दिव्य अशा त्या रूपामध्ये पार्था ये दिसुन
विभागलेल्या विश्वाचे होउनि एकीकरण १३

शीर्ष नमवुनी वंदन करूनी मधुसूदनाला
चकीत अन् रोमांचित अर्जुन मग वदता झाला १४

श्रीकृष्णा, देही तव दिसति मजसि सर्व देव
कमलस्थित ब्रम्हाही जो देवांचा अधिदेव
प्राणिमात्र सारे दृग्गोचर होति एकसाथ
वासुकीसम दिव्य सर्पही साधूंसमवेत १५

अनेक बाहू, उदर, आनने, अनेक चक्षूही
सर्वतोपरी अनंत ऐसे रूप तव मी पाही
अंत, मध्य वा आरंभ कुठे तुझिया रूपाते
हे विश्वेश्वर, मज उमगेना कुठे पहावे ते १६

प्रदीप्तअग्नी अन् सूर्यासम अपार तेजस्वी
किरिट, गदा अन् चक्र धारिलेली तुमची हि छवी
साहु न शकती नेत्र प्रखरता रूपाची तुमच्या
तरी पाहतो जिकडे तिकडे तुम्हास, परमेशा १७

परब्रम्ह जे जाणुन घ्यावे असे मला वाटते
ते तुम्हीच अव्यय नि सनातन पुरूष मला गमते
शाश्वतधर्माचे रक्षकही तुम्हीच, भगवंता
समस्त विश्वासाठि तुम्हाविण नाहि कुणी त्राता १८

विनारंभ, मध्यान्ताविरहित, अनंतबाहु तुम्ही
चंद्रसूर्य हे नेत्र जयाचे आणिक मुख वन्ही
अती प्रखर तेजाने त्यांच्या विश्वा तापविता
अनंत शक्तिमान असे, भगवंता, मज दिसता १९

पॄथ्वी आणि आकाशातिल अंतर आणि दिशा
सर्व टाकले व्यापुन केवळ तुम्हीच, परमेशा
रूप भयंकर तव हे अदभुत प्रचंड अन् उग्र
पाहुन झाले त्रिलोक भयभित आणि गलितगात्र २०

देवांचे समुदाय तुमच्या ठायी प्रवेशती
भ्यालेले कुणि हात जोडुनी तुम्हाला प्रार्थिती
स्वस्ति, स्वस्ति करीत आणिक इतरहि स्तोत्रानी
तुमच्या स्तवनी रत झाले हे किती ऋषी अन् मुनी २१

रूद्र, वसु, आदित्य, साध्यगण अन् अश्विनिकुमर
तसेच विश्वेदेव, मरूत्, सुर, पितर, यक्ष, असुर
गंधर्वादिक सिध्दिदेवता अचंभीत होउनी
स्तब्ध राहिले विस्मयपूर्वक तुम्हां अवलोकुनी २२

अनेक डोळे, मुखे, भुजा, अन् मांडया, अन् पाय
विशाल पोटे कराल दाढा, रूप महाकाय
भयव्याकुल झाले सारे हे त्रिलोकातले वासी
माझी पण झालेली आहे स्थिति त्यांच्याजैसी २३

आकाशा जाउन भिडलेले अनेक रंगाचे
जळजळीत नेत्रांचे आणि उघडया तोंडाचे
स्वरूप तुमचे पाहुनि ऐसे, हे विष्णूश्रेष्ठ,
सुटला माझा धीर जाहली शांतीही नष्ट २४

प्रलयाग्नीसम तोंड आणखी दाढा विक्राळ
पाहुन अस्वस्थच मी झालो आहे गोपाळ,
डळमळीत झाले मन मजशी ना कळतात दिशा
प्रसन्न व्हा अन् कॄपा करा मजवरती, जगदीशा २५

धृतराष्ट्राचे पुत्र आणखी महीपालहि इतर
भीष्म, द्रोण अन् कर्णासह किति आमुचेही वीर २६

शिरले तुमच्या विक्राळ मुखी अन् मजला दिसली
दाढांमध्ये कित्येकांची शिरे चिरडलेली २७

लोट नद्यांच्या पाण्याचे जैं सागरात शिरती
तसे वीर हे तुमच्या जळत्या मुखि प्रवेश करती २८

ज्वालेमध्ये जळण्यासाठी पतंग घुसतात
तसे मराया लोक भराभर मुखि प्रवेशतात २९

हे विष्णू, प्रज्वलित मुखांनी गिळता सर्वांना
जिभल्या चाटित ज्वालांच्या तुम्हि उग्र तळपताना ३०

वंदनपूर्वक प्रार्थितो तुम्हा, प्रसन्न तुम्हि व्हावे
उग्रस्वरूपी कोण आहा ते मजसी सांगावे
ही तुमची जी करणी आहे, मजला ना कळते
आदिपुरूष तुम्हि तरि उत्सुक मी तुम्हा जाणण्याते ३१


श्री भगवान म्हणाले‚
मी संहारक काळ आहे रे सार्‍या विश्वाचा
आलो येथे विनाश करण्याला या लोकांचा
तुझ्याविनाही होणार आहे सर्वांचा नाश
दोन्ही सैन्यामधले योध्दे मरतिल हे खास ३२

तेव्हा, पार्था ऊठ आणि कर यशासाठि युध्द
जिंकुन शत्रूना भोगाया राज्य समृध्द
मम इच्छेने पूर्विच यांचा मृत्यु असे झाला
निमित्त केवळ व्हायचे असे, सव्यसाचि, तुजला ३३

द्रोण, भीष्म अन् जयद्रथासह कर्ण आदि वीर
आधीच मी मारले तयां तू लढुनी वधी सत्वर
नकोस होऊ व्यथित तयांस्तव, मार संगरात
शत्रूवरती विजय मिळवशिल तू या समरात ३४

संजय म्हणाला‚
ऐकुनी कृष्णाच्या बोला मग पुन:पुन्हा वंदुन
सद्गदित कंठाने बोले भयभितसा अर्जुन ३५

अर्जुन म्हणाला‚
हृषिकेशा, जग होते आनंदित तुमच्या कीर्तनी
आणिक भारून जाते तुमच्यावरल्या प्रीतीनी
सिध्दपुरूषगण इथले सारे करति तुम्हा नमन
राक्षस पळती सर्व दिशांना तुम्हाला भिउन ३६

ब्रम्हाहुनिही श्रेष्ठ असे तुम्हि आहात निर्माते
महात्मना, मग कां न करावे वंदन तुम्हांते
अनंत देवा, अधिदेवा, तुम्हि आधार जगतासी
सत्यअसत्यापलीकडिल तत्वहि तुम्ही अविनाशी ३७

पुराणपुरूषा, आदिदेव तुम्हि, जगतास्तव आश्रय
तुम्ही ज्ञान अन् तुम्हीच ज्ञानी, परंज्ञाननिलय
अनंतरूपे, हे परमेशा, जगत् तुम्ही व्यापिले
सर्व विश्व हे केवळ तुमच्यावरती आधारिले ३८

तुम्हीच वायू, यम, अग्नि, जल, तुम्हिच चंद्रमा तो
प्रजापती ब्रम्हा प्रपितामह तुम्हास मी वंदितो
वारंवार नमन करूनीहि नमितो पुन:पुन:
सहस्त्रशा: वंदन चरणाशी तुमच्या, नरोत्तमा ३९

समोरूनी, मागिल बाजूनी, सर्व दिशांकडुनी
नमस्कार माझा तुम्हाला हृदयांतरातुनी
असिम, विक्रमी, शक्तिमान तुम्ही, तुम्हि अनंतवीर्य
सर्वव्यापि तुम्हि, तरी जाणवे तुम्हीच ते सर्व ४०

महिमा तुमचा न जाणुनी संबोधी एकेरीने
‘कृष्ण, यादवा, सख्या’, साद मी घालीतसे सलगीने ४१

प्रेमापोटी वा चेष्टेमधि घडवियली घटना
एकांती वा परिचितांसवें केली अवहेलना
खानपान, परिहार, वा शयन अशा कितिक समया
ओलांडलि मर्यादा मी, मज, प्रभो, क्षमादान द्या ४२

चराचरांच्या या सॄष्टीचे तुम्ही जन्मदाते
गुरू गुरूंचे तुम्हीच देवा, परमपूज्य सॄष्टिते
बरोबरीचा दुजा न कोणी, ना कुणि समरूपी
अशक्य कोणी श्रेष्ठ तुम्हाहुन असणे त्रैलोक्यी ४३

म्हणुनी तुम्हा वंदन करतो, पूजनीय भगवंत,
कॄपा याचितो, अष्टांगाने घालुनि दंडवत
पुत्रासि पिता, मित्रासि सखा, तसे प्रिय प्रियासी
करति क्षमा तद्वत् तुम्हि द्यावे क्षमादान मजसी ४४

कधि न पाहिलेले मज झाले विश्वरूपदर्शन
आनंदित त्यामुळे तरीहि भयव्याकुळ मम मन
जगदाधारा, प्रसन्न व्हा, व्हा पुनरपि अवतीर्ण
आपुल्या भगवदॄपाचे मज देण्याला दर्शन ४५

सहस्त्रबाहो, करा एवढी मम इच्छापूर्ती
दर्शवा किरिट, गदा, चक्रधर, चतुर्भुजा मूर्ती ४६

श्री भगवान म्हणाले‚
प्रसन्न होउन तुजवर, पार्था, दर्शन तुज दिधले
मम योगाच्या सामर्थ्याने अघटित मी घडविले
कुणा न दिसते असे विश्वरूप तुजला दर्शविले
आद्य, अनंत अन् तेजोमय मम रूप तुला दाविले ४७

श्रेष्ठ कुरूवीरा, तुझिया आधी कुणीच ना पाहिले
जगड्व्याळ हे विश्वरूप मम जे तुजला दिसले
अशा स्वरूपी इहलोकासी दुर्लभ मज बघणे
यज्ञाने, वेदाध्ययनाने, तप वा दानाने ४८

घोर रूप मम पाहुनि पार्था, घाबरू नको तू
अथवा चित्ती व्यथित होउनी गांगरू नको तू
भीति सोडुन शांतपणाने रूप पुन: ते पहा
दर्शन माझे पुनरपि करूनी स्वस्थ चित्त तू रहा ४९

संजय म्हणाला‚
वासुदेव अर्जुनासि ऐसे आश्वासुन बोलले
आणि आपुले घोर रूप त्या पुन्हा दाखविले
नंतर भगवंताने पार्था दिला धीर खूप
आणि दाविले आपुले प्रेमळ करूणाकरि रूप ५0

अर्जुन म्हणाला‚
हे जनार्दना, पाहुनि तुमचे मनुषरूप सुंदर
शांतचित्त होउनि मी आता आलो भानावर ५१

श्री भगवान म्हणाले‚
आता दाविले रूप तुला ते अतिदुर्लभ असते
देवांनाही दर्शनाचि त्या आकांक्षा असते ५२

माझे दर्शन झाले तुज जे प्राप्य न कोणाही
वेदाध्ययने, दानाने वा तप करण्यानेही ५३

मला असा पाहणे, जाणणे, मम अंतरि येणे
संभव केवळ माझ्यावरच्या अनन्य भक्तीने ५४

नि:संगपणे भक्तीपूर्वक कर्म करी मजकरिता
अन निर्वैरी मन ज्याचे त्या त्वरित ये मज मिळता ५५

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विश्वरूपदर्शन नावाचा अकरावा अध्याय पूर्ण झाला.

२९ एप्रिल, २००९

दहावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतियोग नावाचा दहावा अध्याय

महाबाहु पार्था तू असशी माझा प्रिय मित्र
म्हणुनि सांगतो तुझ्या हितास्तव परंज्ञानसूत्र १

कळलो नाही मी देवाना वा महर्षिंनाही
मूळ मीच सार्‍या देवांचे आणि ऋषींचेही २

मज अजन्म अन् अनंत जाणी जो नर निर्मोही
मी जगदीश्वर कळते ज्या तो पापमुक्त होर्इ ३

मति, ज्ञान, संशयनिवॄत्ती, क्षमा, सत्य, निग्रह,
सुखदु:ख तसे जननमरण अन् भय, निर्भय भाव, ४
समत्वबुध्दी, तृप्ति, अहींसा, तप अन् दातृत्व,
यश, अपयश या सार्‍यांचा हो माझ्यातुनि उद्भव ५

चार महर्षी अन् सप्तर्षी तसे मनुसमष्टी
या सार्‍यांना जन्म मजमुळे, अन् त्यातुन सृष्टी ६

माझ्या कर्मांवर, सामर्थ्यावर धरि विश्वास
तो होतो ममभक्तिपरायण कर्मयोगी खास ७

उगमस्थान मी अन् सार्‍यांचा माझ्यातुन उपज
बुध्दिवंत हे जाणुनि भजती भक्तीपूर्वक मज ८

चित्त मजमधी गुंतवुनी ते परस्परा सांगती
भक्तिपूर्वक मजविषयी, अन् सदा त्यात रमती ९

प्रेमाने मम सेवेमधि जे योगी भक्त गर्क
त्यांना मी मजकडे यायचा दावितसे मार्ग १०

त्यांवरती अनुकंपा म्हणुनी तदंतरी जातो
ज्ञानाच्या तेजाने तेथिल अंधारा हटवितो ११

अर्जुन म्हणाला‚
अजर, अमर, आदिदेव, दिव्य तुम्हि आहा सर्वव्यापी
परब्रम्ह तुम्हि, परमात्मा तुम्हि, परमधामही तुम्ही १२

ऋषी असित, देवल, देवर्षी नारद, व्यासमुनी
असेच म्हणती आणि ऐकतो तुमच्याहीकडुनी १३

सत्य हेच मज मान्य, केशवा, तुम्ही सांगता ते
व्यक्तिमत्व तुमचे ना माहित देवदानवाते १४

भूतमात्र निर्मिता सर्व तुम्हि जगत्पती माधवा,
तुम्हास अंतर्ज्ञाने कळते तुम्ही कोण, देवा १५

कळल्या ज्या तुम्हा, सांगाव्या मजला मधुसूदन,
प्रवृत्ती तुमच्या ज्यायोगे राहता जग व्यापुन १६

कसे करावे चिंतन, तुम्हा कसे आळवावे?
मज सांगा कुठकुठल्या रूपे तुम्हा ओळखावे? १७

आपुल्या शक्ती आणि महत्ता सांगा विस्तारून
अमृतमय तव बोल ऐकण्या आतुर मम कर्ण १८

श्री भगवान म्हणाले‚
हे कुरूश्रेष्ठा, तुला सांगतो ठळक तेवढया शक्ती
विस्ताराला अंत न माझ्या अशि माझी प्रवृत्ती १९

मीच अंतरात्मा आहे या ब्रम्हांडातिल भूतांचा
कुंतिसुता मी आदि, मध्य मी, आणि अंतही मी त्यांचा २०

मी आदित्यांतिल विष्णू, अन् सूर्य तेजपुंजांमधला
वार्‍यांमधला मरिचि मी, तसा शशांक नक्षत्रांमधला २१

वेदांमध्ये सामवेद मी, देवांमधला देवेंद्र
इंद्रियांमधे मन, अन् भूतांतिल जीवाचे मी केंद्र २२

रूद्रगणांचा मी शंकर, अन् यक्षांमधला कुबेर मी
अष्टवसूतिल पावक मी, अन् पर्वतातला मेरूहि मी २३

पुरोहितांतिल मुख्य म्हणति ज्या तो आहे मी बॄहस्पति
सेनानींमधि कार्तिकेय मी, जलाशयांमधि सरित्पती २४

महर्षींमधी भृगु ऋषी मी, ध्वनींमधिल मी ॐकार
यज्ञांमधला जपयज्ञ, तसा अचलांमधला हिमाचल २५

वृक्षांमध्ये वटवृक्ष, आणि नारद देवर्षींमध्ये
गंधर्वांमधि चित्ररथ, तसा कपिलमुनी सिध्दांमध्ये २६

सागरातुनी निर्मिति ज्याची तो अश्वांतिल उच्चश्रवा,
हत्तींमधि ऐरावत, तैसा नराधीप मी मनुज जिवां २७

शस्त्रांमध्ये वज्र, तसा मी कामधेनु गायींमध्ये
जीवनिर्मितीमधि मदन मी, अन् वासुकी सर्पांमध्ये २८

नागांपैकी अनंत मी, अन् पाण्यासाठी वरूणहि मी
नियमनकर्ता यम मी आणिक, पितरांमधला अर्यम मी २९

नियंत्रकांतिल काळ मी, तसा दैत्यांमध्ये प्रल्हाद
पशूंमधी मी सिंह, आणखी पक्षिगणांमधला गरूड ३०

वेगवान वारा मी, आणि शस्त्रधरांमधि दाशरथी
मत्स्यांमधे मकरमत्स्य, अन् सरितांमध्ये भागिरथी ३१

सृष्टीचा आरंभ, अंत, अन पार्था, मीच असे मध्य
विद्यांमधि अध्यात्म मीच, अन् वादींमधला मी वाद ३२

अक्षरांतला ‘अ’कार मी, अन् समासांतला मी द्वंद्व
अक्षय ऐसा काल मीच, अन् ब्रम्हदेव मी चतुर्मुख ३३

सर्वांसाठी मी मृत्यू, अन् येणार्‍यांस्तव जन्महि मी
श्री, कीर्ति, वाचा, बुध्दी अन् धृती, श्रुती, नारींमधि मी ३४

स्तोत्रांमधला बृहत्साम मी, अन छंदांमधि गायत्री
मासांमधला मार्गशीर्ष, अन् ऋतूराज जो वसंत मी ३५

कपटींसाठी द्यूत मीच, अन् तेजस्वींचे मी तेज
व्यवसायांतिल यशही मी, अन् बलवानांचे मी ओज ३६

वृष्णींचा वासुदेव मी, अन पांडवामधे धनंजय
मुनींमधी मी व्यासमुनी, अन् कवींमधी शुक्राचार्य ३७

दण्डकांतला दंड मी, तसा विजिगीषूंमधली नीति
गुपितांमध्ये मौन मीच, अन ज्ञानींमधली विज्ञप्ती ३८

आणि अर्जुना मीच आहे रे बीज भूतमात्रांचे
माझ्याविरहित असे कुणिहि तुला न आढळायाचे ३९

ना गणती अन् अंतहि नाही रे माझ्या रूपा
तुज सांगितली ती तर केवळ थोडीच, परंतपा ४०

सुंदर अन् तेजस्वी ऐशा ज्या सार्‍या गोष्टी
तेजाच्या ठिणगीतुन माझ्या त्यांची उत्पत्ती ४१

तरी अर्जुना, हवे कशाला हे विस्तृत ज्ञान
राही माझा सूक्ष्म अंश या जगता व्यापून ४२

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
विभूतीयोग नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला

२४ एप्रिल, २००९

नववा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
राजविद्याराजगुह्मयोग
नावाचा नववा अध्याय

निष्कपटी तू म्हणुन तुला हे गुह्मज्ञान देतो
जे जाणुन घेता अशुभातुन मुक्तिलाभ होतो १

जे गुह्म अति अन् श्रेष्ठ असे सार्‍या विद्यांमधी
पवित्र, उद्बोधक, सोपे अन् उचित धर्मामधी २

यावर नाही श्रध्दा ज्यांची असे पुरूष, पार्था
मला न मिळता पुन: भोगिती जन्ममृत्युगर्ता ३

अदॄष्यपणे व्यापुनि आहे मी सारे जगत
माझ्या ठायी प्राणिमात्र पण मी नच त्यांच्यात ४

असे असुनिही माझ्यामध्ये प्राणिजात नसती
पहा ईश्र्वरी करणि, करी मी जरि त्यांची निर्मिती ५

सर्व दिशांना वाही वारा राहुनी नभात
तशी समज तू, जीवसृष्टि ही माझ्यामधि स्थापित ६

कल्पांती हे सर्व जीव माझ्यांत विलिन होती
नवकल्पारंभी मी त्यांची करी पुन्हा निर्मिती ७

प्रकृतीस अनुसरून जाहले जे जे परतंत्र
पुन:पुन्हा निर्माण करी मी असे भूतमात्र ८

हे जे माझे कर्म, मी करी उदासीनतेने
म्हणून ना मज बंधक होते ते सर्वार्थाने ९

माझ्या नजरेखाली करते प्रकृति ही निर्मिती
याच कारणाने जगताला पार्था, येते गती १०

मनुष्यदेहामधि पाहुनि मज मूढ न ओळखती
परमेश्र्वर जगताचा मी या सत्या ना जाणती ११

कर्म, ज्ञान, मन तसेच आशा हो निष्फळ त्यांच्या
जे मोहाने जाति आहारी असुरी वृत्तीच्या १२

पवित्र वृत्ती धारण करती जे महानुभाव
भजती मजला अनन्यभावे जाणुनि अधिदेव १३

निश्र्चयपूर्वक सदैव करती माझे संकीर्तन
योगाचरणी होउन करती भक्तीने वंदन १४

तसे इतरही यज्ञ करूनि वा विविध अन्य रीती
एकत्रित वा अलगपणे मम उपासना करती १५

मी यज्ञ, तसा मंत्र मीच, मी अग्नि, घृत मीच
मी समिधा, अन् तर्पणही मी, औषधही मीच १६

जगताचा आधार, पिता अन् माताही मीच
मीच पितामह, चतुर्वेद मी, ॐकारहि मीच १७

मी सर्वप्रभू, सर्वगती, अन् सर्वसाक्षी, भर्ता
शरणसखा मी, उगम स्थिती मी, मी निर्गमकर्ता १८

मीच आवरी अथवा सोडी उन्हा पावसाला
अमृत अन् मृत्यू दोन्ही मी भल्या वाइटाला १९

साम, यजु, ऋक् या वेदांतिल कर्मे आचरूनी
माझी पूजा करिती स्वर्लोकाचि आस धरूनी
ते पुण्यात्मे देवेंद्राच्या स्वर्लोकी जाती
अन् केवळ देवांस प्राप्य जे भोग तेहि घेती २०

स्वर्गाच्या उपाभोगानंतर जसे सरे पुण्य
मर्त्यलोकि मग जन्म घ्यावया हो पुनरागमन
अशा प्रकारे वेदत्रयीतिल कर्में करणार्‍या
करावया लागती स्वर्ग−भू अशा कितिक वार्‍या २१

अनन्यभावे चिंतन माझे करूनी मज भजती
त्यांच्या निर्वाहाची देतो, पार्था मी शाश्र्वती २२

दुसय्रा देवांवरच्या श्रध्देने करती यजन
विधिवत् ना तरि पर्यायाने करती मम पूजन २३

कारण साय्रा यज्ञांचा मी स्वामी अधिदैवत
मजविषयी अनभिज्ञ म्हणुनी ते असती मार्गच्युत २४

देवव्रती देवांस, तसे पितृव्रती पितरांस
जे ज्यांशी प्रामाणिक, मिळती जाउनिया त्यास
अवलंबुन सारे ज्याच्या त्याच्या श्रध्देवरती
माझ्यावर निष्ठा ज्यांची ते मज येउनि मिळती २५

पान, फूल, फळ, वा केवळ जल करती मज अर्पण
निष्ठापूर्वक, ते प्रेमाने मी करतो ग्रहण २६

कौंतेया, जे भक्षण करिशी, हवन, दान करिशी
सारे काही मज अर्पण कर जे जे आचरशी २७

कर्माचे परिणाम शुभाशुभ जे असतिल काही
मुक्त होउनि त्या सर्वांतुन मिळशिल मज ठायी २८

मज सारे सारखे, कुणि नसे प्रिय वा अप्रिय
भक्त आणखी माझ्यामध्ये नसे अंतराय २९

दुराचारी जरि भक्त, मानि मी साधूसम त्यास
कारण त्याचे भक्तिमधि मन स्थिर असते खास ३०

शीघ्र मिळे धर्मात्मापद त्या शांतीही शाश्र्वत
कौंतेया, मम भक्त कदापी नसे नाशवंत ३१

सत्वशील, ब्राम्हण वा राजर्षी जे क्षत्रिय
पुण्यवंत मम भक्तीने जे ते तर नि:संशय,
ममाश्रयाने नारी वा नर, वैश्य, शूद्रयोनी
हे देखिल चिरशांति मिळवती, पार्था घे ध्यानी ३२

दु:खवेदनापूर्ण अशा या मर्त्यलोकात
वास्तव्य तुझे, म्हणुनि अर्जुना, हो माझा भक्त ३३

भक्तीपूर्वक मनात स्मरूनी कर मजला नमन
या मार्गाने येशिल मजप्रत, हे कुंतीनंदन ३४

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
राजविद्याराजगुह्मयोग नावाचा नववा अध्याय पूर्ण झाला.

२२ एप्रिल, २००९

आठवा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अक्षरब्रम्हयोग
नावाचा आठवा अध्याय

अर्जुन म्हणाला‚
कर्म ब्रम्ह अध्यात्म कशाला म्हणती नारायणा?
कुणा म्हणावे अधिभूत तसे अधिदैवही कोणा? १

अधियज्ञ कसा अन् या देही कोणाचा वास?
कसे जाणता अंतिम क्षणि कुणी स्मरतो तुम्हास? २

श्री भगवान म्हणाले‚
जे अविनाशी तेच ब्रम्ह अन् स्वभाव अध्यात्म
चराचरांच्या उत्पत्तीचे कार्य हेच कर्म ३

नाशवंत अधिभूत आणि अधिदैव पुरूष चेतन
देहामध्ये वास करी जो तो मी अधियज्ञ ४

अंत:काली स्मरत मला जो त्यागी देहाला
सत्य हेच तू जाण, मिळे तो येउनिया मजला ५

करतो संतत ध्यान जयाचे तेच अंति आठवतो
कौंतेया, नर ऐसा नंतर त्या तत्वाला मिळतो ६

तेव्हा पार्था, युध्द करी तू मज स्मरता स्मरता
मिळशिल येउनि तूहि मला मनबुध्दी स्थिर धरता ७

शासनकर्ता, ज्ञानि, पुरातन, कर्ता अन् धर्ता
सूक्ष्म अणूहुन, अंधारामधि तेजपुंज सविता ८

अशा श्रेष्ठ पुरूषोत्तमास जो नर भक्तीने भजतो
योगबलाने निश्र्चयपूर्वक मनास स्थिर करतो ९

दो भुवयांच्यामध्ये आणुनि केंद्रित करी प्राण
अंत:काली करी दिव्य त्या पुरूषाचे स्मरण
ऐसा नर मग कुंतिनंदना त्या पुरूषाठायी
नि:संशय रे अंतानंतर विलीन होउन जाई १०

ज्ञानी ज्या म्हणती अविनाशी, यती प्रवेशति ज्यात
ब्रम्हचर्य पालन इच्छुन, जे सांगिन तुज संक्षिप्त ११

कायाविवरे आवरून मन हॄदयांतरि बांधती
प्राण मस्तकी आणुन नर जे योगहि आचरिती १२

ॐ काराच्या उच्चरणासह स्मरण मला करिती
आणि त्यागिती देह, तयांना मिळते उत्तम गती १३

अनन्यभावे सदासर्वदा स्मरतो नित्य मला
सुलभ होतसे माझी प्राप्ती ऐशा योग्याला १४

अशा प्रकारे मजप्रत येउनि जो योगी मिळतो
दु:खालय जो पुनर्जन्म, त्या घ्यावा ना लागतो १५

तिन्हि लोकांतुन कधी ना कधी येणे असते मागे
मिळाल्यावरी मज, कौंतेया पुनर्जन्म ना लागे १६

युगे हजारो मिळुनी ब्रम्हाचा हो एक दिन
रात्रही तशी हजारो युगे असे जाणिती जन १७

दिवस असा सुरू होता येती सारे जन्माला
आणिक होता सुरू रात्र ते जाती विलयाला १८

सर्व चराचर जन्मोजन्मी असे विवश असती
विलयानंतरच्या दिवशी मग पुन्हा जन्म घेती १९

या तत्वाच्या पलीकडे पण असे एक गोष्ट
भूतमात्र जाती विलया पण जी न होई नष्ट २०

या गोष्टीला ‘अक्षर’ संज्ञा जी अति परम गति
ती म्हणजे मम धाम, मिळे ज्या, त्या मिळते मुक्ती २१

ज्याच्या ठायी सर्व जीव, जो सर्व व्यापुनी राहे
परम् पुरूष तो अनन्य भक्तीनेच लाभताहे २२

योगी केव्हां मरण पावुनी घेती पुनरपि जन्म
आणिक केव्हा मरता होती मुक्त, सांगतो मर्म २३

उत्तरायनातिल षण्मासी, दिवसा, ज्वालेत,
शुक्ल पक्ष, यामध्ये मरता योगि होति मुक्त २४

दक्षिणायनातिल षण्मासी, रात्री, धूम्रात,
कृष्णपक्षामधिल मृतात्मा जन्म घेई परत
मृत्यूनंतर प्रथम जाई तो चंद्रलोकाला
पुण्य संपता पुनर्जन्म त्या लागे घ्यायाला २५

अशा प्रकारे शुक्ल, कृष्ण या शाश्वत गति जगती
एकीमध्ये पुनर्जन्म अन् दुसरीने मुक्ती २६

दोन्हीना जाणी जो योगी, होई मोहमुक्त
म्हणुनी, अर्जुना, सर्वकाल तू राहि योगयुक्त २७

सांगितलेल्या ह्मा तत्वाना जाणुन घेऊन
कर्मयोग आचरि जो योगी, हे कुंतीनंदन,
वेद, यज्ञ, तप, दान यातल्या पुण्यापलिकडचे
असे आद्य अन् परमस्थान जे, त्या जाउन पोचे २८

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अक्षरब्रम्हयोग नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला

१९ एप्रिल, २००९

सातवा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय

माझ्या ठायी चित्त लावुनी माझ्या मदतीने
कर्मयोगामधली‚ पार्था‚ करता आचरणे
माझ्याविषयी मिळवशील जे नि:शंकित ज्ञान
त्याबद्दल मी सांगतो तुला आता करी श्रवण १

विज्ञानासह ज्ञानकथन मी करीन पूर्णतया
जे जाणुनि तुज अन्य काहि ना उरेल जाणाया २

हजारांमधी एक नर करी यत्न सिध्दिसाठी
अशामधि एकासच लाभे मजविषयी माहिती ३

पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू, नभ, मन, मति, गर्व
या आठांमधि विभागली मम प्रकृति रे पांडव ४

दुय्यम ही प्रकृती, हिच्याहुन श्रेष्ठ दुजी आहे
धनंजया जीवरी जगत् हे आधारून राहे ५

सर्व जीव हे या दोघीतुन होती उत्पन्न
मी जीवांचा आरंभ तसा मीच असे मरण ६

माझ्याखेरिज, हे धनंजया, दुजे काहि नाही
माळेमधि ओवल्या मण्यांसम सारे मज ठायी ७

पाण्यातिल रस, कौंतेया मी, शशिसूर्याची प्रभा‚
वेदांतिल ॐकार मी‚ तसा हुंकारहि मी नभा ८

पुरूषातिल पौरूष्य मीच, मी तेज अनलाचे
धरित्रिचा मी गंध, प्राण मी, तप मी तापसिचे ९

जाण अर्जुना, सर्व जिवांचे मीच असे बीज
बुध्दिमतांची बुध्दी अन् तेजस्वींचे तेज १०

विषयवासनाविरहित रे मी बलवंतांचे बल
भरतर्षभ, मी काम जिवां जो धर्मा अनुकूल ११

सात्विक, राजस, तामस हे जे गुण मनी वसती
मी न त्यामधि पण ते सारे माझ्यामधि असती १२

त्रिगुणांनी त्या मोहित होउनि हे सारे जगत
त्यापलिकडल्या मज परमात्म्या जाणुन ना घेत १३

ही दैवी त्रिगुणात्मक माया आहे अति दुस्तर
शरण मला येती ते तरूनि जाती तिच्या पार १४

या मायेतुन ज्ञान जयांचे झाले रे नष्ट
शरण मला ना येति नराधम, मूढ आणि दुष्ट १५

भजति मला ते चौघे, केलें पुण्यकर्म ज्यांनी
रोगग्रस्त, जिज्ञासु, धनार्थी, तसेच जे ज्ञानी १६

यांमध्येही भक्त, जयाने कर्मयोग जाणला
असा ज्ञानी, मी प्रिय त्याला, अन् तो प्रियतम मजला १७

हे सारे मम भक्त चांगले, तरि माझ्या ठायी
ज्ञानी, मज उत्तमगति जाणुन, सामावुनी जाई १८

अनेकदा जन्मुनि जो जाणी मी सर्वेसर्वा
आणि मिळे मज, असा महात्मा दुर्लभ रे पांडवा १९

अनेक लोभी आपआपले मत अनुसरतात
मजला सोडुनि अन्य दैवते नियमित भजतात २०

जो ज्या देवा वरती श्रध्दा ठेवाया बघतो
त्याला त्या श्रध्दास्थानाशी मीच स्थिर करतो २१

श्रध्दापूर्वक तो त्या देवाचे मग करि पूजन
मीच नेमलेले फल मिळवी त्या पूजेतून २२

फलप्राप्ती ही नाशवंत हे ना जाणति वेडे
ते त्या देवांकडे जाति, मम भक्त येति मजकडे २३

मूढांना ना कळत रूप मम शाश्वत, अव्यक्त
अज्ञानाच्या पोटी समजती मजला ते व्यक्त २४

मायाच्छादित स्वरूप माझे नाहि कुणा दृष्य
मूढ नेणिती की मी शाश्वत, अजन्म, अदृष्य २५

मृत, हयात, वा यायचेत, त्या सर्वा मी जाणी
आणि अर्जुना, तरीहि मजला जाणतो न कोणी २६

इच्छा द्वेषाच्या द्वंद्वातुन जन्मे जो मोह
त्या मोहाने भ्रमिष्ट होती रे सारे जीव २७

जे पुण्यात्मे या द्वंद्वातुन मुक्ति मिळवतात
ते दृढनिश्चयपूर्वक माझी भक्ती करतात २८

जन्ममृत्युच्या फेर्‍यातुन जे इच्छितात मुक्ती
माझ्या आधारे त्यां होई ब्रम्हज्ञानप्राप्ती २९

मी अधिभूत, मी अधिदैव, मीच अधियज्ञ
या विश्श्वासावरती करिती कर्मे जे सूज्ञ
ठामपणे ते सर्वेसर्वा मला मानतात
निर्वाणाच्या क्षणातही ते मलाच स्मरतात ३०

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय पूर्ण झाला

१६ एप्रिल, २००९

सहावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ध्यानयोग
नावाचा सहावा अध्याय

फलप्राप्तीची आस न धरता कर्मे जो करतो
तो संन्यासी‚ कर्मयोगिही‚ ना जो अकर्मि तो १

जाण पांडवा‚ एकत्व वसे सांख्य कर्मयोगी
फलकामना त्यागल्याविना बने न कुणि योगी २

योगी होण्याच्या इच्छेचे मूळ कर्म असते
योगारूढ झाल्यावर त्याचे शमन मूळ बनते ३

विषयासक्तीविरहित करूनी निरिच्छ आचरण
सर्व कामना त्यागी जो तो ‘योगारूढ’ जाण ४

स्वत: स्वत:ला उध्दारावे खचून ना जाता
स्वत:चे स्वत: शत्रू असतो अन् स्वत:च भ्राता ५

स्वमन जिंकिता त्याशी जुळते बंधुसम नाते
पराजिताच्या मनांत केवळ शत्रुत्वच उरते ६

मनास जिंकी त्याचा आत्मा स्थिर शांती लाही
शीतउष्ण‚ सुखदु:ख‚ मान वा अपमानांतरिही ७

ज्ञान नि विज्ञानाने ज्याचा आत्मा तॄप्त असे
त्याला आध्यात्मी योगी ही ख्याती प्राप्त असे
स्थिर बुध्दीने इंद्रियांवरी विजय मिळवोनी
दगड माति अन् सोने याना समान तो मानी ८

जिवलग मित्र‚ तसे बंधु अन् उदास‚ मध्यस्थ
साधू अथवा पापी आणिक सुष्ट तसे दुष्ट
या सर्वाना समानतेने जो साधू वागवी
त्या समबुध्दियोग्याचे स्तर विशेष सर्वस्वी ९

एकचित्त होउन योग्याने एकांती जावे
निरिच्छ राहुन पाश सोडुनी योग आचरावे १०

स्वच्छ आणि मध्यम उंचीचे स्थान निवडावे
दर्भावर हरिणाजिन‚ त्यावर वस्त्र अंथरावे ११

अशा आसनावरी बसावे आवरून चित्तेंद्रियां
आत्मशुध्दिस्तव करण्यासाठी उचित योगक्रिया १२

पाठ‚ मान‚ अन् डोके ठेवुनि ताठ‚ बसावे स्थिर
अविचलित‚ लावुनि नाकाच्या अग्रावर नजर १३

भीतिमुक्त अन् शांत मनाने ब्रम्हचर्य पाळावे
आणिक माझ्या ठायी अपुले मन केंद्रित करावे १४

अशा प्रकारे करण्याने योगाचे आचरण
माझ्याशी एकरूपतेचे मिळेल निर्वाण १५

अति खाणे‚ काही ना खाणे‚ अति निद्रा‚ जाग्रणे
योगसिध्दि न होण्यामागे ही सारी कारणे १६

यथोचित आहार विहार अन् माफक विश्रांती
यांचे अवलंबन केल्याने सुखद योगप्राप्ती १७

मना आवरून आणिक राहुन आत्म्याशी निष्ठ
उपभोगाप्रत निरिच्छ बनतो म्हणति त्यास ‘युक्त’ १८

वारा नसता जशी दिव्याची वात संथ तेवते
मन आवरता योग्याचेही ध्यान स्थिर बनते १९

बध्द मना योगाभ्यासाने उपरति होते जधि
स्वत:स बघुनी स्वत:त आत्मा होतो आनंदी २०

जेव्हा त्या इंद्रियांपलिकडिल अमर्याद् सुखात
स्थिरावुनी योगी ना होतो कधिही तत्वच्युत २१

ज्या स्थितीमधि अधिक सुखाचा लोभ न तो धरतो
वा अति दु:खद घटनेनेही विचलित ना होतो २२

असा दु:खसंयोगवियोगच ‘योग’ म्हणुनि ज्ञात
कंटाळा न करावा याचे पालन करण्यात २३

मनोवासना पूर्णपणाने टाकाव्या त्यागुनी
इंद्रियांस आवर घालावा आपण चहुकडुनी २४

धैर्य बाळगुनि हळू हळू मग बुध्दि शांतवावी
आत्म्यामध्ये मन गुंतवुनी चिंता न करावी २५

चंचल मन जर स्वैर व्हावया होइल अनावर
निश्चयपूर्वक आत्म्यातच त्या बांधावे सत्वर २६

असे मनाला शांत करूनच ‘युक्त’ योगी मिळविती
दोषमुक्त निष्पाप ब्रम्हमय उत्तम सुखप्राप्ती २७

अशा प्रकारे पापमुक्त अन् आत्मतुष्ट योगी
ब्रम्हमीलनामधि मिळणारे आतीव सुख भोगी २८

आत्मा ज्याचा योगयुक्त तो समदृष्टी राही
सर्व जिवांमधि स्वत:‚ स्वत:मधि सर्व जीवां पाही २९

मी सर्वांभूती‚ अन सारे मम ठायी मानतो
अशास मी ना अंतरतो‚ ना तो मज अंतरतो ३०

एकत्वाने सर्वांभूती असलेल्या मज भजतो
तो योगी वागुनी कसाही मज ठायी वसतो ३१

स्वत:सारखे सर्वां लेखी सुखात वा दु:खात
अशा युक्त योग्याची गणना सर्वोत्कृष्ठात ३२

अर्जुन म्हणाला‚
हे मधुसूदन‚ समत्वतेचा योग तुवा सागितला
चंचलतेमधि टिकण्याजोगा मला न जाणवला ३३

चंचल मन हे बलिष्ठ असते‚ कठिण तया रोखणे
जसे कुणाही अशक्य असते वार्‍याला बांधणे ३४

श्रीभगवान म्हणाले‚
यात नसे शंका, चंचल मन दुष्कर वळवाया
पण अभ्यासाने, वैराग्याने बधेल, कौंतेया ३५

मनावरी ताबा नसला तर योग हा अशक्य
प्रयत्नपूर्वक मिळवुनि ताबा योगप्राप्ति शक्य ३६

अर्जुन म्हणाला‚
असुनहि श्रध्दा यत्नाअभावी योगातुन ढळतो
हे श्रीकृष्णा, नर ऐसा कुठल्या गतीस जातो ? ३७

ब्रम्हप्राप्तिमार्गातुन भ्रष्ट अन् गोंधळलेला तो
नभात फुटल्या मेघापरी का तोहि नष्ट होतो ? ३८

संशय हा माझा, भगवंता, तुम्हीच दूर करा
निरसन करणारा तुम्हाविण नसे कुणी दुसरा ३९

श्री भगवान म्हणाले‚
इहलोकी वा परलोकिही तो नष्ट नाहि होत
कल्याणप्रद कर्में करि त्या दुर्गति ना प्राप्त ४०

पुण्यकर्म करणार्‍यांजैसा तो स्वर्गी जाई
दीर्घकाळ राहुनी तिथे मग पुनर्जन्म घेई
पुनर्जन्मही अशा घरी जे शुध्द नि श्रीमंत
योगभ्रष्ट असुनिही असा तो ठरे भाग्यवंत ४१

किवा बुध्दीवंत योगि या घरी जन्मा येई
जन्म असा अतिदुर्लभ, पार्था, ध्यानी तू घेई ४२

या जन्मीहि मिळे तया गतजन्मामधले ज्ञान
ज्यायोगे तो मिळवू पाहिल सिध्दी, कुरूनंदन ४३

पूर्वजन्मिच्या ज्ञानाने तो जिज्ञासू होई
योगाकर्षण त्याला वेदांपलीकडे नेई ४४

जन्मोजन्मी प्रयत्न करूनी पापमुक्त होत
सिध्दी मिळुनी योगी तो मग जाई शांतिप्रत ४५

तपस्व्याहुनी, विद्ववानाहुनी, कर्मठांहुनी श्रेष्ठ
योगी असतो असा, पार्थ, तू योगी बनणे इष्ट ४६
सर्व कर्मयोग्यात ठेवुनि श्रध्दा मजलागी
भजतो जो मज त्यास मानि मी सर्वोत्तम योगी ४७

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ध्यानयोग नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला.

१५ एप्रिल, २००९

पांचवा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
संन्यासयोग
नावाचा पांचवा अध्याय

अर्जुन म्हणाला‚
कौतुक करूनी संन्यासाचे पुन्हा प्रशंसशी कर्म
नक्कि कोणते असे योग्य मज‚ सांग मला मर्म १

श्री भगवान म्हणाले‚
संन्यास आणि कर्मयोग हे श्रेयस्कर दोन्ही
तरिही पार्था‚ कर्मयोग हा श्रेष्ठ त्यात जाणी २

महाबाहु, हे जाण‚ नसे जो कर्माचा द्वेष्टा
आणि ना धरी कर्मफलेच्छा असा ज्ञानि द्रष्टा
जरी कर्मसन्यासी असला तरि भेदातीत
निश्र्चिततेने पात्र व्हावया कर्मबंधमुक्त ३

सांख्य वेगळा‚ कर्म वेगळे मानति ते अज्ञ
सांख्य पाळुनि कर्माचाही लाभ मिळविती सूज्ञ ४

सांख्यातुन हो प्राप्त स्थिती जी कर्मांतहि मिळते
द्रष्टा तो ज्या सांख्य नि कर्म एकरूप दिसते ५

सन्यासहि हो दुष्कर‚ बसुनी कर्माव्यतिरिक्त
कर्मयोगी मुनिजनांस मिळते चिरशांती त्वरित ६

इंद्रियांवरी ताबा ज्याचा अन् आत्मा शुध्द
अशा कर्मयोग्यास न करते कर्मफलित बध्द ७

दर्शन‚ स्पर्शन‚ श्रवणोच्चारण‚ श्र्वसन आणि भक्षण
उत्सर्जन‚ निद्रा नि जागृती‚ नयन उन्मिलन ८

या सर्व क्रिया आपआपल्या इंद्रियेच करति
हे जाणुनि तत्वज्ञ श्रेय कधि स्वत:स ना घेती ९

आत्मशांतिस्तव नि:संगपणे कर्मे आचरितो
त्याला कर्मातिल दोषांचा स्पर्शहि ना होतो
कमलपत्र पाण्यात राहुनीदेखिल शुष्क जसे
तसेच साय्रा दोषापासुनि तो नर मुक्त असे १०

निरिच्छ करिती कर्मे करण्यासाठि आत्मशुध्दी
अपेक्षित जी इंद्रियांकडुन काया मन बुध्दी ११

योगी त्यागुनि कर्मफला चिरशांतीप्रत जातो
इतरजनांना फलप्राप्तीचा मोहच गुंतवितो १२

कामेच्छा काढून मनातून निष्कर्मी असतो
तो नऊ द्वारांच्या कायेमधि शांतीने वसतो १३

कोणाचे कर्तृत्व‚ कर्म वा कर्मफलाची युती
ईश्र्वर ना घडवितो‚ असे ही प्रकृतिची निर्मिती १४

पुण्य कुणाचे‚ पाप कुणाचे‚ प्रभू नाहि घेत
अज्ञानाच्या आवरणाने जन मोहित होत १५

ज्यांच्या अज्ञानाचा होई ज्ञानाने नाश
सूर्यासम ते ज्ञान देइ त्यां परमार्थ प्रकाश १६

त्या परमार्थामधी ठेविती निष्ठा‚ मन अन् मती
त्यांची पापे धुतली जाउनि मिळे पूर्ण मुक्ती १७

अशा ज्ञानियांची मग होते समदर्शी दॄष्टी
दिसोत त्याना नम्र‚ ज्ञानी‚ वा गाय‚ श्र्वान‚ हत्ती १८

समदर्शी ते इथेच राहुनि इहलोका जिंकती
दोषरहित अन् समान ब्रम्हामधे विलिन होती १९

हर्ष न मानति प्रियप्राप्तित‚ ना दुष्प्राप्याचा खेद
समबुध्दी निर्मोही अशाना मिळते ब्रम्हपद २०

विषयसुखाला गौण मानुनि आत्मसुखी होई
तो निर्मोही नरचि अक्षय सुखानुभव घेई २१

स्पर्शजन्य जे भोग‚ तयां ना आरंभ न अंत
दु:खद ते कौंतेया म्हणुनी त्यजति बुध्दिवंत २२

मरणांतापर्यंत आवरूनि सोशि कामक्रोध
असा योगी नर सुखी होतसे‚ पार्था घे बोध २३

अंतरातुनी सुखी‚ अंतरी पावे आराम
अशास लाभे प्रकाश आणि अंति परब्रम्ह २४

परब्रम्ह हो प्राप्त तयां जे ना मानति द्वैत
पापमुक्त होउनी जे बघती प्राणिमात्र हीत २५

कामक्रोध विरहीत संयमी आत्मज्ञानयुक्त
अशा मुनीना सहजच होते परब्रम्ह प्राप्त २६

बाह्मांगाला स्पर्श करोनी नेत्र स्थीर धरी
श्र्वासोच्छवासा रोखुन धरुनी प्राणायाम करी २७

अशा प्रकारे आवरि इंद्रिये मन आणि बुध्दी
इच्छा भय क्रोधातुन सुटुनी पावे तो मुक्ती २8

यज्ञतपाचा भोक्ता ईश्र्वर मी तिन्ही लोकांचा
मीच प्रियसखा सुहॄद सगळया सजीव प्राण्यांचा
अशा मला ओळखील जो जो तो प्राणीमात्र
चिरशांती मिळण्यासाठी तो खचित होइ पात्र २९

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
संन्यासयोग नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला

१३ एप्रिल, २००९

चौथा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग
नावाचा चौथा अध्याय

श्री भगवान म्हणाले,
हा सांगितला योग प्रथम मी विवस्वान सूर्याला,
त्याने मनुला, मनुने नंतर स्वपुत्र ईक्ष्वाकूला १

तदनंतर मग परंपरेने इतराना कळला
काळाच्या उदरात पुढे तो गेला विलयाला २

तू माझा प्रिय भक्त अन् सखा असेच मी मानतो
म्हणुनी तोच पुरातन उत्तम योग तुला सांगतो ३

अर्जुन म्हणाला,
विवस्वान हा असे पुरातन, तुझा जन्म तर नवा
कसा भरवसा व्हावा त्याला कथिला योग तुवा ? ४

श्री भगवान म्हणाले,
तुझे नि माझे जन्म अर्जुना झाले रे अगणित
ज्ञात मला ते सर्व परंतु तुज नाही माहित ५

सर्व जिवांचा ईश्वर मी, जरि ना जन्मि ना मृत
स्वेच्छापूर्वक संभव घेतो याच प्रकृतीत ६

जेव्हा जेव्हा अवनीवरती धर्मर्‍हास होतो
अधर्मनाशास्तव मी तेव्हा जन्माला येतो ७

सज्जनरक्षण, कुकर्मनाशन, धर्मस्थापनार्थ
युगा युगातुनि जन्म घेउनी मी येतो, पार्थ ८

दिव्य असे मम जन्म, कर्म हे जाणवती ज्याला
पुर्नजन्म ना लागे त्याला, मिळे येउनी मला ९

माया भय अन् क्रोध त्यागुनी ठेवुनि विश्वास
विशुध्द बनलेले ज्ञानी मज आले मिळण्यास १०

करती माझी भक्ति अशी जे त्यांवरती प्रीती
करतो मी‚ ते येति सर्वश: मम मार्गावरती ११

इहलोकातच त्वरीत व्हावी सिध्दीची प्राप्ति
इच्छुनिया हे फल, पूजा देवांचि इथे करती १२

गुणकर्माअनुसार निर्मिले मी चारी वर्ण
त्यांचा कर्ता, तसेच भर्ता मीच असे जाण १३

कर्मबंध ना मजला, वा मी ना ठेवि फलाशा
हे जो जाणी त्या न बांधिती कर्म नि अभिलाषा १४

पूर्वी जैसी मोक्षेच्छूनी कर्मे आचरिली
तशिच अर्जना, तूहि करावी ती कर्मे आपुली १५

काय करावे, काय करू नये कठिण जाणण्यास
दाखवीन मी अशुभमुक्तीप्रद कर्मे करण्यास १६

कर्माकर्मामधिल भेद ना सोपा समजावा
कर्म, अकर्म नि दुष्कर्मातिल फरक कळुन घ्यावा १७

ज्याला दिसते कर्म अकर्मासम वा अकर्म कर्म
तो ज्ञानी, बुध्दिमान, जाणी कर्मांतिल मर्म १८

ज्याची सारी कर्मे असती कर्मफलेच्छेविना,
जाळी ज्ञानाग्नित कर्मे, तो ‘पंडित’ सकलजनां १९

फलप्राप्तीची आस सोडुनी निरिच्छ अन् तॄप्त
कर्म करी तरि प्रत्यक्षामधि राहि तो अलिप्त २०

आशाविरहित, चित्तसंयमित, शरीरधर्माची
कर्मे करी जो त्या न लागती पापे कर्माची २१

हर्षशोक, हेवेदावे अन् यशअपयश दोन्ही
समान समजुन कर्तव्य करी असा पुरूष ज्ञानी
दैवेच्छेने मिळे त्यात तो मानि समाधान
पापपुण्य कर्मांतिल त्याला ना ठरते बंधन २२

निरिच्छ अन् समबुध्दि ज्ञानि जे करी यज्ञकार्य
त्या कर्मातिल गुणदोषांचा होइ पूर्ण विलय २३

यज्ञार्पणहवि, यज्ञाग्नी, अन् हवन यज्ञकर्म
ब्रम्हरूप हे तिन्ही जो करी त्यास मिळे ब्रम्ह २४

देवांसाठी कोणी योगी यज्ञकार्य करिती
तर कोणी यज्ञाची पूजा यज्ञाने मांडती २५

नाक कान अन् दॄष्टी यांचा संयम पाळुनिया
उच्चारण करि त्या जिव्हेला आवर घालुनिया
एक प्रकारे या सर्वाचे असे हवन करुन
कोणी योगी आचरिती जे तेहि असे यजन २६

सर्व इंद्रियांच्या कर्मांचे ज्ञानाग्नित हवन
करिति कोणी तो असतो आत्मसंयमन यज्ञ २७

धन, तप, आत्माभ्यास असे कितितरी विविध यज्ञ
करीत असती पूर्णव्रताचरणी ऐसे सूज्ञ २८

श्वासोच्छवासावरी ठेवती ताबा मुनि काही
प्राणायामाच्या स्वरूपातिल यज्ञाचे आग्रही २९

अन्ननियोजन हेही कुणाला यज्ञासम ज्ञात
सर्व यज्ञकर्मी ऐसे हे असति पुण्यवंत ३०

यज्ञानंतर उरते अमृत तेच फक्त भोगिती
ते पुण्यात्मे परलोकामधि ब्रम्हस्थान मिळविती
यांपैकी एकही यज्ञ ना करती जे लोक
इहलोकातहि नाहि स्थान त्यां कुठून स्वर्लोक ? ३१

वेदांमध्ये या साय्रा यज्ञांचे वर्णन आहे
कर्मामधुनी जन्म तयांचा सत्य जाण तू हे
ब्रम्हमुखाने सांगितलेल्यावरती दे लक्ष
या सत्याचे आकलन होता पावशील मोक्ष ३२

धनयज्ञाहुन मोठि श्रेष्ठता ज्ञानयज्ञाची
ज्ञानसाधना करून होते प्राप्ती मोक्षाची ३३

वंदन आणिक सेवा करूनि विचार ज्ञानिजनां,
उपदेशाने देतिल तुजला ज्ञान, कुंतिनंदना ३४

त्या ज्ञानाच्या योगे होशिल तूहि मोहमुक्त
समाविष्ट दिसतील सर्व जिव तुझ्या नि माझ्यात ३५

आणि मानले जरि पाप्यांहुन तू पापी असशी
ज्ञानाच्या जोरावर जातिल विरून पापराशी ३६

समिधा अग्नीमधी टाकिता होति भस्मसात
तशा प्रकारे ज्ञान करी कर्मांचा नि:पात ३७

या अवनीवर पवित्र ज्ञानाहून नसे काही
सिध्दयोगि पुरूषाला याची जाणिव मग होई ३८

ज्ञान हे मिळे समत्वबुध्दी श्रध्दावंताना
ज्या योगे ते अखेर जाती चिरशांतिनिधाना ३९

अज्ञ आणि अश्रध्द संशयात्म्यांचा हो नाश
इहपरलोकी त्या न मिळे शांतीचा लवलेश ४०

आत्मज्ञान मिळवून फलेच्छा जो टाकी त्यजुनी
कर्मयोगि तो होइ मुक्त मग कर्मबंधनातुनी ४१

अज्ञानातुनि जन्मुनि वसतो मनात जो संशय
ज्ञानाच्या खड्गे छिंदुनि तो उठि रे धनंजय ४२

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय पूर्ण झाला

१० एप्रिल, २००९

तिसरा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
कर्मयोग
नावाचा तिसरा अध्याय

अर्जुन म्हणाला‚
कर्मापेक्षा श्रेष्ठ बुध्दि हे तुझेच म्हणणे ना ?
तरि युध्दाच्या घोर कर्मी मज लोटिशी‚ जनार्दना ? १

दुटप्पी तुझ्या उपदेशाने कुण्ठित मति होई
निश्चित एकच मार्ग सांग जो श्रेयस्कर होई २

श्रीभगवान म्हणाले‚
हे कौंतेया दोन मार्ग मी वर्णन केले तुजसाठी
संन्याशाचा ज्ञानमार्ग अन् कर्मयोग योग्यांसाठी ३

कर्मारंभ न करण्याने ना होइ मुक्ती प्राप्त
अन् संन्यासी होउनदेखिल सिध्दी दुरापास्त ४

असो कुणीही‚ कर्मावाचुन बसूच ना शकतो
निसर्गनियमे बध्द कार्यरत असा सदा असतो ५

देखाव्याला इंद्रियसंयम‚ मनात जप जास्त
अशा नराला केवळ ‘दांभिक’ ही संज्ञा रास्त ६

मनी संयमित राहुनि करि जो कर्मप्रारंभ
निश्रित होतो खास प्रतिष्ठेचा त्याला लाभ ७

रिकामेपणे उगा न बसता कार्य तू करावे
श्रेयस्कर तुज स्वधर्मातले कर्म आचरावे
जाण अर्जुना क्रमप्राप्तही असे काम करणे
कर्म न करता अशक्य होइल उदराचे भरणे ८

यज्ञाखेरिज इतरहि कामे या लोकी‚ पार्थ
नि:संगपणे तीहि करावी जैसी यज्ञार्थ ९

यज्ञासह घडवुनी विश्व त्वष्टा होता वदला
यज्ञची करिल इच्छापूर्ती प्रदान तुम्हाला १०

देवांना प्रिय यज्ञ करूनिया खूष करा त्याना
तोषवतिल ते तुम्हास‚ श्रेयस् हे परस्पराना ११

यज्ञाने संतुष्ट देव हे फल सर्वा देती
परत तया जो न देइ त्याची ‘चोरां’मधि गणती १२

यज्ञानंतर उर्वरीत जे त्यावर उपजीवितो
तो नर होतो पापमुक्त अन् मोक्ष प्राप्त करतो
पण जे केवळ स्वत:चसाठी शिजवतात अन्न
अन् स्वत:च भक्षितात ते‚ ते खाती पापान्न १३

जिवास पोशी अन्न‚ ज्यास करी पाउस निर्माण
जन्म पावसाचा यज्ञातुन‚ कर्मांतुन यज्ञ १४

कर्म निघाले ब्रम्हापासुनि‚ ब्रम्ह ईशरूप
सर्वव्यापि ब्रम्ह म्हणूनच यज्ञाचे अधिप १५

यज्ञ कर्मचक्राला या जे अव्हेरती‚ पार्थ
पापी लंपट आयुष्य त्यांचे हो केवळ व्यर्थ १६
पण आत्म्यामधि मग्न राहुनी आत्म्यातच तुष्ट
ऐशांसाठी कार्य न उरते काही अवशिष्ट १७

ऐसा सज्जन करे काही वा काहीही न करे
कारण इतरांमधी तयाला स्वारस्यच ना उरे १८

कौंतेया‚ तू कर्म करावे अलिप्त राहून
अनासक्त कर्माचरणामधि आहे कल्याण १९

जनकासम जन सिध्दि पावले आचरून कर्म
लोकाग्रणि होण्यास्तव तुजला उचित नित्यकर्म २०

पुरूषश्रेष्ठ जे जे करतो ते इतर लोक करिती
प्रमाण मानी तो जे त्याला सगळे अनुसरिती २१

पार्था‚ या तिन्हि लोकी मजला कर्तव्यच नुरले
अथवा काही मिळवायाचे असेहि ना उरले
तरीही पहा कर्मावाचुन राहतो न कधि मी
सदैव असतो‚ हे पार्था‚ मी मग्न नित्यकर्मी २२

ध्यानी घे मी राहिन निष्क्रिय जर आळस करूनी
निष्क्रिय बनतिल जनही सारे मजला अनुसरूनी २३

अन् त्या निष्क्रियतेतुन त्यांचा होइल जो नाश
ठरेन कारण मीच अर्जुना त्यांच्या नाशास २४

अजाणते जन करिती कर्में होउनिया लिप्त
लोकाग्रणिने तशिच करावी राहूनि अलिप्त २५

कर्ममग्न पण अजाणत्याना कमी न लेखावे
अविकारिपणे कसे करावे कर्म‚ दाखवावे
स्वत: तसे आचरून करावे प्रवृत्त तयाना
हेच असे कर्तव्य ज्ञानी अन् लोकाग्रणिना २६

प्रकॄतिच्या त्रिगुणानी सारी कर्मे होत असता
अहंकारि अन् अज्ञानी म्हणे‚ तोच असे कर्ता २७

सुजाण जाणी गुण कर्मातील अध्याहॄत द्वैत
गुणातुनि गुण येती जाणुनि राही अविचलित २८

त्रिगुणांच्या मोहात राहति निमग्न अज्ञानी
सोडुन द्यावा पाठपुरावा त्यांचा सूज्ञानी २९

मजवरती सोपवुनी चिंता तू परिणामांची
नि:शंक सुरू करी प्रक्रिया या संग्रामाची ३०

नि:शंकपणे जे माझे आदेश अनुसरती
कर्मबंधनातुन ते श्रध्दावंत मुक्त होती ३१

मत्सरामुळे नकार देती करण्या अनुसरण
ते अविवेकी मूढ पावती नाश खचित जाण ३२

सुजाणही वागती आपुल्या स्वभावानुसार
तसेच जीवहि सर्व‚ काय मग करायचा जोर? ३३

विषयवासनांमध्ये वसती प्रीति अन् द्वेष
आधीन त्यांच्या कधी न व्हावे‚ दोन्ही रिपुरूप ३४

कितिहि भासले सोपे परधर्माचे अनुकरण
धर्म आपला पाळावा जरि नसला परिपूर्ण
स्वधर्मातले मरणे देखिल श्रेयस्कर ठरते
परधर्मामधि घुसमत जगणे भीतिप्रद असते ३५

अर्जुन म्हणाला‚
इच्छा नसतानाही करिती लोक पापकर्म
कोणाच्या बळजबरीने? मजसी करी कथन मर्म ३६

श्री भगवान म्हणाले‚
रजोगुणातुन जन्म घेति जे क्रोध आणि काम
तेच मुळाशी असती याच्या शत्रू अति अधम ३७

अग्नि धुराने‚ दर्पण धुळिने‚ नाळेने गर्भ
वेढले जसे तसे वेढले या रिपुनी सर्व ३८

सर्वभक्षि अग्नीसम आहे रिपू कामरूपी
तये टाकिले झाकोळुन रे तेज ज्ञानरूपी ३९

बुध्दि आणि मन तशी इंद्रिये तिहीत हा वसतो
ज्ञाना झाकुन टाकुन मनुजा सदैव मोहवितो ४०

म्हणुनि अर्जुना विषयवासनांचे करि संयमन
अन् ज्ञानाच्या‚ विज्ञानाच्या रिपुचे करि दमन ४१

इंद्रियांहुनी थोर असे मन‚ मनाहुनीहि मती
मतीहुनीही थोर असे त्या परमात्मा म्हणती ४२

परमात्म्याला जाण‚ पार्थ‚ अन् स्वत:स आवरूनी
कामस्वरूपी शत्रूचा तू टाक अंत करूनी ४३

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला

०९ एप्रिल, २००९

दुसरा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग
नावाचा दुसरा अध्याय

अश्रूनी डबडबले डोळे आणिक मन खिन्न
अशा अर्जुना पाहुनि वदते झाले मधुसूदन १

“आर्यांना शोभा ना देती असली ही तर्कटे
कुठून तुझिया मनात, पार्था‚ आली ही जळमटे २

नको दाखवू नामर्दपणा जो लांछनकारी
खंबीरपणे युध्द कराया ऊठ‚ धनुर्धारी” ३

अर्जुन म्हणाला‚
श्रीकृष्णा‚ हे भीष्म‚ द्रोण या परमपूज्य व्यक्ती
त्यांना मारायासाठी मी आणु कुठुन शक्ती ४

गुरूहत्येपेक्षा खावे मी भिक्षा मागून
माखावें त्यांच्या रक्ताने बदतर त्याहून ५

आम्हि जिंकावे अथवा त्यानी या पर्यायात
मला केशवा योग्य काय ते हे नाही कळत
ज्याना मारून आम्ही उरावे हे न मना पटते
तेच उभे सामोरि लढाया‚ मम कौरव भ्राते ६

कुंठितमति मी‚ काय करू हे कळते ना मजसी
सांग केशवा शिष्य तुझा मी‚ शरण आलो तुजसी ७

स्वर्गधरेचे राज्य दिले तरि कुणि न सांगू शकते
अनुत्तरित शंका हि सर्वथा मनास मम शोषते ८


संजय म्हणाला‚
इतुके सारे सांगुनी अर्जुन कृष्णासी बोलला
“नाही मी लढणार” म्हणुनिया स्तब्ध उभा राहिला ९

दोन्ही सैन्यांमध्ये थांबल्या खिन्न अर्जुनाला
अस्फुटसे हसुनिया कृष्ण मग वदले या बोला‚ १०

श्री भगवान म्हणाले‚
“शोकासाठी पात्र जे न तू विचार त्याचा करिशी
आणिक मोठया विद्वानासम भाषण पण देशी
अरे कुणी जगला वा मेला शोक न पंडित करती
अन् मरण्या मारण्यावरून तुझि कुंठित होते मती ? ११

असे न की मी‚ तू‚ हे राजे‚ नव्हतो पूर्वी कधि
असेहि नाही की आपण यापुढे न होणे कधी १२

जो जन्मे त्या येइ बालपण‚ यौवन‚ वृध्दपणा
अन् मग मिळते शरीर त्या दुजे ही तर क्रमधारणा
हे ठाउक ज्या ते ज्ञानीजन पडति न मोहात
कारण त्याना ज्ञात कि सारे असते क्रमप्राप्त १३

हे कुन्तिसुता‚ शीतउष्ण वा सुखदुखकारक जे
येते‚ जाते‚ संतत नसते‚ सहन करी तू ते १४

ज्या पुरूषाला या सर्वांची व्यथा न बाधे तो
सुखदु:खाला समान मानुनि अमरत्वा जातो १५

जें ‘आहे’ ते ‘नाही’ नसते जे ‘नाही’ ते ‘असते’ ना
ज्ञानी जाणत पूर्णपणें ‘आहे–नाही’ च्या तत्वाना १६

ज्या शक्तीने केलि निर्मिती अन् राहे व्यापून
तिच्या विनाशा समर्थ कुणिहि नसे‚ कुन्तिनंदन १७

नाशवंत देहांचा धारक ‘आत्मा’ अविनाशी
जाणुनि घे अर्जुना‚ आणि हो तयार युध्दासी १८

आत्मा मारी सर्वांना अन् स्वत:हि पावे मरण
असे समजती जे जे कोणी ते ते अनभिज्ञ १९

नाही जन्मत‚ मरतहि नाही आत्मा चिरंजिवी
आज असे अन् पुन्हा न होइल असाहि तो नाही
चिरंजीव अन् पुरातन असा हा आत्मा आहे
नाश पावली जरी शरीरे तरी उरून राहे २०

आत्म्याचे अविनाशि रूप हे असे जया अवगत
तो कैसा मारील‚ मारविल कुणासही‚ पार्थ ? २१

सहजपणे जैसी मनुजाने वसने बदलावी
तशीच आत्मा जीर्ण शरीरे त्यागुनी चढवी नवी २२

शस्त्रे नाहित समर्थ चिरण्या, यास‚ अग्नि जाळण्या
पाणी पण असमर्थ भिजवण्या‚ वाराही शोषण्या २३

शस्त्र‚ अग्नि‚ जल‚ वारा याना करी पराभूत
सर्वव्यापि अन् स्थिर सदैव हा आत्मा कालातीत २४

अविकारी‚ अव्यक्त आणि समजाया कठिणतर
ऐशा आत्म्या जाणुन घेउनि शोक तुझा आवर २५

आणि जरी तू मानत असशिल जन्मुनि मरतो हा
तरी तयास्तव शोक मांडणे तुला न दे शोभा २६

जो जन्मे त्या मरणे आणि मॄता पुन्हा जन्मणे
असते हे अनिवार्य जाण अन् टाळ शोक करणे २७

प्राणिमात्र अदृश्य आधि अन् मध्यकाली दॄश्य
पुन्हा अंति अदृश्य होति, मग शोक अनावश्य २८

कुणास भासे नवल‚ वर्णितो कुणी नवलवत् हा
कुणी ऐकितो नवलच याचे‚ तरि कुणा न ठावा २९

अवध्य हा आत्मा सजिवांच्या शरिरांचा स्वामी
म्हणुन शोक सजिवांस्तव करणे ठरते कुचकामी ३०

धर्मोचित युध्दापरि श्रेयस्कर ना काहीही
युध्दापासुन विचलित होणे क्षात्रधर्म नाहीं ३१

स्वर्गाचे जणु द्वार असे हे धर्मयुध्द जाण
भाग्यवंत क्षत्रियास केवळ मिळतो हा मान ३२

तरि धर्मोचित युध्दाला जर नकार तू देशी
स्वधर्म आणि कीर्ति गमावून पापभार घेशी ३३

छी थू होइल तव कौंतेया‚ सार्‍या लोकात
मरणाहुनिही दु:खद ऐसी होइल दुष्कीर्त ३४

रणावरूनि पळणारा म्हणुनी तुझ्याकडे बघतील
प्रतिष्ठा तुझी विसरून तुजला कस्पटाशि तुलतील ३५

नको नको ते शब्द बोलतिल तव कुवतीविषयी
अशी कुचेष्टा ऐकुन घेणे होइल दुखदायी ३६

रणात मरूनी स्वर्ग मिळवशिल‚ विजयि होउनी राज्य
ऊठ करोनी विचार याचा हो युध्दाला सज्ज ३७

सुखदु:ख तसे नफा नि तोटा जय नि पराजयही
उभयाना सारखे गणुनि‚ लढ त्यात पाप नाही ३८

इथवर पार्था मी सांगितला सांख्ययोग तुजप्रती
कर्मयोग हा ऐक आता जै कर्मबंध तुटती ३९

प्रारंभित कर्माचा त्याने नाश नाहि होत
अल्पहि पालन या योगाचे करी भीतिमुक्त ४०

कर्में निश्चित करते जी ती बुध्दि हवी एकाग्र
विचलित बुध्दीचे नर होती वासनांमुळे व्यग्र ४१

वेदांमधल्या कर्मकांडपर वाक्यांना भुलणारे
वेदविशारद समजतात कर्माविण काहि न दुसरे ४२

‘नानाविध कर्मे केल्यावर होते फलप्राप्ती
जी असते ऐश्वर्यभोग’ ऐसे ते प्रतिपादिती ४३

भोग आणि ऐश्वर्यामागे जे हे पळतात
बुध्दि त्यांची होउ न शकते स्थिर समाधिस्त ४४

सत्व रज तम या त्रिगुणानी भरलेले वेद
त्रिगुणांच्या पलिकडे अर्जुना‚ हो तू स्वयंसिध्द ४५

महापूर पाणी असता जे महत्व विहिरीचे
ज्ञानी पुरूषाना बस् तितुके कौतुक वेदांचे ४६

कर्म करावे‚ करित रहावे हाच हक्क तुजला
कर्मफलाचा वाटा मिळणे हा नाही दिधला
फलप्राप्ती झालीच पाहिजे असा नसे न्याय
फलाअभावी कर्म न करणे हा नच पर्याय ४७

अनासक्त होऊन कर्म कर योगाच्या ठायी
कार्यसिध्दि हो वा ना हो तरि निर्विकार राही
यश अपयश मानुनी एक अन् राहुनि नि:संग
कर्म असे करण्यास अर्जुना‚ नाव कर्मयोग ४८

कर्म कधीही कनिष्ठ ठरते समबुध्दीपेक्षा
बापुडवाणे मनात धरती कर्मफल अपेक्षा ४९

पाप पुण्य दोन्हीतुन राही अलिप्त समबुध्दी
चतुरार्इने आचर कर्मे हीच कर्मबुध्दी ५०

कर्मफलाला दुर्लक्षिति जे राहुनी अलिप्त
जन्मबंधनापासुन होती ऐसे नर मुक्त ५१

गढुळ मोहपर्यावरणातुन मुक्त जधि होशी
ऐकलेस त्या‚ ऐकशील त्या वेदां कंटाळशी ५२

अन् वेदांनी कुंठित मति तव होइल स्थिर जेव्हा
स्थिरबुध्दी तुज कर्मयोग होइल प्राप्त तेव्हा ५३

अर्जुन म्हणाला‚
सांग‚ केशवा‚ मज स्थिरबुध्दी मनुजाची लक्षणे
कैसे त्याचे उठणे‚ बसणे‚ अन् कैसे बोलणे? ५४

श्रीभगवान म्हणाले‚
सर्व कामना तशा वासना सोडुनि जो तुष्ट
तो स्थिरबुध्दी अलिप्ततेने राहि आत्मनिष्ठ ५५

दु:खामधि ना खेद जया‚ ना सुखात आसक्ती
स्थिरबुध्दी तो सुटली ज्याची प्रेम‚ राग‚ भीती ५६

या सर्वांतुनी मुक्त होउनी हो ज्याची शुध्दी
शुभाशुभाचा मोद खेद ना ज्या तो स्थिरबुध्दी ५७

कासव जैसे अवयव आपुले घेइ आवरून
तसा विषयवासना आवरून धरी स्थितप्रज्ञ ५८

निराहारिचे भोजन सुटते परी न रसभक्ती
परमज्ञान मिळता पण सुटते सर्वच आसक्ती ५९

परमज्ञान ना‚ अन् आचरिती दमन इंद्रियांचे
सुप्तवासनांमध्ये भरकटे मनमानस त्यांचे ६०

संयम करूनी होती जे मम ठायी परायण
त्यांच्या स्वाधिन त्यांचि इंद्रिये तेच स्थितप्रज्ञ ६१

विचार मनि जो करि विषयाचा‚ होई आधीन
आधिनता मग जने वासना‚ राग वासनेतुन ६२

रागातुन जन्मतो मोह जो करी स्मरण~हास
विस्मरणाने बुध्दि फिरे‚ तदनंतर हो नाश ६३

काबु मनावर ठेवुनि वागे असा स्थितप्रज्ञ
रागद्वेषविरहितपणे घे भोग‚ तरि प्रसन्न ६४

अन प्रसन्न मन करते सार्‍या दु:खांचे हरण
प्रसन्नमन जो तो स्थिरबुध्दी हे निश्चित जाण ६५

अस्थिर बुध्दी ज्याची तो भावनाशील नसतो
शून्य भावना ज्याला तो कधि शांती न मिळवतो ६६

विषयवासनांच्या मागे मन स्वैर धाव घेई
वारा जैसी पाण्यावरली नौका भिरकावी ६७

जये इंद्रियांना आवरले मन करूनी ठाम
ते नर करती स्थिर आपुली बुध्दी निष्काम ६८

जागा राही‚ जग सारे असताना झोपेमधीं
अन् जग जागे असता झोपे तो नर स्थिरबुध्दी ६९

तुडुंब भरला सागर राही बंद किनार्‍यात
तरिहि पुराचें पाणी समावे त्याच्या उदरात
तसा शांत स्थितप्रज्ञ, असुनिही विषयज्ञान त्याला
अशी शांति नच लाभे कधिही विषयलोलुपाला ७०

सर्व कामना त्यागुनि जगतो जो निरिच्छवृत्ती
निगर्वी तसा निर्मोही हो त्यास शांति प्राप्ती ७१

अशी स्थिती ही ब्राम्ही म्हणुनी ओळखली जाई
मिळता जी मनुजाला कसला मोह कधि न होई
अशा स्थितित जरि मनुष्य राहिल अंतिम समयाला
तरि ब्रम्हनिर्माणस्वरूपी मोक्ष मिळे त्याला ७२

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.

०८ एप्रिल, २००९

पहिला अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अर्जुनविषादयोग
नावाचा पहिला अध्याय

धृतराष्ट्र म्हणाला,
पंडूच्या अन् अमुच्या पुत्रां होउन युध्दज्वर
करति काय कुरूक्षेत्री ते मी जाणाया आतुर १

संजय म्हणाला,
पांडवसेनेची झालेली रचना पाहून
भीष्माचार्यांसमीप जाउन वदला दुर्योधन २

'पहा गुरूवर, ठाकली इथे ही पांडवसेना
द्रुपदपुत्र तुमच्या शिष्याने केलि तिची रचना ३

यांत सात्यकी, द्रुपद महारथी, आणिक युयुधान
शूर धनुर्धर इतके जितके भीम अन् अर्जून ४

धृष्टकेतु, चेकितान, काशीराज, वीर्यवान,
पुरूजित, कुंतीभोज, शैब्य हे वीर धैर्यवान ५

युधामन्यु, विक्रांत आणखी उत्तमौज हे रथी
अभिमन्यू समवेत द्रौपदीपुत्रहि महारथी ६

आता अपुल्या सेनेमधल्या विशेष वीरांची
नावे मी सांगतो, लक्ष्य द्या, स्मृतीत ठेवायची ७

भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण, भूरिश्रव
वीर अन्यही स्वप्राणांवर उदार माझ्यास्तव ८, ९

अमर्याद सेना ही अमुची भीष्माच्या रक्षणीं
मर्यादित ती पांडवसेना भीम जिचा अग्रणी १०

व्यूहमुखे नेमून दिलेली लढवा, शूरांनो
सर्व दिशांनी भीष्मांना द्या रक्षण वीरांनो, ११

सुयोधनाला आनंदविण्या भीष्माचार्यानी
प्रतापवान् हा शंख फुंकिला सिंहनाद करूनि १२

लगेच भेर्‍या, शंख, नौबती या रणवाद्यांनी
करूनी तुंबळ नाद टाकिलें आसमन्त भरूनि १३

श्वेताश्वांच्या रथात बसल्या कॄष्णअर्जुनानी
प्रत्त्युत्तर मग दिले आपले दिव्य शंख फुकुनी १४

हृषिकेशाचा पांचजन्य, अन् देवदत्त पार्थाचा
पौंड्र नामक महाशंख तो बलिष्ठ भीमाचा १५

युधिष्ठिराचा अनंतविजय, सुघोष नकुलाचा
सहदेवाने नाद काढला मणीपुष्पकाचा १६

काशीराज, शिखंडि, सात्यकी, विराट अन् द्रुपद
धृष्टद्युम्न, अभिमन्यु आणखी द्रौपदिचे नंद १७

या सर्वांनी दणाणले मग नभ आणिक अवनी
पूर्ण स्वरानें आपआपले महाशंख फुंकुनी १८

तुंबळ नादे त्या विदारली कौरवांचि हृदये
सज्ज जाहले युध्दा ते, ओळखले धनंजये १९

हे धृतराष्ट्रा, हृषिकेशासी वदला मग पांडव
'दोन्ही सैन्यांमधे, अच्युता, रथ नेउनी ठेव २०

युध्दासाठी सज्ज जाहले लोक कोण कोण
कुणासवे मज लढायचे मी करीन अवलोकन २१, २२

दुर्बुध्दी दुर्योधन, त्याचे कोण साहयकर्ते
जमले येथे त्या सर्वां मज पाहू दे पुरते' २३

धनंजयाचे हे वच ऐकुन श्री हृषिकेशानी
दो सैन्यांच्या मधे ठेविला रथ मग नेऊनी २४

'भीष्म, द्रोण या आचार्यांसह सर्व वीर अन्य
पहा अर्जुना इथे उपस्थित' वदले श्रीकृष्ण २५

तेव्हा पार्था दिसले तेथे बंधु, आप्त, मित्र,
पिता, पितामह, श्वसुर, श्यालक, पुत्र तसे पौत्र २६

या सर्वांना पाहुनि तेथे दोन्ही सैन्यात
खिन्न मनाने, दीन वाणिने, वदला मग पार्थ २७

अर्जुन म्हणाला,
'हे सारे मम स्वकीय बघुनी युध्दोत्सुक येथे
शिथील पडती गात्रे माझी, मुखहि शुष्क होते २८

गांडिव हातातून निसटते अन् तनु थरकापते
राहावते ना उभे नि माझे मनही भिरभिरते २९

दिसति, केशवा, विपरित मजला युध्दातिल लक्षणे
कल्याणप्रद ठरेल कैसे स्वजनांना मारणे? ३०

नको विजय अन् नको राज्यही स्वजनां मारूनिया
उपभोगावे राज्य कसे रे जिवंत राहुनिया? ३१

ज्यांच्यासाठी सुखराशींची मनात अभिलाषा
पहा इथे ते उभे ठाकले त्यागुन जीवाशा ३२

पिता, पितामह, श्वसुर, श्यालक, पुत्र, पौत्र, प्रियजन
यांसर्वांसाठी तर धरतो राज्येच्छा आपण ३३

आम्हास मारावया जरी हे उभे ठाकले इथे
या सर्वांना मारून उरणे मनास ना पटते ३४


त्रैलोकाचे राज्य जरी मज मिळेल युध्दातुन
नको मिळाया त्रिलोक जर तो यांच्या मरणातुन ३५

मिळेल आम्हा काय जनार्दन कौरवांस मारूनी?
दुष्ट जरी ते, मारूनिया त्या आम्हि पापाचे धनी ३६

कौरव झाले तरि अपुले, मग कैसे मारावे?
स्वजनां मारून आम्ही पांडव सुखी कैसे व्हावे? ३७

बुध्दिभ्रष्ट अन् लोभी ते मित्रांशि द्रोह करिती
कुलनाशातिल पापाचीही त्यांना नाहि क्षिती ३८

आम्हाला परि कुलक्षयातिल भीषणता ज्ञात
का नाही मग टाळावा तो न पडुनि युध्दात? ३९

कुलक्षयाने विनाश पावे कुलधर्माचार
धर्माचारावाचुन माजे अधर्म जो स्वैर ४०

अधर्मातुनी कुलस्त्रियांमधी ये स्वैराचार
स्वैराचारी स्त्रियांकडुनि हो वर्णाचा संकर ४१

वर्णाच्या संकरामुळे कुल बुडते नरकात
पिंडोदक ना मिळून पूर्वज पडति रौरवात ४२

कुलबुडव्यांच्या संकरामुळे प्रचलित आचार
विस्मरले जाऊन त्या कुला उरे न आधार ४३

अशा कुलातिल मानव जातो निश्चित नरकात
आले आहे असे आजवर माझ्या श्रवणात ४४

ज्ञात असुनिही पाप काय जे स्वजन मारण्यात
राज्यसुखाच्या लोभाने का झालो प्रवृत्त ? ४५

यापेक्षा मी स्वस्थ रहातो टाकुनिया आयुधे
कल्याणच मम होइल कौरवहस्ते मरण्यामधे? ४६

बोलुनि इतके खालि ठेविले धनुष्य अन् बाण
अन् रथामधि बसुन राहिला खिन्नमने अर्जुन ४७

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
अर्जुनविषादयोग नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला.

०७ एप्रिल, २००९

उपोद्घात

ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षात कुरूक्षेत्रावर महाभारत युध्द सुरू होण्याच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनावर स्वकीयांवरील प्रेमापोटी मळभ आले. ते मळभ दूर सारून त्याला पुन्हा क्षात्रधर्मानुसारचे आपले कार्य करायला उद्युक्त करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकॄष्णानी त्याला रणभूमीवर केलेला उपदेश, आणि त्या अनुषंगाने अर्जुनाला आलेल्या शंकांचे निरसन करावे म्हणून सविस्तर सांगितलेले ज्ञान, यातून हा गीतोपनिषदाचा ग्रंथ बनला आहे जो ‘श्रीमद्भगवद्गीता’ अथवा सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो.

गीता ही अठरा अध्यायांत विभागलेली आहे आणि या अठरा अध्यायात एकूण सातशे एक श्लोक आहेत. (गीतेच्या काही प्रतींमध्ये तेराव्या अध्यायातील पहिला श्लोक प्रक्षिप्त मानून गाळला गेलेला आहे. तो गाळल्यास एकूण श्लोकसंख्या सातशे होते).

अध्याय पहिला..........अर्जुनविषादयोग...............४७
अध्याय दुसरा...........सांख्ययोग..................७२
अध्याय तिसरा..........कर्मयोग....................४३
अध्याय चौथा...........ज्ञानकर्मसंन्यासयोग............४२
अध्याय पाचवा..........संन्यासयोग.................२९
अध्याय सहावा..........ध्यानयोग...................४७
अध्याय सातवा..........ज्ञानविज्ञानयोग...............३०
अध्याय आठवा..........अक्षरब्रम्हयोग................२८
अध्याय नववा...........राजविद्याराजगुह्मयोग............३४
अध्याय दहावा...........विभूतियोग..................४२
अध्याय अकरावा..........विश्वरूपदर्शनयोग..............५५
अध्याय बारावा...........भक्तियोग...................२०
अध्याय तेरावा...........क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग.............३५
अध्याय चौदावा..........गुणत्रयविभागयोग...............२७
अध्याय पंधरावा..........पुरूषोत्तमयोग.................२०
अध्याय सोळावा..........दैवासुरसंपद्विभागयोग............२४
अध्याय सतरावा..........श्रध्दात्रयविभागयोग.............२८
अध्याय अठरावा..........मोक्षसंन्यासयोग...............७८

या अठरा अध्यायांत मिळून अर्जुनासाठी केवळ ‘युध्द कर’ एवढाच उपदेश नाही. चारी वर्णां साठी स्वभावधर्माप्रमाणे नियोजित असलेली आपआपली कर्मे करण्यामध्ये पाप नसून ईश्वरावर नितांत भक्ती आणि विश्वास ठेऊन, निरिच्छबुध्दीने, म्हणजे फलाची आशा न धरता आणि, ‘हे मी त्या परम् ईश्वरासाठी करतो आहे’ ही भावना बाळगून केली तर त्या त्या कर्मात असलेल्या नसलेल्या सर्व दोषांचे आपोआप निवारण होते. किंबहुना कर्मे करणार्‍याला जरी ती तो स्वत: करतो आहे असे वाटत असले तरी ती सारी त्या परम् ईश्वराच्या प्रेरणेवरून घडत असतात. त्यामुळे कर्म करणेच नको अशी भावना धरून निष्कर्मी रहाणे अथवा कर्मसंन्यास घेणे हे व्यर्थ आणि त्या परम् ईश्वराच्या आदेशाच्या बाहेर होईल म्हणून तसे करणे टाळावे. फलाची अपेक्षा न धरता नियोजित कर्मे करून ईश्वराची भक्तीपूर्वक आराधना केली म्हणजे मनुष्याला पुनर्जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते. असे हे ब्रम्हज्ञान स्वत: भगवान श्रीकॄष्णाने कुरूक्षेत्रावरील महाभारतयुध्दाच्या निमित्ताने अर्जुनाला दिले. त्याला युध्द करण्याने आपणच आपल्या आप्तजनांचा संहार करणार असल्याबद्दलची जी शंका होती ती स्वत:च्या परम् ईश्वर या विराट स्वरूपाचे दर्शन दाखवून आणि तो संहार अर्जुन नव्हे तर आपण स्वत:च करीत असल्याचे स्पष्ट करून निवारण केली आणि अर्जुनाच्या मनावर आलेले मोह आणि अज्ञानाचे सावट दूर करून त्याला त्याचे क्षत्रियाकडून अपेक्षित असे असलेले युध्दकर्तव्य पार पाडण्यास प्रवॄत्त केले.

हे सारे ज्ञान संजय, जो त्याला व्यासमुनीनी दिलेल्या दिव्य दॄष्टीमुळे कुरूक्षेत्रावरील घटनाक्रम बसल्या जागेवरून समक्ष पाहू शकत होता, याने धॄतराष्ट्रासाठी वर्णन केलेल्या भगवान श्रीकॄष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाच्या रूपात पण मराठी श्लोक स्वरूपात मी पुढे सादर करत आहे.

हे मराठीकरण करताना मूळ संस्कॄतमधील ‘गीतोपनिषद’, कै. विनोबा भावे यांची ‘गीताई, कै. लोकमान्य टिळकांनी केलेला मराठी गद्यात्मक अनुवाद ‘श्रीमद्भगवद्गीता मूळ श्लोक व भाषांतर’, ‘भावार्थ दीपिका­ज्ञानेश्वरी’, श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे अनुवादित पुस्तक ‘भगवद्गीता जशी आहे तशी’ आणि इंटरनेटवरून उपलब्ध असलेली माहिती या सार्‍यांचे परिशीलन करून मी हा प्रयत्न केला आहे.

संस्कॄत भाषेत समास आणि संधि यांच्या सहाय्याने वाक्यरचना छोटया स्वरूपाची करता येते मराठीत तसे संधिरूपातले शब्द वापरण्याने दुर्बोधता येते ती टाळावी आणि मूळ श्लोकाचा संपूर्ण अर्थ मराठी रचनेत यावा म्हणून काही श्लोक दोन चरणांऐवजी चार अथवा प्रसंगी आठ चरणांचेही केले आहेत.

संत एकनाथांच्या मतानुसार ‘ज्ञानेश्वरीचिये पाठी ओवी करोनि मर्‍हाटी’ मी ‘अमॄताचिये ताटी नरोटी ठेविली’ असेल. तरीही आजच्या प्रचलित मराठी बोलीत रूपांतर केलेली गेय स्वरूपातली गीता लोकाना समजणे सोपे जाईल अशा प्रामाणिक मनोभावनेनेच हा प्रमाद मी केला आहे.