१० एप्रिल, २००९

तिसरा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
कर्मयोग
नावाचा तिसरा अध्याय

अर्जुन म्हणाला‚
कर्मापेक्षा श्रेष्ठ बुध्दि हे तुझेच म्हणणे ना ?
तरि युध्दाच्या घोर कर्मी मज लोटिशी‚ जनार्दना ? १

दुटप्पी तुझ्या उपदेशाने कुण्ठित मति होई
निश्चित एकच मार्ग सांग जो श्रेयस्कर होई २

श्रीभगवान म्हणाले‚
हे कौंतेया दोन मार्ग मी वर्णन केले तुजसाठी
संन्याशाचा ज्ञानमार्ग अन् कर्मयोग योग्यांसाठी ३

कर्मारंभ न करण्याने ना होइ मुक्ती प्राप्त
अन् संन्यासी होउनदेखिल सिध्दी दुरापास्त ४

असो कुणीही‚ कर्मावाचुन बसूच ना शकतो
निसर्गनियमे बध्द कार्यरत असा सदा असतो ५

देखाव्याला इंद्रियसंयम‚ मनात जप जास्त
अशा नराला केवळ ‘दांभिक’ ही संज्ञा रास्त ६

मनी संयमित राहुनि करि जो कर्मप्रारंभ
निश्रित होतो खास प्रतिष्ठेचा त्याला लाभ ७

रिकामेपणे उगा न बसता कार्य तू करावे
श्रेयस्कर तुज स्वधर्मातले कर्म आचरावे
जाण अर्जुना क्रमप्राप्तही असे काम करणे
कर्म न करता अशक्य होइल उदराचे भरणे ८

यज्ञाखेरिज इतरहि कामे या लोकी‚ पार्थ
नि:संगपणे तीहि करावी जैसी यज्ञार्थ ९

यज्ञासह घडवुनी विश्व त्वष्टा होता वदला
यज्ञची करिल इच्छापूर्ती प्रदान तुम्हाला १०

देवांना प्रिय यज्ञ करूनिया खूष करा त्याना
तोषवतिल ते तुम्हास‚ श्रेयस् हे परस्पराना ११

यज्ञाने संतुष्ट देव हे फल सर्वा देती
परत तया जो न देइ त्याची ‘चोरां’मधि गणती १२

यज्ञानंतर उर्वरीत जे त्यावर उपजीवितो
तो नर होतो पापमुक्त अन् मोक्ष प्राप्त करतो
पण जे केवळ स्वत:चसाठी शिजवतात अन्न
अन् स्वत:च भक्षितात ते‚ ते खाती पापान्न १३

जिवास पोशी अन्न‚ ज्यास करी पाउस निर्माण
जन्म पावसाचा यज्ञातुन‚ कर्मांतुन यज्ञ १४

कर्म निघाले ब्रम्हापासुनि‚ ब्रम्ह ईशरूप
सर्वव्यापि ब्रम्ह म्हणूनच यज्ञाचे अधिप १५

यज्ञ कर्मचक्राला या जे अव्हेरती‚ पार्थ
पापी लंपट आयुष्य त्यांचे हो केवळ व्यर्थ १६
पण आत्म्यामधि मग्न राहुनी आत्म्यातच तुष्ट
ऐशांसाठी कार्य न उरते काही अवशिष्ट १७

ऐसा सज्जन करे काही वा काहीही न करे
कारण इतरांमधी तयाला स्वारस्यच ना उरे १८

कौंतेया‚ तू कर्म करावे अलिप्त राहून
अनासक्त कर्माचरणामधि आहे कल्याण १९

जनकासम जन सिध्दि पावले आचरून कर्म
लोकाग्रणि होण्यास्तव तुजला उचित नित्यकर्म २०

पुरूषश्रेष्ठ जे जे करतो ते इतर लोक करिती
प्रमाण मानी तो जे त्याला सगळे अनुसरिती २१

पार्था‚ या तिन्हि लोकी मजला कर्तव्यच नुरले
अथवा काही मिळवायाचे असेहि ना उरले
तरीही पहा कर्मावाचुन राहतो न कधि मी
सदैव असतो‚ हे पार्था‚ मी मग्न नित्यकर्मी २२

ध्यानी घे मी राहिन निष्क्रिय जर आळस करूनी
निष्क्रिय बनतिल जनही सारे मजला अनुसरूनी २३

अन् त्या निष्क्रियतेतुन त्यांचा होइल जो नाश
ठरेन कारण मीच अर्जुना त्यांच्या नाशास २४

अजाणते जन करिती कर्में होउनिया लिप्त
लोकाग्रणिने तशिच करावी राहूनि अलिप्त २५

कर्ममग्न पण अजाणत्याना कमी न लेखावे
अविकारिपणे कसे करावे कर्म‚ दाखवावे
स्वत: तसे आचरून करावे प्रवृत्त तयाना
हेच असे कर्तव्य ज्ञानी अन् लोकाग्रणिना २६

प्रकॄतिच्या त्रिगुणानी सारी कर्मे होत असता
अहंकारि अन् अज्ञानी म्हणे‚ तोच असे कर्ता २७

सुजाण जाणी गुण कर्मातील अध्याहॄत द्वैत
गुणातुनि गुण येती जाणुनि राही अविचलित २८

त्रिगुणांच्या मोहात राहति निमग्न अज्ञानी
सोडुन द्यावा पाठपुरावा त्यांचा सूज्ञानी २९

मजवरती सोपवुनी चिंता तू परिणामांची
नि:शंक सुरू करी प्रक्रिया या संग्रामाची ३०

नि:शंकपणे जे माझे आदेश अनुसरती
कर्मबंधनातुन ते श्रध्दावंत मुक्त होती ३१

मत्सरामुळे नकार देती करण्या अनुसरण
ते अविवेकी मूढ पावती नाश खचित जाण ३२

सुजाणही वागती आपुल्या स्वभावानुसार
तसेच जीवहि सर्व‚ काय मग करायचा जोर? ३३

विषयवासनांमध्ये वसती प्रीति अन् द्वेष
आधीन त्यांच्या कधी न व्हावे‚ दोन्ही रिपुरूप ३४

कितिहि भासले सोपे परधर्माचे अनुकरण
धर्म आपला पाळावा जरि नसला परिपूर्ण
स्वधर्मातले मरणे देखिल श्रेयस्कर ठरते
परधर्मामधि घुसमत जगणे भीतिप्रद असते ३५

अर्जुन म्हणाला‚
इच्छा नसतानाही करिती लोक पापकर्म
कोणाच्या बळजबरीने? मजसी करी कथन मर्म ३६

श्री भगवान म्हणाले‚
रजोगुणातुन जन्म घेति जे क्रोध आणि काम
तेच मुळाशी असती याच्या शत्रू अति अधम ३७

अग्नि धुराने‚ दर्पण धुळिने‚ नाळेने गर्भ
वेढले जसे तसे वेढले या रिपुनी सर्व ३८

सर्वभक्षि अग्नीसम आहे रिपू कामरूपी
तये टाकिले झाकोळुन रे तेज ज्ञानरूपी ३९

बुध्दि आणि मन तशी इंद्रिये तिहीत हा वसतो
ज्ञाना झाकुन टाकुन मनुजा सदैव मोहवितो ४०

म्हणुनि अर्जुना विषयवासनांचे करि संयमन
अन् ज्ञानाच्या‚ विज्ञानाच्या रिपुचे करि दमन ४१

इंद्रियांहुनी थोर असे मन‚ मनाहुनीहि मती
मतीहुनीही थोर असे त्या परमात्मा म्हणती ४२

परमात्म्याला जाण‚ पार्थ‚ अन् स्वत:स आवरूनी
कामस्वरूपी शत्रूचा तू टाक अंत करूनी ४३

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा