०९ एप्रिल, २००९

दुसरा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग
नावाचा दुसरा अध्याय

अश्रूनी डबडबले डोळे आणिक मन खिन्न
अशा अर्जुना पाहुनि वदते झाले मधुसूदन १

“आर्यांना शोभा ना देती असली ही तर्कटे
कुठून तुझिया मनात, पार्था‚ आली ही जळमटे २

नको दाखवू नामर्दपणा जो लांछनकारी
खंबीरपणे युध्द कराया ऊठ‚ धनुर्धारी” ३

अर्जुन म्हणाला‚
श्रीकृष्णा‚ हे भीष्म‚ द्रोण या परमपूज्य व्यक्ती
त्यांना मारायासाठी मी आणु कुठुन शक्ती ४

गुरूहत्येपेक्षा खावे मी भिक्षा मागून
माखावें त्यांच्या रक्ताने बदतर त्याहून ५

आम्हि जिंकावे अथवा त्यानी या पर्यायात
मला केशवा योग्य काय ते हे नाही कळत
ज्याना मारून आम्ही उरावे हे न मना पटते
तेच उभे सामोरि लढाया‚ मम कौरव भ्राते ६

कुंठितमति मी‚ काय करू हे कळते ना मजसी
सांग केशवा शिष्य तुझा मी‚ शरण आलो तुजसी ७

स्वर्गधरेचे राज्य दिले तरि कुणि न सांगू शकते
अनुत्तरित शंका हि सर्वथा मनास मम शोषते ८


संजय म्हणाला‚
इतुके सारे सांगुनी अर्जुन कृष्णासी बोलला
“नाही मी लढणार” म्हणुनिया स्तब्ध उभा राहिला ९

दोन्ही सैन्यांमध्ये थांबल्या खिन्न अर्जुनाला
अस्फुटसे हसुनिया कृष्ण मग वदले या बोला‚ १०

श्री भगवान म्हणाले‚
“शोकासाठी पात्र जे न तू विचार त्याचा करिशी
आणिक मोठया विद्वानासम भाषण पण देशी
अरे कुणी जगला वा मेला शोक न पंडित करती
अन् मरण्या मारण्यावरून तुझि कुंठित होते मती ? ११

असे न की मी‚ तू‚ हे राजे‚ नव्हतो पूर्वी कधि
असेहि नाही की आपण यापुढे न होणे कधी १२

जो जन्मे त्या येइ बालपण‚ यौवन‚ वृध्दपणा
अन् मग मिळते शरीर त्या दुजे ही तर क्रमधारणा
हे ठाउक ज्या ते ज्ञानीजन पडति न मोहात
कारण त्याना ज्ञात कि सारे असते क्रमप्राप्त १३

हे कुन्तिसुता‚ शीतउष्ण वा सुखदुखकारक जे
येते‚ जाते‚ संतत नसते‚ सहन करी तू ते १४

ज्या पुरूषाला या सर्वांची व्यथा न बाधे तो
सुखदु:खाला समान मानुनि अमरत्वा जातो १५

जें ‘आहे’ ते ‘नाही’ नसते जे ‘नाही’ ते ‘असते’ ना
ज्ञानी जाणत पूर्णपणें ‘आहे–नाही’ च्या तत्वाना १६

ज्या शक्तीने केलि निर्मिती अन् राहे व्यापून
तिच्या विनाशा समर्थ कुणिहि नसे‚ कुन्तिनंदन १७

नाशवंत देहांचा धारक ‘आत्मा’ अविनाशी
जाणुनि घे अर्जुना‚ आणि हो तयार युध्दासी १८

आत्मा मारी सर्वांना अन् स्वत:हि पावे मरण
असे समजती जे जे कोणी ते ते अनभिज्ञ १९

नाही जन्मत‚ मरतहि नाही आत्मा चिरंजिवी
आज असे अन् पुन्हा न होइल असाहि तो नाही
चिरंजीव अन् पुरातन असा हा आत्मा आहे
नाश पावली जरी शरीरे तरी उरून राहे २०

आत्म्याचे अविनाशि रूप हे असे जया अवगत
तो कैसा मारील‚ मारविल कुणासही‚ पार्थ ? २१

सहजपणे जैसी मनुजाने वसने बदलावी
तशीच आत्मा जीर्ण शरीरे त्यागुनी चढवी नवी २२

शस्त्रे नाहित समर्थ चिरण्या, यास‚ अग्नि जाळण्या
पाणी पण असमर्थ भिजवण्या‚ वाराही शोषण्या २३

शस्त्र‚ अग्नि‚ जल‚ वारा याना करी पराभूत
सर्वव्यापि अन् स्थिर सदैव हा आत्मा कालातीत २४

अविकारी‚ अव्यक्त आणि समजाया कठिणतर
ऐशा आत्म्या जाणुन घेउनि शोक तुझा आवर २५

आणि जरी तू मानत असशिल जन्मुनि मरतो हा
तरी तयास्तव शोक मांडणे तुला न दे शोभा २६

जो जन्मे त्या मरणे आणि मॄता पुन्हा जन्मणे
असते हे अनिवार्य जाण अन् टाळ शोक करणे २७

प्राणिमात्र अदृश्य आधि अन् मध्यकाली दॄश्य
पुन्हा अंति अदृश्य होति, मग शोक अनावश्य २८

कुणास भासे नवल‚ वर्णितो कुणी नवलवत् हा
कुणी ऐकितो नवलच याचे‚ तरि कुणा न ठावा २९

अवध्य हा आत्मा सजिवांच्या शरिरांचा स्वामी
म्हणुन शोक सजिवांस्तव करणे ठरते कुचकामी ३०

धर्मोचित युध्दापरि श्रेयस्कर ना काहीही
युध्दापासुन विचलित होणे क्षात्रधर्म नाहीं ३१

स्वर्गाचे जणु द्वार असे हे धर्मयुध्द जाण
भाग्यवंत क्षत्रियास केवळ मिळतो हा मान ३२

तरि धर्मोचित युध्दाला जर नकार तू देशी
स्वधर्म आणि कीर्ति गमावून पापभार घेशी ३३

छी थू होइल तव कौंतेया‚ सार्‍या लोकात
मरणाहुनिही दु:खद ऐसी होइल दुष्कीर्त ३४

रणावरूनि पळणारा म्हणुनी तुझ्याकडे बघतील
प्रतिष्ठा तुझी विसरून तुजला कस्पटाशि तुलतील ३५

नको नको ते शब्द बोलतिल तव कुवतीविषयी
अशी कुचेष्टा ऐकुन घेणे होइल दुखदायी ३६

रणात मरूनी स्वर्ग मिळवशिल‚ विजयि होउनी राज्य
ऊठ करोनी विचार याचा हो युध्दाला सज्ज ३७

सुखदु:ख तसे नफा नि तोटा जय नि पराजयही
उभयाना सारखे गणुनि‚ लढ त्यात पाप नाही ३८

इथवर पार्था मी सांगितला सांख्ययोग तुजप्रती
कर्मयोग हा ऐक आता जै कर्मबंध तुटती ३९

प्रारंभित कर्माचा त्याने नाश नाहि होत
अल्पहि पालन या योगाचे करी भीतिमुक्त ४०

कर्में निश्चित करते जी ती बुध्दि हवी एकाग्र
विचलित बुध्दीचे नर होती वासनांमुळे व्यग्र ४१

वेदांमधल्या कर्मकांडपर वाक्यांना भुलणारे
वेदविशारद समजतात कर्माविण काहि न दुसरे ४२

‘नानाविध कर्मे केल्यावर होते फलप्राप्ती
जी असते ऐश्वर्यभोग’ ऐसे ते प्रतिपादिती ४३

भोग आणि ऐश्वर्यामागे जे हे पळतात
बुध्दि त्यांची होउ न शकते स्थिर समाधिस्त ४४

सत्व रज तम या त्रिगुणानी भरलेले वेद
त्रिगुणांच्या पलिकडे अर्जुना‚ हो तू स्वयंसिध्द ४५

महापूर पाणी असता जे महत्व विहिरीचे
ज्ञानी पुरूषाना बस् तितुके कौतुक वेदांचे ४६

कर्म करावे‚ करित रहावे हाच हक्क तुजला
कर्मफलाचा वाटा मिळणे हा नाही दिधला
फलप्राप्ती झालीच पाहिजे असा नसे न्याय
फलाअभावी कर्म न करणे हा नच पर्याय ४७

अनासक्त होऊन कर्म कर योगाच्या ठायी
कार्यसिध्दि हो वा ना हो तरि निर्विकार राही
यश अपयश मानुनी एक अन् राहुनि नि:संग
कर्म असे करण्यास अर्जुना‚ नाव कर्मयोग ४८

कर्म कधीही कनिष्ठ ठरते समबुध्दीपेक्षा
बापुडवाणे मनात धरती कर्मफल अपेक्षा ४९

पाप पुण्य दोन्हीतुन राही अलिप्त समबुध्दी
चतुरार्इने आचर कर्मे हीच कर्मबुध्दी ५०

कर्मफलाला दुर्लक्षिति जे राहुनी अलिप्त
जन्मबंधनापासुन होती ऐसे नर मुक्त ५१

गढुळ मोहपर्यावरणातुन मुक्त जधि होशी
ऐकलेस त्या‚ ऐकशील त्या वेदां कंटाळशी ५२

अन् वेदांनी कुंठित मति तव होइल स्थिर जेव्हा
स्थिरबुध्दी तुज कर्मयोग होइल प्राप्त तेव्हा ५३

अर्जुन म्हणाला‚
सांग‚ केशवा‚ मज स्थिरबुध्दी मनुजाची लक्षणे
कैसे त्याचे उठणे‚ बसणे‚ अन् कैसे बोलणे? ५४

श्रीभगवान म्हणाले‚
सर्व कामना तशा वासना सोडुनि जो तुष्ट
तो स्थिरबुध्दी अलिप्ततेने राहि आत्मनिष्ठ ५५

दु:खामधि ना खेद जया‚ ना सुखात आसक्ती
स्थिरबुध्दी तो सुटली ज्याची प्रेम‚ राग‚ भीती ५६

या सर्वांतुनी मुक्त होउनी हो ज्याची शुध्दी
शुभाशुभाचा मोद खेद ना ज्या तो स्थिरबुध्दी ५७

कासव जैसे अवयव आपुले घेइ आवरून
तसा विषयवासना आवरून धरी स्थितप्रज्ञ ५८

निराहारिचे भोजन सुटते परी न रसभक्ती
परमज्ञान मिळता पण सुटते सर्वच आसक्ती ५९

परमज्ञान ना‚ अन् आचरिती दमन इंद्रियांचे
सुप्तवासनांमध्ये भरकटे मनमानस त्यांचे ६०

संयम करूनी होती जे मम ठायी परायण
त्यांच्या स्वाधिन त्यांचि इंद्रिये तेच स्थितप्रज्ञ ६१

विचार मनि जो करि विषयाचा‚ होई आधीन
आधिनता मग जने वासना‚ राग वासनेतुन ६२

रागातुन जन्मतो मोह जो करी स्मरण~हास
विस्मरणाने बुध्दि फिरे‚ तदनंतर हो नाश ६३

काबु मनावर ठेवुनि वागे असा स्थितप्रज्ञ
रागद्वेषविरहितपणे घे भोग‚ तरि प्रसन्न ६४

अन प्रसन्न मन करते सार्‍या दु:खांचे हरण
प्रसन्नमन जो तो स्थिरबुध्दी हे निश्चित जाण ६५

अस्थिर बुध्दी ज्याची तो भावनाशील नसतो
शून्य भावना ज्याला तो कधि शांती न मिळवतो ६६

विषयवासनांच्या मागे मन स्वैर धाव घेई
वारा जैसी पाण्यावरली नौका भिरकावी ६७

जये इंद्रियांना आवरले मन करूनी ठाम
ते नर करती स्थिर आपुली बुध्दी निष्काम ६८

जागा राही‚ जग सारे असताना झोपेमधीं
अन् जग जागे असता झोपे तो नर स्थिरबुध्दी ६९

तुडुंब भरला सागर राही बंद किनार्‍यात
तरिहि पुराचें पाणी समावे त्याच्या उदरात
तसा शांत स्थितप्रज्ञ, असुनिही विषयज्ञान त्याला
अशी शांति नच लाभे कधिही विषयलोलुपाला ७०

सर्व कामना त्यागुनि जगतो जो निरिच्छवृत्ती
निगर्वी तसा निर्मोही हो त्यास शांति प्राप्ती ७१

अशी स्थिती ही ब्राम्ही म्हणुनी ओळखली जाई
मिळता जी मनुजाला कसला मोह कधि न होई
अशा स्थितित जरि मनुष्य राहिल अंतिम समयाला
तरि ब्रम्हनिर्माणस्वरूपी मोक्ष मिळे त्याला ७२

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा