२५ मे, २००९

सोळावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
दैवासुरसंपद्विभागयोग नावाचा सोळावा अध्याय

निर्भयता, सात्विकता आणि ज्ञानयोग पालन,
संयम, दातृत्व, नि यज्ञ, अन् तसेच वेदाध्ययन, १

सत्य, अहिंसा, शांति, त्याग, अन् उदार अशि बुध्दी,
दया, क्षमा, सौम्यता, विनय, दृढनिश्चय, अन् शुध्दी २

द्वेषभाव, मानाचि हाव, अन लोभापासुन मुक्त,
दैवी पुरूष, कौंतेया, असतो अशा गुणांनी युक्त ३

दांभिकता, औध्दत्य, गर्व, अभिमान, क्रोध निष्ठुरता
प्रवृत्ती या अशा असुरी अज्ञानासमवेता ४

दैवी गुणांची संपत्ती ही असे मोक्षदायक
असुरी प्रवृत्ती तर, पार्था, ठरे बंधकारक
जन्मजात तुज लाभली असे दैवी गुणसंपदा
तेव्हा, पार्था, करू नको तू कसलीही चिंता ५

दोन्हि जीव नांदति या लोकी, दैवी अन असुरी
दैवींबद्दल सांगुन झाले, ऐक कसे असुरी ६

काय करावे, काय करू नये असुर ना जाणती
शुचिर्भूतता, सत्य, सदाचरणाचि त्या न माहिती ७

असुरांलेखी जग खोटे अन आधाराविण असते
परमब्रम्ह ना येथे कोणी जगताचे निर्माते
उद्भव जगताचा झालासे विषयसुखाच्यापोटी
याहुन दुसरे काय प्रयोजन जगतोत्पत्तीसाठी ८

अशा विचारांचे, अल्पमती, असुर नष्टात्मे
जगताच्या नाशास्तव करती अहितकारि कर्मे ९

अशक्य ज्यांचे शमन अशा कामेच्छांच्या नादी
लागुन दांभिक, मदोन्मत्त, गर्विष्ठ असुर फंदी
भलभलत्या कल्पना करूनि मग पडती मोहात
पापाचरणे करण्याचे जणु घेती संतत व्रत १०

चिंतानी आमरण तयाना असे ग्रासलेले
कामेच्छांच्या पूर्तीसाठी सदा त्रासलेले ११

कामपूर्तिविण दुजे काहिही दिसते ना त्याना
शतसहस्त्र आशापाशांमधी गुरफटलेल्याना
असे कामक्रोधात परायण झालेले असुर
त्यास्तव अनुचित मार्गे करिती धनसंचय फार १२

‘हे’ धन माझे, ‘ते’ ही मिळविन ही त्यांची कांक्षा
आज असे ते उद्या वाढविन धरती अभिलाषा १३

या शत्रूला आज मारले, उद्या अधिक मारिन
मी ईश्वर, भोक्ताही मी, मी निश्चित बलवान १४

धनाढय मी, स्वजनात राहतो, मजसम ना कोण
यज्ञ करिन वा दान करिन वा करीन मी चैन १५

अशा फोल कल्पना बाळगुनि अज्ञानी, मोहित
कामातुर होउनिया पडती रौरव नरकात १६

आत्मतुष्ट, धनमानमदाने फुगलेले दांभिक
नावाला यज्ञयाग करिती अयोग्य विधीपूर्वक १७

असे अहंकारी, माजोरी, कामग्रस्त, असुर
द्वेष करूनि निंदती मला मी असता परमेश्वर १८

अशा नराधम, क्रूरात्म्याना, दुष्ट असुराना
टाकित असतो पापयोनिमधि मीच दुरात्म्याना १९

अशा योनिमधि जन्मोजन्मी खितपत ते पडती
कधि न करी मी जवळ तयां, ते अधमगतिस जाती २०

काम, क्रोध अन् लोभ ही तिन्ही दारे नरकाची
विनाशकारी म्हणुनी, पार्था, सदैव टाळायची २१

या दारांना टाळुनि नर जो करी तपश्चर्या
आत्मशुध्दि साधुनी परम पदि जाई, कौंतेया २२

शास्त्रविधींना देउन फाटा विषयसुखी वर्तती
ते परमगती, सिध्दी वा सुख काहीच ना मिळवती २३

शास्त्र सांगते योग्य काय अन अयोग्य कुठले कर्म
त्या आदेशानुसार कर्मे करणे हा तव धर्म २४

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
देवासुरसंपद्विभागयोग नावाचा सोळावा अध्याय पूर्ण झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा