१८ मे, २००९

पंधरावा अध्याय

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
पुरूषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय

वेदवाक्य ही पाने ज्याची, मुळे वरी, खाली फांद्या
अशा वडाच्या झाडां जे जाणती त्यां वेदज्ञ हि संज्ञा १

खाली वर शाखा, फुटती त्रिगुणांच्या पारंब्या त्याना
येती खाली कर्मबंधनी जखडायाला मनुजाना २

अशा स्वरूपी झाडाचे प्रत्यक्ष इथे दिसणे न घडे
आरंभ नि अस्तित्व अंतही ना त्याचा दृष्टीस पडे
घट्ट मुळाच्या या वृक्षाची हवी समाप्ती करावया
विरक्ततेच्या तलवारीने मुळासहित त्या छाटुनिया ३

अन् त्यानंतर ध्यास धरावा ब्रम्हसनातन तत्वाचा
ज्याच्या पासुन उपजे प्रवृत्ती त्या आदीपुरूषाचा
या करण्याने होइल प्राप्ति परम अशा त्या मोक्षाची
जेथुन घ्यावी ना लागे फेरी फिरफिरूनी जन्माची ४

मान, मोह, आसक्तीपासून खरोखरी असती मुक्त
अध्यात्माचे परिपालक अन् निरिच्छ बुध्दी असतात
सुखदु:खाच्या कल्पनांमधी सदैव राखिति स्थिरमती
असे ज्ञानिजन, धनंजया, अव्ययस्थानाजवळी जाती ५

जिथुन परतुनि यावे नलगे जन्माला, ऐसे स्थान
अग्नि, चंद्र वा सूर्य न लागे उजळाया ते मम सदन ६

पार्था माझा अंश राहतो व्यापुनि या इहलोकात
शरिरांमध्ये जीवरुपाने मनाइंद्रियांसमवेत ७

जिवा लाभता शरीर होतो षडेंद्रियांमधि रममाण
शरीर सुटता त्यांना संगे घेउन करितो निर्गमन
जैसा वारा पुष्पांपासुन गंधाला वाहुन नेतो
तसा जिवात्मा मनासवे पंचेंद्रियांस घेउन जातो ८

कान, नेत्र, कातडी, जिव्हा, अन् नाक, तसे मन मनुजाचे
यांच्या योगे भोग घेइ जिव शरीरामधुनी विषयांचे ९

हा शरीरामधि राहणारा अन निघून जाणारा जीव
विषयभोग घेई होता मनि त्रिगुणांचा प्रादुर्भाव
अशा जिवाला अज्ञानी जन कदापिही जाणु न शकती
ज्ञानचक्षुनी पाहू बघती तेच तयाला ओळखती १०

प्रयत्न करता योगी या जीवात्म्याला ओळखतात
पण लाख प्रयत्नांनंतरही ना जाणति जे जन असंस्कॄत ११

सूर्य, चंद्र, अग्नीचे तेज जे समस्त जगता उजळितसे
धनंजया, ध्यानि घे, तेज ते माझ्यामधुनिच उपजतसे १२

त्या तेजायोगे भूमीमधि प्रवेशदेखिल करि पार्थ
चंद्ररसाच्या रूपाने मी वनौषधींच्या पुष्टयर्थ १३

जठराग्नीच्या रूपाने मी प्राण्यांच्या देहात वसे
प्राण, अपान या वायूंने मी अन्न चतुर्विध पचवितसे १४

सर्वांच्या हृदि मी, मजपासुन मति, स्मृति, अन् विस्मृतिही
वेदांमधले ज्ञान मीच, अन् मी वेदांचा कर्ताही १५

क्षर अन् अक्षर दो प्रकारचे पुरूष इथे इहलोकात
जीव सर्व क्षर, मूलतत्व त्यांचे अक्षर ऐसे ख्यात १६

दोन्हीहुन वेगळा पुरूष उत्तम, त्या म्हणती परमात्मा
त्रिलोक व्यापुन राहे आणि पोषि तयासी तो आत्मा १७

क्षरापलिकडे आहे मी, अन् अक्षराहुनिही श्रेष्ठ
तरीच पुरूषोत्तम मज म्हणती त्रिलोकात अन् वेदात १८

पुरूषोत्तम मी, हे जो जाणी नि:शंकपणे, धनंजया
सर्वज्ञानी होउनि मजसि भजे भक्तिने पूर्णतया १९

गुपितामधले गुपीत ऐसे शास्त्र तुला जे कथिले मी
ते समजुन घेण्याने होइल कृतकृत्य बुध्दिमंतही २०

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
पुरूषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय पूर्ण झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा